Will Ganesh Naik promote Sandeep Naik? : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उभारलेले बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला मंगळवारी सकाळी होण्याची चिन्हे आहेत. संदीप यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक मंगळवारी सकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बोलावली असून या बैठकीत ते पुढील निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा वाशी येथील नवी मुंबई स्पोटर्स क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घ्यावी’ अशी भूमीका मांडल्याचे समजते. असे असले तरी संदीप नाईक मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. लेकाने बंडखोरी केली तर पिता गणेश नाईक त्यांचा प्रचाराला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत त्यांनी आज सविस्तर माहिती दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हेही वाचा >> संदीप नाईक यांचे ‘एकला चालो रे’, समर्थकांना हवी तुतारी… नवी मुंबईतील बंडाची दिशा आज ठरणार ?
पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहण्यास सांगितलं
गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, संदीप नाईक यांना बेलापूर येथून अपेक्षित असलेली उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. वडिलांना उमेदवारी मिळालेली असतानाही मुलगा बंडखोरी करणार असल्याने राज्यात आता नवं समीकरण पाहायला मिळणार आहे. याबाबत गणेश नाईकांना विचारले असता ते म्हणाले, “प्रश्न असा आहे की भाजपा शिस्तीचा पक्ष आहे. या पक्षात निर्णय घेईपर्यंत तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. पण दुराग्रह करण्याचा अधिकार या पक्षात नाही. मी संदीप नाईकांना बोललो की पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत राहावं.”
संदीप नाईकांचा प्रचार करणार नाही
ते पुढे म्हणाले, “संदीप नाईकही ऐरोलीतून आमदार राहिले आहेत, महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. ते परिपक्व आहेत. मला वाटलं ते मी त्यांना सांगितलं आहे.” संदीप नाईकांच्या प्रचाराला तुम्ही जाणार का असं विचारलं असता ते म्हणाले, “संदीप नाईकांच्या प्रचाराकरता जाणार नाही. मी ऐरोली मतदारसंघच सोडणार नाही.”
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघातून भाजपचे नेते गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बहुचर्चित बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांची उमेदवारी कायम ठेवताना भाजपने नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांना मात्र धक्का दिला.