“भारताला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं”, असं विधान काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केलं होतं. तिनं या विधानाचा पुनरुच्चार केलाय. कंगनाला भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसंच, भारत हिंदू राष्ट्र बनलेलं तिला पाहायचं आहे, असंही ती म्हणाली.
“आपले पंतप्रधान युगपुरूष आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी केली. त्यानंतर ब्रिटिशांची गुलामी पाहिली. त्यानंतर काँग्रेसचं हे कुशासन पाहिलं. त्यामुळे २०१४ मध्येच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. विचारांचं स्वातंत्र्य, सनातनचं स्वातंत्र्य, आपला धर्म बनवण्याचं स्वातंत्र्य, आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालं”, असं कंगना रणौत म्हणाली.
“जेव्हा १९४७ साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानला इस्लामिक रिपब्लिक बनवलं होतं तर, मग भारताला हिंदू राष्ट्र का नाही बनवलं? भारत देशाला आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार”, अशीही घोषणा कंगना रणौतने केली.
हेही वाचा >> Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
मंडीत कंगनाविरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह
सध्या हिमाचल प्रदेशच्या राजकारणातही उलथापालथ घडत असून, मरगळ आलेल्या आणि निराश झालेल्या काँग्रेसमध्येही काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
या जागेवरून काँग्रेसने कंगना रणौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे. विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेशचे तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे सुपुत्र आहेत. हे कुटुंब बुशहर राजघराण्याचे वंशज आहे.
हेही वाचा >> “पंतप्रधान मोदींनी रशिया अन् युक्रेनला केलेल्या मार्गदर्शनामुळेच…”; कंगना रणौतचं विधान चर्चेत!
कंगना रणौत निवडणुकीच्या राजकारणात नवखी आहे. ती बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध व गुणी अभिनेत्री असली तरीही ती वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून ती भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारांची पाठराखण करीत आली आहे. मात्र, ही निवडणूक जिंकण्यासाठी तेवढे पुरेसे ठरणार नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात. दुसऱ्या बाजूला विक्रमादित्य सिंह हे राज्यात मोठे राजकीय वजन असलेल्या एका मोठ्या राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.
या जागेच्या निकालाला इतके महत्त्व का?
भाजपा अशा आविर्भावात होते की, मंडी लोकसभेची निवडणूक आपल्याला सहजपणे जिंकता येईल. कंगना रणौतची स्वत:ची असलेली लोकप्रियता आणि वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता ही दोन कारणे त्यांच्या आत्मविश्वासामागे होती. मात्र, आता स्वत: वीरभद्र सिंह यांचा मुलगाच तिच्याविरोधात या जागेवरून उभा आहे. त्यामुळे कंगना रणौतला तिच्या स्वत:च्या जोरावर आणि नरेंद्र मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे.