Aaditya Thackeray Won Worli Vidhan sabha Constituency : वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई आणि संपूर्ण राज्यासाठी हा मतदारसंघ हायवोल्टेज होता. ठाकरे कुटुंबाची आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा आणि एकनाथ शिंदेंना नमवण्यासाठी हा मतदारसंघ काबूत करणे ठाकरे कुटुंबीयांसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी रणशिंग फुंकले होते. अखेर आज मतमोजणीत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. आदित्य ठाकरे ८ हजार ४०८ मतांनी विजयी झाले आहेत.
वरळी विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राऊंड हॉल येथे होते. या मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्येक व्यक्तीची चोख तपासणी व ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात होता.
हेही वाचा >> Worli Assembly Election Result 2024 Live Updates: १६ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर वरळीत आदित्य ठाकरे…
आदित्य ठाकरेंना किती मते मिळाली?
आदित्य ठाकरे यांना ६३ हजार ३२४ मते मिळाली असून मिलिंद देवरा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना ५४ हजार ५२३ मते मिळाली असून मनसेचे संदीप देशपांडे यांना १९ हजार ३६७ मते मिळाली आहेत.
शिंदेसेना आणि मनसेच्या उमेदवारामुळे आदित्य ठाकरेंना फायदा
शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आदित्य ठाकरे, शिवसेनेचे (शिंदे) मिलिंद देवरा, मनसेचे संदीप देशपांडे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. ठाकरे यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याची भाजप आण शिंदे गटाची खेळी होती. पण शिवसेना (शिंदे) आणि मनसेचे उमेदवार परस्परांच्या विरोधात समोर असल्याने आदित्य ठाकरे यांचा मार्ग अधिक सोपा झाला. लोकसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. तेव्हा शिवसेना (शिंदे), भाजप आणि मनसे एकत्र होते. यंदा मनसे व शिवसेना (शिंदे) स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे होणारे मतांचे विभाजन व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम या बाबी आदित्य ठाकरे यांच्या पथ्यावर पडल्या.
वरळी परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबई महानरपालिका निवडणुकीत वरळी विभागातील सर्व प्रभागांमधून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तसेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्त्व अशी ओळख असलेले सचिन अहिर हेही शिवसेनेत दाखल झाल्यामुळे वरळी शिवसेनेचा अभेद्या गड बनला होता. तसंच, आता दोन टर्म आदित्य ठाकरेंनी हा गड राखला आहे.