Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकरावर टीका केली आहे. काँग्रेसचा हा विजय म्हणजे मोदी आणि शाहांचा पराभव असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच, कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून वाद होतील का यावरही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. टीव्ही नाईन मराठीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“कर्नाटकच्या निकालामुळे देशाला आनंद झाला आहे. या निकालाकडे संपूर्ण देश पाहत होता. कर्नाटकातील निकाल जो काही लागणार होता तो २०२४ साली दिल्लीचा दरवाजा कोणासाठी उघडला जाईल याचा फैसला होता. लोकमानस आणि जनमानस आज कळणार होता”, असं सजंय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आज देशात दोन निकाल लागले आहेत. कर्नाटकात लागला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये नगरपालिका आणि पंचायतीमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. पण ते योगी आदित्यनाथ यांचं यश आहे. परंतु, कर्नाकटातील काँग्रेसचा विजय हा मोदी आणि शहाांचा दारुण पराभव आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> Karnataka Election : “मोदी-शाहांनी हा पराभव स्वीकारावा, कारण या दोन नेत्यांनी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरीही मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. कारण, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “डी. के. शिवकुमार महत्त्वकांक्षा असलेले खूप मोठे नेते आहेत. भारतीय जनता पक्षाने आमच्यासारखं त्यांना तुरुंगातही पाठवलं होतं. परंतु, ते मागे हटले नाहीत. ते गांधी परिवाासोबत निष्ठेने राहिले. काँग्रेस पक्षाचे ते प्रांताध्यक्ष आहेत. कर्नाटकच्या यशामध्ये शिवकुमार यांचा सहभाग फार मोठा आहे. निरिक्षक, राजकीय विश्लेषक म्हणून आम्ही ते पाहत होतो. डी शिवकुमार यांनी किती मेहनत घेतली. सगळी साधनं वापरून त्यांनी काँग्रेसला विजयापर्यंत नेलं. ते त्या राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांना त्यांचं श्रेय मिळायला पाहिजे. पण मुख्यमंत्री पदावरून वाद होतील असं मला वाटत नाही. काँग्रेस पक्षात खर्गे अध्यक्ष आहेत ते त्याच राज्याचेच आहेत.”
हेही वाचा >> “महाबीर बिक्रम बजरंगी…”, कर्नाटकातील निकालानंतर आव्हाडांचा भाजपाला खोचक टोला; म्हणाले, “खुद्द प्रभू हनुमानाला…”
“कर्नाटकच्या विजयामुळे राहुल आणि प्रियंका गांधी यांची पक्षावरील पकड घट्ट झाली आहे. या विजयामुळे देशामध्ये वेगळं वातावरण निर्माण होईल आणि काँग्रेस पक्ष पुन्हा अशा स्थिती येऊ शकतो की भविष्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहतील. अशावेळेला बंडखोरी करणारे फार काळजीपूर्वक करतात. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून वाद होतील असं मला वाटत नाही”, असंही संजय राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.