उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ते कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. कोणत्या जागेवरून त्यांना निवडणूक लढवायची आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, “पक्ष सांगेल तिथूनच मी लढेन. कोणत्याही जागेला माझी वैयक्तिक पसंती नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. भाजपाच्या तीनशेहून अधिक जागा येतील,” असा दावा त्यांनी केला. योगी आदित्यनाथ यावेळी विधानसभा निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल.
योगी आदित्यनाथ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी आतापर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यावर्षी निवडणूक लढवल्यास ती त्यांची पहिली विधानसभा निवडणूक ठरेल.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले. “माझ्या निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही शंका नाही. पण मी कुठून निवडणूक लढवायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल.” योगी सध्या उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य आहेत. ‘निवडणूक कधी होणार’ या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल आणि निवडणुकीच्या वेळी करोना प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जाईल.”
पाच वर्षांच्या कार्यकाळात ते करू शकलेले नाही असे काही काम आहे का, असे योगींना विचारले असता ते म्हणाले, “आम्ही आश्वासन दिलेल्या सर्व गोष्टी आम्ही केल्या. असे कोणतेही काम उरले नाही ज्यासाठी मला पश्चात्ताप वाटेल.” दरम्यान, काही भागातील आमदारांवर जनता नाराज असल्याचं दिसतंय. या नाराजीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, “सध्या आमच्या जनविश्वास यात्रा निघत आहेत. आमच्या जनविश्वास यात्रा ३ जानेवारीला पूर्ण होत आहेत. यानंतर राज्यात अधिक चांगले वातावरण पाहायला मिळेल.”