Loksabha Election Save Constitution: लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाचा विजय होत असला तरी जागांच्या आकडेवारीत नक्कीच घसरण झाली आहे. निवडणूक निकालाच्या आधी समोर आलेले एक्झिट पोलचे आकडे पाहिल्यास त्यात भाजपाला एकहाती विजय मिळणार हे जवळपास निश्चितच दिसत होते पण काल निकालाच्या वेळी मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीपासूनच चित्र पालटायला सुरुवात झाली. भाजपाच्या घसरणीपाठी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत पण त्यातील एक अत्यंत प्रभावी मुद्दा ठरला तो म्हणजे आरक्षण. विरोधी पक्ष म्हणजेच इंडिया आघाडीने मुख्यतः अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षित असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या वेळी “संविधान वाचवा” हा मुद्दा उचलून धरला होता. तब्बल १३१ म्हणजेच अनुसूचित जातींसाठी आरक्षित ८४ जागा व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित ४७ जागांचा निकाल पाहता या मुद्द्याने मोठे बदल घडवून आणल्याचं दिसतंय. तिप्पटीहून अधिक यश मिळवण्यासाठी इंडिया आघाडीकडून नेमकं कोणतं सूत्र, कसं वापरलं गेलं हे पाहूया..
२०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तुलना (LOK SABHA ELECTION RESULTS 2024)
लोकसभा निकालाचे अगदी शेवटपर्यंतचे अपडेट्स पहिले तरी सत्ताधारी भाजपाचा गट, ११ राज्यांमधील अनुसूचीत जातींसाठी आरक्षित ३० जागांवर आघाडीवर होता. पण २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते. मागील लोकसभा निवडणूक भाजपाने ४६ आरक्षित जागांवर विजय नोंदवला होता. यावरून हे स्पष्ट होते की यंदा भाजपाला एससीसाठी आरक्षित जागांवर विरोधी पक्षाला कडवी झुंज द्यावी लागली होती.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने ९ राज्यांमधील १९ एससी आरक्षित जागांवर एकतर आघाडी घेतली होती व काही ठिकाणी विजयही प्राप्त केला होता. २०१९ च्या तुलनेत काँग्रेसला तिप्पटीहून अधिक यश यंदा मिळाले आहे. केवळ आरक्षित जागांचाच विचार केला तरी २०१९ मध्ये काँग्रेसने अनुसूचित जातींसाठी आरक्षित अशा सहाच जागा जिंकल्या होत्या यंदा ही संख्या १९ वर पोहोचली आहे.
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सस्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “या निकालाचा उलगडा केला तर एक बाब लक्षात येते की, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी सुद्धा प्रचारादरम्यान ‘संविधानाला धोका’ आणि ‘आरक्षणाची भीती’ हे मुद्दे आक्रमकपणे मांडले होते. विरोधी पक्षांच्या याच प्रचारामुळे दलित व आदिवासी गटांमध्ये आरक्षण गमावण्याची भीती निर्माण झाली असू शकते ज्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला.”
उल्लेखनीय बाब म्हणजे, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने २०१९ मध्ये एकही अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागा जिंकली नाही पण यंदा काँग्रेससह युती करून त्यांनी युपीमध्ये सात जागा जिंकण्याची तयारी केली होती. यापैकी पाच जागी भाजपा, एका ठिकाणी अपना दल व एकीकडे बहुजन समाज पक्षाचे विद्यमान खासदार होते. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एससीच्या सहा जागा जिंकण्याची तयारी केली होती. तर द्रविड मुन्नेत्र कळघमने (DMK) ने तामिळनाडूतील तीनही राखीव जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा निकालाची सद्यस्थिती पाहता, भाजपच्या मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) बिहारमध्ये तीन अनुसूचित जातीच्या जागा जिंकल्या आहेत तर जेडी(यू) ने एक जागा जिंकली. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाला तीन जागा जिंकता आल्या आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये आठ, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी चार, ओडिशा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन आणि आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकण्याची तयारी केली होती.
हे ही वाचा<< नरेंद्र मोदींसाठी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची पोस्ट; खास फोटो शेअर करत म्हणाल्या, “आपण एकत्र काम करू, शेवटी..”
२०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यास, भाजपाने त्यावेळी जिंकलेल्या ४६ जागांपैकी, सर्वाधीक म्हणजे १४ या उत्तर प्रदेशातील होत्या. तर पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात प्रत्येकी पाच आणि मध्य प्रदेशात चार जागा भाजपाला आपल्या नावे करता आल्या होत्या. याउलट काँग्रेसला मात्र केरळ, पंजाब व तामिळनाडू अशा तीन राज्यात विखरलेल्या अवघ्या सहा जागी विजय प्राप्त झाला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने याशिवाय पाच जागा जिंकल्या होत्या. तर डीएमके आणि वायएसआरसीपी या दोन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या.
अनुसूचित जमातींसाठी आरक्षित ४७ जागांपैकी भाजपा २६ जागांवर आघाडीवर आहे, ज्यात मध्य प्रदेशातील सहा, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातमधील प्रत्येकी चार आणि राजस्थानमधील एक जागा आहे. या जागांवर, सुद्धा भाजपाची घसरणच झाली असं म्हणता येईल कारण २०१९ मध्ये ST साठी आरक्षित ३१ जागा भाजपाच्या उमेदवारांनी जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये काँग्रेसचा ST जागांवरील विजयाचा आकडा हा ४ होता. तर २०१४ च्या निकालात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस पक्ष तब्बल १२ जागी आघाडीवर होता.