Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीनिमित्त दोन दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बजरंग दल आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याचे वचन दिले. या जाहीरनाम्याविरोधात बजरंग दल आणि इतर संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या युवक विभागाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आपल्या घराबाहेर फलक लावून काँग्रेसच्या उमेदवारांनी मते मागायला येऊ नये, अशा इशारा दिला. असेच फलक चिक्कमंगळुरु येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या घराच्या बाहेर लावले आहेत. १० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये, असे फलकच बजरंग दलाने लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने घराबाहेर लावलेल्या पोस्टरवर लिहिले, “हे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे घर आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने इथे मत मागायला येऊ नये. हा फलक वाचूनही जर तुम्ही आत आलात तर तुमच्यावर कुत्रा सोडण्यात येईल.” काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानंतर बजरंग दलाकडून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआय संघटनेवर कायद्यानुसार कारवाई करण्यासोबतच द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांवरही चाप लावणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले, “संविधान आणि कायद्यावर कुणीही बोट ठेवू शकत नाही. व्यक्ती किंवा कोणत्याही संघटनेला हा अधिकार नाही. बजरंग दल, पीएफआय आणि इतर लोक बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष आणि तिरस्कार पसरवीत आहेत. अशा संघटनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही कायद्यानुसार पावले उचलू.”

हे वाचा >> पैसे काय झाडाला लागतात का? कर्नाटकात तरी लागलेत… वाचा कसे ते?

सत्ताधारी भाजपाने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. भाजपाने म्हटले की, सत्तेत आल्यानंतर काँग्रेस बजरंग दलावर बंदी आणणार आहे. हा भगवान हनुमान यांचा अवमान आहे. तसेच या माध्यमातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला वाचविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काल कर्नाटकात घेतलेल्या तीनही जाहीर सभांमधून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलताना म्हणाले, “कर्नाटकमधील लोकांनी काँग्रेसचा इतिहास आणि त्यांची विचारधारा विसरता कामा नये. दहशत आणि दहशतवादी यांचे तुष्टीकरण करणे हा काँग्रेसचा इतिहास आहे. दिल्लीमध्ये जेव्हा बाटला हाऊस चकमक झाली तेव्हा काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने दुःख व्यक्त केले, दहशतवाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who let the dogs out bajrang dals warning to congress leaders coming to their house kvg