Yogi Slogans Posters in Mumbai : राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस चढत जातेय. जागावाटप, उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू झालीय. दरम्यान, पक्षांच्या समर्थकांकडून प्रचारही सुरू झाला आहे. दरम्यान, मुंबईतील अनेक भागांमध्ये बटेंगे तो कटेंगेचे पोस्टर लागले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हे घोषवाक्य असून हरियाणा विधानसभा निवडणुकीतही याचा वापर करण्यात आला होता. आता, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही हे घोषवाक्य ऐकायला मिळतंय. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

भाजपाचे समर्थक विश्वबंधू राय यांनी हे पोस्टर ठिकठिकाणी लावले आहेत. याबाबत ते म्हणाले, “विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आम्ही त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. उत्तर भारतातील नागरिक योगी आदित्यनाथ यांना मानतात, तसंच त्यांचं घोषवाक्य बटेंगे तो कटेंगे यावरही विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातही विरोधकांच्या डावपेचांना अशापद्धतीने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. हरियाणातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला कशाप्रकारे समर्थन दिलं हे आपण पाहिलंच आहे. हीच युक्ती आम्ही महाराष्ट्रातही वापरणार आहोत.”

हेही वाचा >> Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”

योगी आदित्यनाथांनी सत्य जगासमोर आणलं

तसंच, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण झी न्यूजसह याबाबत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत एका समाजाने पूर्ण ताकदीने एका उमेदवाराला पूर्णपणे समर्थन दिलं. हे देश आणि जगाने पाहिलंय. बटंगे तो कटेंगचं सत्य योगी आदित्यनाथ यांनी जगासमोर आणलं. हिंदू समाज या घोषवाक्याला ऐकेल अशी माझी आशा आहे.”

भाजपाने रविवारी ९९ मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. इतर पक्षांकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अर्ज भरण्यास सुरुवात, पण जागावाटप रखडले

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज, मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावर अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. भाजपची यादी जाहीर झाल्यावर पक्षातील नाराज नेत्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे.  महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या जागावाटपावर अजूनही सहमती झालेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला ८० पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने जागावाटप अडल्याचे सांगण्यात आले.