पंजाबमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद तर सर्वश्रूत होते. कॅप्टन यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले, त्यानंतरही सिद्धूंनी स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका सोडलं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते मुख्यमंत्र्यांना सुनावत असतात. आताही सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नींना गंभीर इशारा दिला आहे.
“मी कोणत्याही पदासाठी राजकारणात नाही. माझ्या शो दरम्यान मी महिन्याला सुमारे ५० लाख रुपये कमावत होतो. आज मी महिन्याला ५० हजार रुपयांपेक्षा कमी कमावतो. पण जेव्हा मला पंजाबच्या लोकांची काळजी घेण्याचे काम दिले आहे, तेव्हा मी तडजोड करू शकत नाही,” असं सिद्धू म्हणाले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे की नाही, असं विचारलं असता ते म्हणाले, की “मला फक्त प्रचारासाठी वापरले जाणारे केवळ शोपीस बनायचे नाही.” न्यूज १८ने यासंदर्भात वृत्त दिलंय.
काँग्रेस पंजाबमध्ये चन्नी यांच्या माध्यमातून दलित कार्ड खेळतंय का?, असे विचारले असता, सिद्धू म्हणाले, “काँग्रेस कोणतेही कार्ड खेळत नाहीये. आमच्यासाठी लोकांचे कार्ड हेच महत्त्वाचे कार्ड आहे. चन्नी माझे मुख्यमंत्री आहेत, पण जर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही तर मी गप्प बसणार नाही,” असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांना दिलाय.