पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देशाची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटणार असल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर अशाच प्रकारचा आरोप केला आहे. आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसने त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशात ‘शरिया कायदा’ लागू करण्याची आणि देशाचं विभाजन करण्याची इच्छा मांडली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील भाजपाच्या प्रचारसभेत आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपल्या देशाशी गद्दारी केली आहे. आणखी एकदा गद्दारी करण्यासाठी त्यांनी खोटी आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत.
आदित्यनाथ म्हणाले, तुम्ही एकदा काँग्रेसचा निवडणुकीचा जाहीरनामा पाहा, त्यात त्यांनी म्हटलंय की देशात आमचं सरकार आल्यावर आम्ही शरिया कायदा लागू करू. अता मला तुम्हीच सांगा आपला हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर चालणार आहे की शरिया कायद्याने चालणार? काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलंय कारण मोदींनी ट्रिपल तलाकची प्रथा रोखली आहे. परंतु, काँग्रेसवाले म्हणतायत की, ते पुन्हा एकदा व्यक्तिगत कायदा (पर्सनल लॉ) बहाल करतील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे की, त्यांचं सरकार आलं तर ते जनतेची संपत्ती ताब्यात घेऊन त्याचं वाटप करणार. मला जनतेला विचारायचं आहे की, तुम्ही काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला तुमच्या संपत्तीवर दरोडा टाकण्याची सूट देणार आहात? एका बाजूला या काँग्रेसवाल्यांची तुमच्या संपत्तीवर नजर आहे आणि दुसऱ्या बाजूला माफिया आणि गुन्हेगारांना आपल्या गळ्यातील ताईत बनवून ते राज्यात फिरतायत.
हे ही वाचा >> “रॉबर्ट वाड्रा अब की बार”, राहुल गांधींच्या उमेदवारीवरील सस्पेन्सदरम्यान अमेठीत पोस्टर्स; इराणी म्हणाल्या, दाजींची नजर…
आदित्यनाथ देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या २००६ मधील एका भाषणाचा दाखला देत म्हणाले, आपले आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं होतं की, देशातील संसाधनांवर सर्वात पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. असं असेल तर मग आमचे दलित कुठे जाणार, मागसवर्गीय लोक कुठे जाणार? ओबीसी, पाल आणि गरीब शेतकरी कुठे जाणार? आमच्या माता-बहिणी कुठे जाणार? देशातले तरुण कुठे जाणार?