करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या दैनंदीन व्यवहारांसाठी बँकांमधून रोख रक्कम काढण्याला सर्वसामान्यांनी प्राधान्य दिल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच देशातील नागरिकांच्या हाती सर्वाधिक रोख रक्कम असण्याचा उच्चांक नुककाच गाठला गेला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध आणि लॉकडाउनमुळे हातात पैसा रहावा म्हणून अनेकांनी बँकांमधून पैसे काढले असून ७ मे २०२१ च्या पंधाठवड्यात भारतीयांकडे रोख रक्कम असण्याचा उच्चांक गाठला गेला. मात्र एकीकडे इंडिया डिजिटलाइज होत असताना, ऑनलाइन व्यवहार वाढलेले असतानाच दुसरीकडे लोक एवढ्या मोठ्याप्रमाणात स्वत:कडे रोख रक्कम का ठेवत आहेत?, यामागील कारणं काय आहेत? मागील एका वर्षांमध्ये स्वत:कडे रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाण का वाढलं आहे याचसंदर्भात आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

काय माहिती समोर आलीय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ७ मे २०२१ रोजी संपलेल्या पंधराठवड्यात लोकांकडे असणाऱ्या एकूण रोख रक्कमचा हा आकडा ३५ हजार ४६४ कोटींनी वाढून २८.३९ लाख कोटींवर पोहचला आहे. मागील १४ महिन्यांमध्ये म्हणजेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून लोक स्वत:कडे रोख रक्कम ठेवण्याचा प्राधान्य देत आहेत. करन्सी विथ द पब्लिक म्हणजेच लोकांनी स्वत:कडे ठेवलेल्या पैशांमध्ये ५.३ लाख कोटींनी वाढ झालीय.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

हे असं कधीपासून होत आहे?

करोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून म्हणजे मागील १४ महिन्यांमध्ये लोकांनी स्वत:कडे पैसे ठेवण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसलं. केवळ जुलै २०२० नंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर स्वत:कडे पैसे ठेवण्याचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसून आलं. मात्र आता २०२१ मध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा लोकांनी स्वत:कडे पैसे ठेवण्याचा कल वाढल्याचं दिसून आलं आहे.

तुलनात्मक आकडेवारी काय सांगते?

१ मार्च २०२१ ते ७ मे २०२१ या कालावधीमध्ये लोकांनी स्वत:कडे रोख रक्कम टेवण्याचं प्रमाण १.०४ लाख कोटींनी वाढलं आहे. यामुळेच लोकांकडे असणाऱ्या रोख रक्कमेने पहिल्यांदाच २८.३९ लाख कोटींचा टप्पा गाठलाय. यापूर्वी कधीही देशातील सर्वसामान्य नागरिकांकडे एकाच वेळी एवढी रोख रक्कम नव्हती.

नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

यापूर्वी १ मार्च २०२० ते १९ जून २०२० दरम्यान अशी वाढ दिसून आली होती. त्यावेळी भारतीयांकडे असणाऱ्या रोख रक्कमेममध्ये ३.०७ लाख कोटींनी वाढ झाली होती. त्यामुळेच २८ फेब्रुवारीला संपलेल्या पंधराठवड्यात २२.५५ लाख कोटींच्या आकड्यावरुन १९ जूनच्या पंधराठवड्यापर्यंत हा आकडा २५.६२ लाख कोटींपर्यंत पोहचला होता. २०२० मध्ये मार्च आणि जून महिन्यांदरम्यान लोकांनी खूप मोठ्याप्रमाणात बँकांमधून आणि एटीएममधून रोख रक्कम काढली. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हाती पैसा असलेला बरा या विचाराने अनेकांनी मोठ्याप्रमाणात घरात रोख रक्कम काढून ठेवली होती.

