Patan Assembly Constituency: पाटण विधानसभेमध्ये देसाई की पाटणकर? मविआकडून उमेदवार कोण?

Patan Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ जगाावाटपात शरद पवार की उद्धव ठाकरेंच्या पारड्यात पडणार, याची सर्वाधिक उत्सुकता आहे.

Patan Assembly Constituency Maharashtra Assembly Election
पाटण विधानसभा मतदारसंघातून मविआचा उमेदवार कोण असणार? शंभूराज देसाईंचा मुकाबला कोण करणार? (Photo – Loksatta Graphics)

Patan Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यांच्या या बंडात त्यांना साथ लाभली ती शंभूराज देसाई यांची. मातोश्रीच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या शंभूराज देसाई यांचे बंड हे उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारे होते. आता याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढला जाणार का? हे पाहावे लागेल. मात्र तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपात साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता अधिक आहे. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेचे शंभूराज देसाई याठिकाणाहून विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर निवडणूक लढवत आले आहेत. २०१४ आणि २०१९ साली विक्रमसिंह यांचे चिरंजीव सत्यजीतसिंह पाटणकर यांनी देसाईंच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

पाटण विधानसभेचा राजकीय इतिहास

पाटण विधानसभेचे राजकारण देसाई आणि पाटणकर या दोन घराण्यांभोवती फिरत आले आहे. १९५१ ते १९८० या काळात तब्बल तीन वर्ष आणि लागोपाठ सात निवडणुकांमध्ये दौलतराव श्रीपतराव देसाई यांनी पाटण विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. १९७८ ला त्यांनी जनता पक्षातून निवडणूक लढविली होती. बाकी सहावेळा ते काँग्रेसचे उमेदवार होते. १९८३ साली पोटनिवडणुकीत विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर येथे विजय मिळविला. त्यानंतर १९८५ ते १९९९ पर्यंत सलग चारवेळा विक्रमसिंह विजयी झाले. १९९९ साली त्यांनी शरद पवारांची साथ देऊन राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविली होती.

हे वाचा >> Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

पुढे २००४ साली शंभूराज देसाई यांचा राजकीय उदय झाला. शिवसेनेकडून निवडणूक लढवत असताना त्यांनी विजय मिळविला. पुढच्याच निवडणुकीत म्हणजे २००९ साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले. तर त्यानंतर मात्र २०१४ आणि २०१९ साली शंभूराज देसाई यांचे पाटणवर वर्चस्व राहिले.

शंभूराज देसाई यांच्याविरोधात उमेदवार कोण?

पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे इतर तुल्यबळ उमेदवार कोण? याची चर्चा होत आहे. शंभूराज देसाई यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे तरूण नेते हर्षद कदम हे त्यांच्याविरोधात आक्रमक होताना दिसत आहते. हर्षद कदम यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांना पाटण तालुक्यात आणून शक्तीप्रदर्शन केले आहे. तसेच देसाईंच्या कारभाराविरोधात ते सातत्याने टीका करत असतात. मध्यंतरी त्यांनी देसाईंच्या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला होता, या मोर्चाचा विरोध करण्यासाठी देसाईंच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिमोर्चा काढला.

हर्षद कदम यांच्याइतका आक्रमकपणा सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर हे दाखवत नाहीत, त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी राहिली आहे. मात्र हा मतदारसंघ याहीवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला तर त्यांच्याकडून उमेदवार कोण असले हे अद्याप सांगता येत नाही. पण सत्यजीत पाटणकर यांना उमेदवारी मिळाल्यास आणि हर्षद कदम यांनी त्यांची उत्तम साथ दिल्यास देसाई यांच्यासाठी निवडणूक सोपी राहणार नाही.

२०१९ च्या विधानसभेचा निकाल

१) शंभूराज देसाई (शिवेसना) – १,०२,२६६

२) सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी) – ९२,०९१

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who will win patan assembly constituency maharashtra assembly election shambhuraj desai or satyajeet patankar kvg

First published on: 11-10-2024 at 16:16 IST
Show comments