Pandharpur Assembly Constituency: पंढरपूर विधानसभा: पुन्हा परिचारक की आवताडे? शरद पवार भाजपाकडून मतदारसंघ खेचून आणणार?

Pandharpur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: विठुरायाची नगरी असलेल्या पंढरपूरमध्ये चुरशीची लढाई होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन पक्ष असल्यामुळे अनेकांना संधी नाकारली जाऊ शकते, त्यामुळे बंडखोरी टाळण्याचे लक्ष्य दोन्ही आघाड्यांकडे असणार आहे.

pandharpur mangalwedha Assembly Constituency
पंढरपूरचा आमदार कोण? महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस. (Photo – Loksatta Graphics)

Pandharpur Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी पंढरपूर हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मागच्या काही वर्षात हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपाकडे गेला. मतदारसंघाच्या स्थापनेनंतर २०२१ च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच याठिकाणी कमळ फुलले. गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाने सोलापूरमध्ये जम बसविला. २०१९ ला जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ आणि पाच विधानसभा मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला. मात्र २०२४ च्या लोकसभेत जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे आता विधानसभेचेही गणिते बदलणार असल्याचे सांगितले जाते. तसेच पंढरपुरमध्येही भाजपाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

पंढरपूर विधानसभेचा राजकीय इतिहास

पंढरपूर विधानसभेत पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन तालुके येतात. तसेच पंढरपूर महानगरपालिका येते. पंढरपूरमध्ये अनेक वर्ष काँग्रेसचा दबदबा राहिला. खासकरून नेत्यांभोवती निवडणूक केंद्रीत राहिली. १९५७ साली प्रजा सोशालिस्ट पार्टीचे रघुनाथ नामदेव राऊळ याठिकाणी जिंकून आले. तर १९६२ ते १९७८ या चार निवडणुकात काँग्रेसच्या औदुंबर कोंडीबा पाटील यांनी विजय प्राप्त केला. १९८० साली काँग्रेसच्या पांडुरंग डिंगरे यांचा विजय झाला. १९८५ ते २००४ अशा सलग पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सुधाकर परिचारक जिंकून येत होते. २००४ सालची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढविली. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ साली भारत भालके याठिकाणी विजयी झाले. तीनही वेळेला त्यांनी अनुक्रमे स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविली. २०२० साली करोनामुळे भारत भालके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर २०२१ साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांचा विजय झाला.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात कोण?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व स्थापन केले. तसेच अकलूजचे मोहिते पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत येतो. २०१९ साली भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यामुळे २०२१ च्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिला. भालके यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असल्यामुळे त्यांचे चिरंजीव भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा अवघ्या २,९५५ मतांनी पराभव झाला. समाधान आवताडे यांना १,०९,४५० मते मिळाली तर भगीरथ भालके यांना १,०५,७१७ मते मिळाली.

२०२१ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात प्रवेश केला होता. मात्र तेलंगणातच बीआरएस पक्षाची सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रातील बीआरएसचे नेते नवे राजकीय पर्याय शोधत आहेत. भगीरथ भालके यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांचे चिरंजीव आणि भाजपाचे नेते प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांना निवडून आणण्यात विशेष प्रयत्न केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिला उमेदवार म्हणून दिलीप धोत्रे यांची पंढरपुरात उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपमधूनच खुले आव्हान मिळण्याची शक्यता असून अन्य पक्षांमधूनही ताकदीचे उमेदवार इच्छुक असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी

१) भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस) – ८९,७८७

२) सुधाकर परिचारक (भाजपा) – ७६,४२६

३) समाधान आवताडे (अपक्ष) – ५४,१२४

४) शिवाजीराव काळुंगे (काँग्रेस) – ७२३२

२०२१ च्या पोटनिवडणुकीची आकडेवारी

१) समाधान आवताडे (भाजपा) – १,०९,४५०

२) भगीरथ भारत भालके (राष्ट्रवादी) – १,०५,७१७

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who will win pandharpur assembly constituency maharashtra assembly election samadhan autade prashant paricharak or maha vikas aghadi kvg

First published on: 10-10-2024 at 20:09 IST
Show comments