१८ व्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. परंतु, भाजपाने ३०० ची संख्याही गाठलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करू शकते, अशी चर्चा आहे. या चर्चेवर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही एका पक्षाविरोधात लढलो नाही. आम्ही प्रशासकीय व्यवस्थेविरोधात लढलो. देशातील विविध संस्थांविरोधात लढलो. आम्ही ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग यांच्याविरोधात लढलो. कारण या संस्था नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ताब्यात घेतल्या आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >> 2024 Lok Sabha Election Result Live pdates : “आमची बँक खाती गोठवली, पण तरीही…”, राहुल गांधींच्या जल्लोषानंतर खरगेंची प्रतिक्रिया

इंडिया आघाडी विरोधी बाकावर बसणार की सत्ता स्थापनेचा दावा करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, याबाबत आम्ही इंडिया आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहोत. उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार असून या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

जुन्या घटकपक्षांना पुन्हा सामील करून घेणार का?

तसंच, इंडिया आघाडीत असलेले अनेक पक्ष एनडीएत सामील झाले आहेत. सत्ता स्थापनेसाठी त्यांना पुन्हा आघाडीत घेणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीतच हा निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “इंडिया आघाडीतील नेत्यांबरोबर चर्चा केल्याशिवाय आम्ही माध्यमांना यासंदर्भातल कोणतंही स्टेटमेंट देणार नाही.”

“ही निवडणूक संविधान वाचवण्याकरता होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह देशाला नकोय हेच नागरिकांनी सांगितलं आहे. या देशातील गरिबांनी हे संविधान वाचवण्याचं काम केलं”, असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे यापैकी कोणती जागा निवडायची हे अद्याप ठरवलं नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.

सत्तास्थापनेबाबत मल्लिकार्जून खरगेंनाही विचारण्यात आलं होतं, त्यावर त्यांनीही राहुल गांधीप्रमाणेच उत्तर दिलं. तसंच, आम्ही आता आमची रणनीती सांगितली तर मोदींना आमची स्ट्रॅटेज समजेल, असंही ते पुढे उपरोधिकपणे म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will you form the government now or will you sit against it to the question rahul gandhi said sgk