उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपाकडून सत्ता राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्याकडून उत्तर प्रदेशमधली सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी पूर्ण जोर लावला जात आहे. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून विरोधी पक्षावर आणि नेत्यांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे उत्तर प्रदेशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळी राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
काही दिवसांपासून राहुल गांधींच्या हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यासंदर्भातील विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन्ही गोष्टी भिन्न असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं असून त्या एकच असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. यासंदर्भात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
“हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद हे त्यांना…”
अमेठीतल्या प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “साधं मंदिरात कसं बसतात, हे देखील अमेठीच्या माजी खासदारांना (राहुल गांधी) माहिती नाही. त्यांनी ज्या मंदिराला भेट दिली, तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना कसं बसतात हे शिकवलं आहे. हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद काय आहे, हे त्यांना माहितीच नाही. पण ते चुकीचा प्रचार करत आहेत”.
राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावरून विरोधकांचा निशाणा; पाठराखण करत सिद्धू म्हणाले, “राहुल गांधी देश….”
“करोना काळात विरोधकांचा एकही नेता…”
दरम्यान, यावेळी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांवर देखील टीका केली. “काँग्रेस, सपा किंवा बसपाच्या एकाही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने किंवा कार्यकर्त्याने करोना काळात लोकांना मदत केली नाही. यात त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. जशा निवडणुका आल्या, ही लोकं इथे आली. निवडणुका झाल्यानंतर पुढची साडेचार वर्ष ते गायब होतील. इथे दिसणार देखील नाहीत”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.