उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या लोकांना त्याचा फटका बसतो. जर हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं तरी कशी सुरक्षित राहतील. हिंदू सुरक्षित राहिला तर मुसलमान सुरक्षित राहील. आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दंगल होऊ दिली नाही.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, १९९० साली आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेमध्ये अनेक पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचं पाप समाजवादी पार्टीने केलं आहे. १९९० मध्येच नव्हे तर त्यानंतरही जेव्हा जेव्हा समाजवादी पार्टीला संधी मिळाली, त्यावेळी कोणतीही व्यक्ती सुरक्षित राहिली नाही. समाजवादी पार्टीच्या कार्यकाळात दंगलीच्या आगीत उत्तरप्रदेश जळत होता. आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की आम्ही उत्तरप्रदेशाला दंगलमुक्त केलं आहे.
अयोध्या-काशीनंतर मथुराविषयी प्रश्न विचारल्यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्या गतवैभवाला पुन्हा मिळवण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. भारत आणि भारतीय असण्याचा आपल्याला अभिमान वाटावा यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. अयोध्या, काशीप्रमाणे मथुरेचाही विकास होईल. ज्याच्यात दम असेल तोच मथुरा घडवून दाखवेल.
योगी पुढे म्हणाले, जे लोक म्हणायचे की निर्णय येईल त्यावेळी रक्ताचे पाट वाहतील. त्या लोकांनी पाहिलं आहे की आम्ही कशा पद्धतीने भव्य राममंदिर उभारण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. राष्ट्रवाद हा आमचा अजेंडा आहे. राममंदिर सांस्कृतिक राष्ट्रवादाचा एक भाग आहे. विश्वनाथ धाम आणि कुंभही त्याचाच एक भाग आहे. पावन भूमीला भव्यदिव्य बनवणं हाच आमच्या राष्ट्रवादाचा एक भाग आहे.