तिहार तुरुंगात अनेक दिवस काढल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. त्यानंतर आज त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपाची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपामधीलही मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत”, असा दावा केजरीवाल यांनी केला. तसेच लोकसभेनंतर दोन महिन्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल आणि सप्टेंबर २०२५ नंतर अमित शाह देशाचे पंतप्रधान होतील, असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान पदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भाजपाचे लोक इंडिया आघाडीला प्रश्न विचारतात की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? पण मी भाजपाला प्रश्न विचारतो की, तुमचा पंतप्रधान कोण असणार? मोदी पुढच्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. मोदी यांनी स्वतःच २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले गेले. मग आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपानेच सांगावे की, त्यांचा पंतप्रधान कोण असणार?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

मोदीजी तुमच्या निवृत्तीनंतर गँरटी कोण पूर्ण करणार?

“पंतप्रधान मोदी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी अमित शाह पंतप्रधान होतील. म्हणूनच ते अमित शाह यांच्यासाठी मत मागत आहेत. जर भाजपाची सत्ता आलीच तर पुढच्या दोन महिन्यात योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल. त्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल. मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो की, मोदींनी दिलेली गॅरंटी कोण पूर्ण करणार? अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार आहेत का?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पण सत्ता इंडिया आघाडीची येईल

“पण तसेही मला नाही वाटत की, ४ जून रोजी भाजपाची सत्ता येईल. माझे मतदारांना आवाहन आहे की, तुम्ही मोदींना नाही तर अमित शाहांना मत देत आहात”, असे आवाहन केजरीवाल यांनी केला आहे. तसेच या निवडणुकीत असाही भाजपाचा विजय होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाच्या जागा कमी होणार आहेत. भाजपाला २०० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे ४ जून नंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, ज्यामध्ये आपचाही समावेश असेल, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is going to be your pm if modi ji is turning 75 next year says arvind kejriwal kvg