राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सी अर्थात सोप्या शब्दांत विद्यमान सरकारच्या कामगिरीबाबतची नाराजी प्रत्येक निवडणुकीत दिसून येत असल्याचा इतिहास आहे. गेल्या ३० वर्षांत राजस्थानमध्ये एकाही पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नाही. यंदाही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती दिसून आली. राज्यातील अशोक गहलोत सरकारकडून सातत्याने यंदा परंपरा मोडण्याचे दावे केले जात होते. स्वत: गहलोतही अनेकदा ही ‘जादू’ करण्याचे दावे करत होते. या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये नेमका काँग्रेसचा पराभव का झाला? यावर मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष व राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. पी. जोशींनी कारणमीमांसा केली आहे.
काय घडलं राजस्थानमध्ये?
राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. १९९ पैकी ११५ जागांवर भाजपानं विजय मिळवला. पण काँग्रेसला मात्र अवघ्या ६९ जागा मिळाल्या. भारत आदिवासी पक्षाला तीन, बहुजन समाज पार्टीला दोन तर राष्ट्रीय लोकदलानं एक जागा जिंकली असून आठ अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये एग्झिट पोल्सचे अंदाज जवळपास खरे ठरले आहेत.
सी. पी. जोशींनी केली कारणमीमांसा!
पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर व त्या त्या राज्यांमध्येही पराभवाच्या कारणांवर विचारमंथन सुरू झालं असून राजस्थानमधील मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष व पक्षात ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखले जाणारे सी. पी. जोशी यांनी पक्षाच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
“काँग्रेसचे वतनदार राहुल-प्रियांका गांधींच्या मेहनतीवर पाणी टाकतायत”, ठाकरे गटाची परखड टिप्पणी!
“गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ३९ टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीतही काँग्रेसनं ही मतं कायम राखली आहेत. आमच्या पराभवामागचं खरं कारण म्हणजे अशावेळी तुम्हाला निश्चित धोरण आखून तुमच्या मतदानाची टक्केवारी वाढवावी लागते. भाजपानं ते मोठ्या खुबीनं केलं हे मान्य केलंच पाहिजे. आम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील”, असं सी. पी. जोशींनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
कल्याणकारी योजनांचा फायदा झाला नाही?
दरम्यान, पक्षाला गहलोत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा झाला नसल्याचं सी. पी. जोशींनी मान्य केलं. “या योजनांचा उपयोग करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आम्हाला अपयश आलं. भाजपानं पक्षीय यंत्रणा राबवून ते चांगल्या प्रकारे केलं. मी सर्व २०० मतदारसंघांचा आढावा घेतलेला नाही. पण मी ढोबळपणे हे नक्कीच सांगू शकतो”, असं जोशींनी नमूद केलं.
संघटनात्मक कच्च्या दुव्यांचा परिणाम
“या पराभवामध्ये काँग्रेसच्या पक्षीय संघटनेमधील कच्च्या दुव्यांचं प्रतिबिंब दिसून येत आहे. कधीकधी जातीय समीकरणांमधून तुम्हाला आघाडी मिळत असते, कधी ती मिळत नाही. पण पक्षीय संघटना सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे पक्षासाठी दिवस-रात्र कामगिरी करणारी यंत्रणा तुम्हाला उभी करावी लागेल”, असंही जोशी म्हणाले.