या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान लोकांकडे असणाऱ्या रोख रक्कमेमध्ये २२ हजार ३०५ कोटींनी वाढ झाली होती. त्यानंतर डिसेंबर ते जानेवारीदरम्यान ही वाढ ३३ हजार ५०० कोटी इतकी होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा सणांचा महिना होता तरी लोकांकडे असणाऱ्या रोख रक्कमेममध्ये ८८ हजार ३०० कोटींनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं होतं.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

लोक स्वत:कडे रोख रक्कम का ठेवत आहेत?

सामान्यपणे अनिश्चिततेचं सावट असताना लोकांकडे असणाऱ्या रोख रक्कमेममध्ये म्हणजेच पब्लिक कॅश होल्डींगमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतं. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्यानंतरही असच झालं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशात करोनाचे दैनंदीन एक लाख रुग्ण आढळून येत असतानाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा आकडा चार लाखांपर्यंत गेला. त्यामुळेच केंद्र सरकारकडून कठोर निर्बंध आणि लॉकडाउनची घोषणा केली जाईल असा अंदाज प्रसारमाध्यमांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वचजण लावत होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २०२० प्रमाणे देशभरात कठोर लॉकडाउन लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हे लोकांकडील रोख रक्कमेच्या प्रमाणात वाढ होण्याचं एक कारण असलं तरी दुसरीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेत आप्तकालीन परिस्थितीमध्ये हाती पैसा असावा म्हणूनही अनेकांनी बँकांमधून पैसे काढून घरी ठेवल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

करोनाशी काय संबंध?

अनेक राज्यांनी करोनाच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाईट कर्फ्यू, विकेण्ड लॉकडाउन आणि कठोर निर्बंधांचा पर्याय निवडला. मात्र तरीही करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने टप्प्याटप्प्यांमध्ये निर्बंध वाढवण्यात आले. त्यामुळेच अनेक राज्यांमध्ये दैनंदिन व्यवहारांसाठी लोकांनी अधिक पैसा स्वत: जवळ ठेवल्याचं दिसून आलं.

बँकिंग श्रेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेक प्रकरणामध्ये करोनाच्या कालावधीमध्ये रोजगार गमावल्याने लोकांचे पगार बंद झाले. त्यामुळेच त्यांनी बँकांमधील आपल्या बचत खात्यांमधून मासिक खर्च भागवण्यासाठी पैसे काढण्यास सुरुवात केली. हे सुद्धा लोकांकडे असणारी रोख रक्कम वाढण्यामागील एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

भविष्यातही असाच कल दिसणार का?

करोनाच्या साथीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत असून अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे. त्यामुळेच भविष्यातही स्वत:कडे रोख रक्कम ठेवण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात. पुढील काही महिन्यांसाठी तरी लोक स्वत:कडे पैसे ठेवण्याला प्राधान्य देतील. आरोग्यासंदर्भातील आप्तकालीन परिस्थितीमध्ये पैशांची गजर लागू शकते किंवा निर्बंध आणि इतर कारणांमुळे अचानक पैशांची गरज पडली तर या शक्यतेमुळे लोक स्वत:कडे पैसे ठेवण्याला प्राधान्य देतील असं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना काळात रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS म्हणजे काय?, त्याचा अर्थ काय असतो?

नोटबंदीनंतर कॅशलेसऐवजी लोकांनी स्वत:कडे पैसे ठेवण्याचं प्रमाण वाढलं

आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीमध्ये लोकांनी स्वत:कडे रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाण मागील वर्षभरामध्ये वाढलं आहे. भारतामधील व्यवहार हे कॅशलेस करण्याच्या उद्देशाने सरकारने नोटबंदी केल्याचं २०१६ मध्ये जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर लोकांकडील रोख रक्कमेमध्ये ५८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने नोटबंदीची घोषणा केल्यानंतर लोकांकडे असणाऱ्या रोख रक्कमेममध्ये १०.४ लाख कोटींनी किंवा ५८ टक्क्यांनी वाढ झालेली. ४ नोव्हेंबर २०१६ लोकांकडे असणारा रोख रक्कमेची आकडेवारी १७.९७ लाख कोटी इतकी होती.