कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याबाबत अतिशय वादग्रस्त असे विधान केले आहे. गंगोपाध्याय मिदनापूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत असताना म्हणाले, “भाजपाच्या संदेशखालीमधील उमेदवार रेखा पात्रा यांना दोन रुपयांना विकत घेतले आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेस करत आहे. मग मला विचारायचे आहे की, ममता बॅनर्जी यांची किंमत काय आहे, १० लाख रुपये का?” गंगोपाध्याय यांच्या विधानानंतर आता तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी गंगोपाध्याय यांनी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला होता. ते पश्चिम बंगालच्या तामलुक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
अभिजीत गंगोपाध्याय काय म्हणाले?
जाहीर सभेला संबोधित करत असताना अभिजीत गंगोपाध्याय म्हणाले की, रेखा पात्रा यांच्याबद्दल अवमानकारक विधान तुम्ही कसे केले? कारण ममता बॅनर्जी या एका प्रसिद्ध ब्रँडकडून आपला मेकअप करून घेतात. तर रेखा पात्रा या घरकाम करतात, म्हणून तुम्ही त्यांना दोन हजारांत घेतल्याचे म्हणता का? एक महिला दुसऱ्या महिलेशी इतक्या अपमानास्पद पद्धतीने कसे काय बोलू शकते? असा सवाल गंगोपाध्याय यांनी उपस्थित केला.
तृणमूल काँग्रेसकडून टीका
अभिजीत गंगोपाध्याय यांच्या टीकेवर आता तृणमूल काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले की, एक सभ्य गृहस्थ अशी भाषा वापरू शकतो, याचे मला आश्चर्य वाटत आहे. गंगोपाध्याय यांनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही नक्की माणूसच आहात ना? याबद्दल लोकांना आता शंका वाटत आहे.
भाजपाने आरोप फेटाळले
अभिजीत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप तृणमूल काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आली आहे. मात्र भाजपाने ही क्लिप फेक असल्याचे म्हटले. टीएमसीकडून आमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजपाने केला. भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, “टीएमसीने सादर केलेला व्हिडीओ खरा नाही. भाजपाला कलंकित करण्यासाठी असे फेक व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. पण याचा निवडणुकीवर फारसा परिणाम दिसणार नाही.”
कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय?
अभिजीत गंगोपाध्याय यांनी अनेक वर्षं कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. मोठ्या खंडपीठाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देणे, थेट सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीलाच आदेश देणे अशा प्रकारच्या गोष्टींमुळे गंगोपाध्याय अनेकदा वादातही सापडले होते.