महायुतीला राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली असून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? यावरही वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं-राज ठाकरे

यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. “नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असे आपणास आणि पक्षाला वाटलं” त्यामुळेच मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केले.

“देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. १९९२ पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिलंं आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेतं फेकण्यात आली. राम मंदिरासाठी चाललेले प्रदीर्घ आंदोलन विसरता येणार नाही. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसतं”, असे राज ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…

सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?

मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरवलेलं नाही. मतदान आलं की मैदानं बुक केली जातात. त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा, कुणाशी बोलायचं? याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती यादी त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will mns chief raj thackeray conduct rally for mahayuti candidate sunetra pawar and others raj thackeray gave this answer scj