Who Will Be Chattisgarh CM : छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात ९० विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. आज (दि. ३ डिसेंबर) सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र दिसले. मात्र दुपार नंतर हे चित्र पालटले आणि भाजपाने जोरदारी मुसंडी मारत ९० पैकी ५४ जागांवर आघाडी घेतली. त्यामुळे बहुमताचा ४५ हा आकडा पार करून भाजपाने विजयाच्या दिशेन आगेकूच केली.
छत्तीसगडमध्ये बहुमत मिळाल्यानंतर भाजपा कुणाला मुख्यमंत्री करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे मागचे पाच वर्ष अडगळीत गेल्यानंतर निवडणुकीच्या काळात त्यांना उमेदवारी देऊन सक्रीय केले गेल. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष अरुण साव, दुर्गचे खासदार विजय बघेल आणि माजी आयएएस आणि भाजपाचे महामंत्री ओपी चौधरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
कोण होणार मुख्यमंत्री?
छत्तीसगडमधील सामान्य नागरिकांमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडे आणि माजी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल या नावांचीही चर्चा आहे. ओबीसी प्रवर्गातील मोठे नेते आणि विलासपूरचे खासदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव, माजी विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक, दुर्गचे खासदार विजय बघेल, विरोधी पक्षनेते नारायण चंदेल, माजी मंत्री अजय चंद्राकर आणि युवा नेता ओपी चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
आदिवासी समाजातून मुख्यमंत्री देण्याची मागणी
छत्तीसगडमध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आदिवासी समाजातून मुख्यमंत्री दिला जावा, अशी अनेक काळापासूनची मागणी आहे. अनुसूचित जमातीच्या (एसटी) प्रवर्गातील मोठ्या नेत्यांच्या नावावर नजर टाकली असता, केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, माजी राज्यसभा खासदार रामविचार नेताम, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साय, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लता उसेंडी आणि राज्याचे माजी मंत्री केदार कश्यप यांचे नाव घेतले जाते.
अनुसूचित जातीमधून पर्याय देण्यासाठी भाजपाकडे फारसे नेते नाहीत. सध्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. कृष्णमूर्ती बांधी, माजी मंत्री पुन्नूलाल मोहिले यांचे नाव घेतले जाते.
भाजपाने यावेळी पाचही राज्यात निवडणूक लढवित असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये मातब्बर नेते असतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कल्याणकारी योजनांचा आधार घेऊन निवडणूक लढविली गेली. छत्तीसगडमध्येही हाच फॉर्म्युला वापरला गेला. त्यामुळे छत्तीसगडला यावेळी नवा चेहरा मिळणार का? याची उत्सुकता जनतेला लागली आहे.