पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली वाराणसी आणि बडोदा या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दोन्हीही ठिकाणी त्यांना विजय प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी वाराणसी हाच मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. देशात आतापर्यंत ज्यांनी दीर्घकाळ पंतप्रधान होण्याचा मान मिळविला, त्यापैकी अधिकाधिक पंतप्रधान उत्तर प्रदेशमधूनच निवडून गेलेले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे वाराणसीला साहजिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले. त्याआधी धार्मिक महत्त्व होतेच. याही निवडणुकीत वाराणसी मतदारसंघ चर्चेत आहे. त्याचे कारण या ठिकाणी पंतप्रधान मोदी निवडणुकीस उभे आहेत, पण त्यांचा नकलाकारही वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्याम रंगीला या २९ वर्षीय मिमिक्री कलाकाराने वाराणसीतून मोदींना आव्हान देण्याचे जाहीर केले आहे. त्याच्या आव्हानामागची पार्श्वभूमी काय? हे करण्यास तो का उद्युक्त झाला? याचा घेतलेला हा आढावा.
श्याम रंगीला कोण आहे?
राजस्थानचा असलेल्या श्याम रंगीलाने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही कॉमेडी शोमधून मिमिक्री करण्याची सुरुवात केली होती. २०१७ साली पंतप्रधान मोदी यांच्यासारखा आवाज आणि बोलण्याची शैली विकसित करून त्याने प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर श्याम रंगीलाने विविध प्लॅटफॉर्मवर मोदींच्या मिमिक्रीचा धडाका लावला. विविध विषयांना घेऊन मोदींवर टीका-टिप्पणी करणारे खुसखुशीत व्हिडीओ श्याम रंगीलाने तयार केले आहेत. वर वर उपरोधिक वाटणारे हे व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या धोरणावर टीका करणारे अधिक असतात. जसे की, इंधनाची दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल पंपावर सायकलवर जात पंतप्रधान मोदींच्या फलकासमोरच त्यांच्या आवाजात व्हिडीओ करण्याचे धाडस श्याम रंगीलाने दाखविले होते.
राजस्थानच्या हनुमानगड या ठिकाणी श्याम रंगीलाचा जन्म झाला. त्याने ॲनिमेशनमध्ये शिक्षण घेतलेले आहे. श्यामचे खरे नाव श्याम सुंदर असे आहे. विनोद निर्मिती आणि विनोद प्रसूत करण्याची वेगळी हातोटी असल्यामुळे श्याम रंगीलाने स्टँडअप कॉमेडीकडे आपला मोर्चा वळवला. टीव्ही कॉमेडी शोमध्ये आल्यानंतर त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली. पंतप्रधान मोदींसह इतर राजकीय नेते, जसे की राहुल गांधी यांचीही मिमिक्री श्याम रंगीलाने केलेली आहे. पण, मोदींच्या मिमिक्रीला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. यामुळे रंगीलाला एक विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित करता आली.
श्याम रंगीला सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून स्टँडअप कॉमेडी करत असतो. मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासारखा तो ‘ढंग की बात’ असा एक विनोदी कार्यक्रम घेतो.
मोदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय का घेतला?
श्याम रंगीलाने १ मे रोजी आपल्या एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने त्याची ‘मन की बात’ कथन केली. पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे कारण काय? याचा खुलासा त्याने केला. तो म्हणतो, बातम्यात तुम्ही ऐकले असेल की, मी निवडणूक लढवतोय. तुम्हाला कदाचित ही थट्टा वाटली असेल. मी कॉमेडीयन आहे, त्यामुळे हीदेखील एक कॉमेडी आहे, असे तुम्हाला वाटू शकते, पण ही थट्टा नाही, तर खरी बातमी आहे. मी वाराणसीतून मोदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
“तुम्हाला वाटत असेल की, असा निर्णय घेण्याची गरज काय? मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी काय सिद्ध करणार? पण मित्रांनो, आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत कुणीही, कुठेही निवडणूक लढवू शकतो. मी निवडणूक लढवतोय त्यामागे काही कारणे आहेत. आपण काही दिवसांपासून पाहतोय, सूरत, चंदीगड आणि इंदूरमध्ये काय झाले. त्या ठिकाणी सत्ताधारी उमेदवारापुढे कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार उतरला नाही. मग लोक मतदान कुणाला करणार? जर एक व्यक्ती जरी एखाद्या उमेदवाराच्या विरोधात मत देऊ इच्छितो, तर तो त्याचा अधिकार आहे. इव्हीएम मशीनवर कुणाचे तरी नाव असायला हवे. मला भीती आहे की, वाराणसीतही असे काही होऊ नये. त्यामुळे मी वाराणसीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला”, असे श्याम रंगीलाने आपल्या व्हिडीओमध्ये बोलताना स्पष्ट केले.
वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय काय झाले? याचाही अनुभव श्याम रंगीलाने शेअर केला. तो म्हणाला की, माझ्या निर्णयामुळे वाराणसीतील अनेकांना आनंद झाला. त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. लोकांचे प्रेम मला मिळत आहे, त्यामुळे मी उत्साहित झालो असून लवकरच वाराणसीला भेट देणार आहे. मोदीजी म्हणाले आहेतच, “ज्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत मी त्याला उत्तर देईन.” त्यामुळे मीही मोदींना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी जात आहे.
माझ्याकडे निवडणूक रोखे नाहीत
निवडणुकीच्या बाबतीत मी उत्साही तर आहे, पण निवडणुकीचा मला काहीच अनुभव नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचार कसा करावा? लोकांपर्यंत कसे पोहोचावे, या सर्वांची माहिती मला लोकांकडून मिळाली तर फार बरे होईल, अशी अपेक्षाही रंगीलाने व्यक्त केली आहे. माझ्याकडे निवडणूक रोखे नाहीत, त्यामुळे मला लोकांकडून तन-मन-धन असे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा मी ठेवत आहे.
श्याम रंगीला मोदींच्या विरोधात का?
अतिशय कमी वयात श्याम रंगीलाने प्रसिद्धी मिळवली असली तरी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यामुळे तो अनेकदा टीकेचा धनी झाला. २०१७ साली द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल केल्यानंतर त्याला शोच्या बाहेर काढले गेले. श्यामने नक्कल केलेला व्हिडीओ प्रक्षेपित करण्यात आला नाही. मात्र, काही काळाने तो इंटरनेटवर लिक झाला. या व्हिडीओमध्ये श्याम रंगीलाने मोदींवर टीका करणारा विनोद केला होता. शोमधून काढल्यानंतर मी मोदींचा चाहता आहे, असे त्याने दाखविण्याचा प्रयत्न केला.
जून २०२२ मध्ये श्याम रंगीलाने बीबीसी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने मोदींची मिमिक्री करण्यामागचे कारण सांगितले. मला सुरुवातीपासून विनोदी कलाकार व्हायचे होते. मी सिनेतारकांची मिमिक्री करत होतो, पण त्यात इतकी स्पर्धा आहे की, मला काहीतरी वेगळे करणे भाग होते. २०१४ नंतर देशात मोदींचा बोलबाला होता. म्हणून मी त्यांचीच मिमिक्री करण्यास सुरुवात केली आणि लोकांनीही त्याला चांगली पसंती दिली, असे रंगीलाने सांगितले.
रंगीला पुढे म्हणतो की, माझे मोदींशी काही वैयक्तिक शत्रूत्व नाही. माझी कोणतीही राजकीय विचारधारा नाही, ना मी उजवा आहे, ना मी डावा आहे.
‘आप’मधून राजकारणात उतरण्याचा अपयशी प्रयत्न
श्याम रंगीलाने वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकारणात तो याआधीच आला होता. २०२२ साली श्याम रंगीलाने आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्याला कोणतेही पद देण्यात आले नाही. पक्षात राहून स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला त्याला देण्यात आला होता. पण, पुढे आम आदमी पक्षाच्या मंचावर तो फार काही दिसून आला नाही.
अरविंद केजरीवाल यांनीही दिले होते वाराणसीतून आव्हान
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीत आव्हान दिले होते. २०१४ साली जेव्हा मोदी पहिल्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत होते, तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते. विशेष म्हणजे केजरीवाल दिल्लीचे असूनही त्यांनी वाराणसीत तब्बल दोन लाख मते मिळवली होती, तर मोदींना ५ लाख ८१ हजार मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या तुलनेत ५६.४ टक्के मते एकट्या मोदींना मिळाली होती. तब्बल साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने मोदींनी विजय मिळविला होता.
२०१९ साली पंतप्रधान मोदींनी आणखी मोठा विजय मिळवला. यावेळी त्यांना ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळाली. एकूण मतदानाच्या तब्बल ६३.६ टक्के मतदान मोदींच्या पारड्यात पडले होते.