झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”

Zeeshan Siddique : उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.

Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकी महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. (PC : Shivsena UBT YT, Zeeshan Siddique Insta)

Zeeshan Siddique vs Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून शिवसेनेने (ठाकरे) त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे यांनी अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीमधील एका उमेदवाराच्या नावाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, ते नाव म्हणजे वरुण सरदेसाई! शिवसेनेने (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अंगणातील मतदारसंघ म्हणजेच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी (२३ ऑक्टोबर) उद्धव ठाकरे यांनी वरुण यांना पक्षाचा एबी फॉर्म देखील दिला.

वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर सुरुवातीपासून शिवसेनेची पकड आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. २०१९ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटला आणि काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. शिवसेनेने केलेल्या एका चुकीमुळे त्यांना त्यांचा बालेकिल्ला गमवावा लागला. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी येथील विद्यमान आमदार आहेत.

हे ही वाचा >> २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

झिशान सिद्दिकी बंड करणार?

झिशान सिद्दिकी सध्या महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांची म्हणजेच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. या दुःखातून सावरत झिशान सिद्दिकी हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, मात्र मविआने त्यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी आता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी देखील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार) प्रवेश केला होता. त्यामुळे झिशान सिद्दिकी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. महावुतीतील कोणत्याही पक्षाने अद्याप वांद्रे पूर्वमधील त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

हे ही वाचा >> मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

झिशान सिद्दिकी काय म्हणाले?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने वांद्रे पूर्वमधून उमेदवार जाहीर केल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जुन्या मित्रांनी (उद्धव ठाकरे) वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. यांनी कधीच कोणाची साथ दिली नाही. जो आदर आणि सन्मान देईल त्याच्याबरोबरची नाती सांभाळा, आपापल्या फायद्यांसाठी जमलेल्या गर्दीचा काहीच फायदा नसतो. आता जनता निर्णय घेईल!”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zeeshan siddique slams uddhav thackeray maharashtra assembly candidates list vandre east varun sardesai asc

First published on: 24-10-2024 at 09:43 IST
Show comments