Yogendra Yadav on Haryana Assembly Election Result: हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये एग्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपानं जोरदार आगेकूच केली आहे. काँग्रेसच्या बहुमताचे आकडे फोल ठरले असून प्रत्यक्ष निकालांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपानं ५० जागा जिंकत स्वबळावर बहुमत प्राप्त केलं आहे. त्यामुळे हरियाणातील निकाल सगळ्यांसाठीच चर्चेचा ठरला असताना त्याबाबत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाष्य केलं आहे. निकालांच्या आधी योगेंद्र यादव यांनी हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो खरा न ठरल्यामुळे त्यावर योगेंद्र यादव यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय आहेत हरियाणाचे अंतिम निकाल?
हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाच्या अंतिम आकडेवारीनुसार, ९० जागांपैकी भारतीय जनता पक्षाला ५० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं ३४ जागांवर विजय मिळवला असून इतर पक्षांचे ६ उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे ज्या जननायक पक्षाशी भाजपानं गेल्या निवडणुकांनंतर युती केली होती, ज्या पक्षामुळे २०२०मध्ये हरियाणात राजकीय भूकंप झाला, त्या दुष्यंत चौटालांच्या जननायक पक्षाला मतदारांनी साफ नाकारलं. जेजेपीला एकही जागा जिंकता आलेली नाही.
हरियाणातील निकालांवर काय म्हणाले योगेंद्र यादव?
योगेंद्र यादव यांनी हरियाणा निकालांवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “हरियाणाचे निकाल पाहून मला आश्चर्य वाटलं. काँग्रेसची संध्याकाळची पत्रकार परिषद ऐकून मी थोडा चिंतेतही आहे. मला नेमकं माहिती नाही की काय घडलंय. मी महिन्याभरापासून सांगत होतो की काँग्रेस स्पष्टपणे पुढे आहे, काँग्रेसचंच सरकार बनेल वगैरे. पण आज जे घडलं ते पूर्णपणे वेगळं होतं. उलटंच काहीतरी झालं. भाजपाचं बहुमत येईल असं कुणीच म्हटलं नव्हतं”, असं योगेंद्र यादव म्हणाले.
काँग्रेसच्या आरोपांवर भाष्य
“काँग्रेसनं पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. त्यांचा आरोप हा आहे की काही ईव्हीएम मशीन मतमोजणीदरम्यान उघडल्यावर त्यात जवळपास ९९ टक्के बॅटरी शिल्लक होती. आता इतके तास काम केल्यानंतरही ९९ टक्के बॅटरी कशी शिल्लक राहिली? ज्या ठिकाणी असं घडलं, तिथे काँग्रेसची कामगिरी खराब झाल्याचं दिसलं. थोडक्यात आरोप हा आहे की त्या इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे”, असं यादव म्हणाले. “हे प्रकरण गंभीर आहे. याचा तपास व्हायला हवा. निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकाराबाबत देशाला आश्वस्त करायला हवं. कदाचित आयोगाचं म्हणणं खरं असेल. पण निवडणूक आयोगानं जनतेसमोर सर्व तथ्ये ठेवावीत”, असं आवाहन त्यांनी केलं.
प्रतिकूल परिस्थितीतही हरियाणाच्या चाव्या भाजपाकडेच राखणारे नायब सिंग सैनी!
“या निकालांमुळे शेतकरी आंदोलनाचा प्रभाव कमी होत नाही. या आंदोलनामुळेच काँग्रेस स्पर्धेत होती. पण इतर गोष्टींचं काय? लोकांच्या मनात ही शंका होती का की काँग्रेसचं सरकार आलं तर एका जिल्ह्याची, एका जातीची, एका कुटुंबाची सत्ता येईल? या शंकेचं निरसन झालं का? निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून तेवढी तत्परता दाखवण्यात आली का? काँग्रेसव्यतिरिक्त सामाजिक संघटनांनी तेवढं काम केलं का?” असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
या निकालांचा वापर भाजपाची प्रतिमा सुधारण्यासाठी?
“महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमध्ये आधीपेक्षा जास्त गांभीर्याने काम करणं गरजेचं आहे. हरियाणात निकालांचं जे काही कारण असेल ते असेल. पण आता भाजपाची प्रतिमा सुधारण्यासाठी या निकालांचा वापर केला जाईल. जणूकाही लोकसभा निवडणूक निकालांमधून भाजपाला काही धक्का बसलाच नव्हता. महाराष्ट्र व झारखंडमध्ये अधिक मेहनत घेऊन काम करावं लागेल”, असं योगेंद्र यादव म्हणाले.