Yashomati Thakur’s Allegation: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस आमदार आणि तिवसा मतदारसंघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. यासह ठाकूर यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांचे हे आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांच्यावर आरोप करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “यापूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणले, त्यांनी पैशांची मदत मागितली ती सुद्धा केली होती. आता काल-परवा त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि २५ लाख रुपयांची मागणी केली. ते व्यापारी प्रवृत्तीचे असल्याने सदैव ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात.”

सुनील वऱ्हाडेंचे प्रत्युत्तर

माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील वऱ्हाडे यांनी पलटवार करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वऱ्हाडे म्हणाले, “मी माझ्या घरी बसलेलो आहे, पक्षाबरोबर कुठेच गडबड केली नसून, पक्षाशी निष्ठावंत आहे. आता त्यांनी चालवलेला हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की, तोट्याचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.”

हे ही वाचा: सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? बाळासाहेब ठाकरेंसह माजी पंतप्रधांनांची कशी होती भूमिका? सदानंद सुळेही पडले होते गोंधळात!

तिवसा मतदारसंघ

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा सुमारे ११ हजार मतांनी विजय विजय मिळवला होता. यंदा यशोमती ठाकूर यांच्यासमोर महायुतीकडून भाजपाचे राजेश वानखेडे यांचे आव्हान असणार आहे. गेल्या वेळी ही जागा शिवसेनेकडे होती, तर आता इथून भाजपाचे उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर भाजपाचा सामना कसा करणार याबाबत मतदारसंघाच चर्चा सुरू आहे.

यंदा राज्याच्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मजमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान आता अवघ्या तीन दिवसांवर आल्याने राजभरात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakurs allegation that sunil karhade of ncpsp party demanded rs 25 lakhs aam