लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांपर्यंत सर्व मोठे भाजपा नेते आणि स्टार प्रचारक देशभर भाजपा उमेदवारांचा प्रचार करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या बाबतीत आघाडीवर आहेत. आदित्यनाथ यांनी आज चंदीगड येथे भाजपा उमेदवार संजय टंडन यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं. भाजपाने यंदा चंदीगडच्या खासदार किरण खेर यांचं लोकसभेचं तिकीट कापलं असून त्यांच्या जागी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. टंडन यांच्या प्रचारसभेत बोलताना आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. “देशावर संकट आल्यावर राहुल गांधी पळून जातात”, अशा शब्दांत आदित्यनाथ यांनी टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, तुम्ही देशावरची आजवरची संकटं आठवण पाहा. देशावर जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा तेव्हा देश सोडून पळून जाणाऱ्या लोकांमध्ये राहुल गांधींचं नाव देखील दिसलं आहे. कधीही, कुठेही, कसल्याही प्रकारचं संकट आलं तरी राहुल गांधी सर्वात आधी पळून जातात. मुळात देशात संकटं निर्माण करणारे लोक हेच आहेत. या काँग्रेसवाल्यांनीच देशात अनेक संकटं निर्माण केली आहेत. यांनी देशात अनेक समस्या, दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार आणि अराजकता निर्माण केली. यासह त्यांनी देशात कधीच कायदा आणि सुव्यवस्था राखली नाही.
योगी आदित्यनाथ म्हणाले, देशावर आणि जगावर आतापर्यंतचं सर्वात मोठं संकट आलं तेव्हाही काँग्रेस मदतीला आली नाही. जगावर करोनाचं संकट आलं होतं तेव्हा राहुल गांधी लोकांच्या मदतीसाठी पुढे आले का? कुठे मदत करताना दिसले का? राहुल गांधी उत्तर प्रदेशात किंवा चंदीगडला आले होते का? राहुल गांधी तेव्हा खासदार होते. मात्र ते लोकांची मदत करण्यासाठी पुढे आले नाहीत. आम्ही भाजपावाले मात्र लोकांची मदत करत होतो.
हे ही वाचा >> Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, सेवा हीच संघटनेची शक्ती आहे. त्यामुळे या संकटकाळात लोकांची सेवा करा. त्यानुसार आम्ही सर्वजण लोकांची सेवा करत होतो. मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून गावोगावी फिरत होतो. आमच्या राज्यात एक कोटी प्रवासी आले होते. हे प्रवासी बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड असे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार होते. आम्ही त्यांची उत्तर प्रदेशात राहण्याची आणि तिथून आपापल्या घरी परतण्याची व्यवस्था केली होती. या लोकांसाठी आम्ही १४,००० बसेस सुरू केल्या होत्या.