Lok Sabha Election Result 2024 Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसरी लोकसभा निवडणूकही एकतर्फी होईल, असे अंदाज अनेक राजकीय विश्लेषक, रणनितीकारांनी व्यक्त केले होते. तसेच बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवलेले निष्कर्ष, भाजपासमर्थकांनी केलेले दावे आणि माध्यमांचे अंदाज खोटे ठरवत भारतीय मतदारांनी मंगळवारी (४ जून) दहा वर्षांनी पहिल्यांदाच संमिश्र कौल दिला. भाजपाने ‘अब की बार ४००’ पारचा दावा केला होता खरा, मात्र त्यांचा पक्ष २५० जागादेखील जिंकू शकला नाही. तसेच एनडीएतील (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सर्व पक्ष मिळून ३०० जागांपर्यंत मजल मारू शकले नाहीत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुढील सरकार स्थापन करणार हे निश्चित असलं, तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आघाडी सरकार येणार आहे. मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किंवा त्याआधी १३ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत कधीही आघाडी सरकारच्या माध्यमातून कारभार केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सर्वस्वी नवीन प्रयोग असणार आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. परिणामी भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचं अपयश स्वीकारलं आहे. पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानले आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की भारताच्या जनता जनार्दनाने आम्हाला तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिलं आहे. अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणं, त्यांचं नेतृत्व आणि निर्णयांमुळे देशातील जनतेने मोदींना पसंती दर्शवली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहर उमटवली आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. भाजपा आणि एनडीएशी जोडलेल्या मित्रपक्षांच्या सर्व कार्यर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आभार. तसेच आमच्यावर विशवास टाकणाऱ्या जनतेचे आभार.

हे ही वाचा >> “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात”, लोकसभेच्या निकालानंतर रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “मारून मुटकून…”

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची जोरदार मुसंडी

उत्तर प्रदेशमध्ये यंदादेखील भाजपाचं वर्चस्व असेल असा दावा अनेक एक्झिट पोल्समध्ये करण्यात आला होता. हे राज्य गेल्या १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ६२ जागा जिंकल्या होत्या. यावर्षी भाजपाला ६० ते ७५ जागा मिळतील असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले होते. मात्र उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने सर्वाधिक ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ३३, काँग्रेसने ६, राष्ट्रीय लोक दलाने २, आझाद समाज पार्टीने १ जागा जिंकली आहे.