देशामध्ये करोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच माहिती अधिकार अर्जाअंतर्गत एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ११ एप्रिलपर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या एकूण लसींपैकी २३ टक्के लसी न वापरताच वाया गेल्या आहेत. देशभरामध्ये वाया गेलेल्या लसींची संख्या ४५ लाखांच्या आसपास आहे. माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेल्या आकडेवारीनुसार १० कोटी ३४ लाख लसींचा योग्य वापर झाला असला तरी ४४ लाख ७८ हजार लसी वाया गेल्या आहेत. या लसी न वापरताच फेकून देण्यात आल्यात.

तामिळनाडू हे लसींची सर्वाधिक नासाडी करणारं राज्य ठरलं आहे. तामिळनाडूमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लसींपैकी तब्बल १२.१० टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मणिपूर तर पाचव्या क्रमांकावर तेलंगण राज्याचा सामावेश आहे. हरयाणामध्ये ९.७४ टक्के, पंजाबमध्ये ८.१२ टक्के तर मणिपुरमध्ये ७.८० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तेलंगणला पाठवण्यात आलेल्या लसींपैकी ७.५५ टक्के लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्यात. पण लसी वाया जातात म्हणजे नक्की काय हेच अनेकांना ठाऊक नाहीय. याचसंदर्भात आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. कोणत्या राज्यात किती लसी वाया गेल्यात महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, जाणून घ्या येथे क्लिक करुन….

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

लस वाया जाणं म्हणजे काय?

लस वाया जाणं हा कोणत्याही मोठ्या लसीकरणामधील सर्वसामान्यपणे गृहित धरला जाणारा भाग असतो. अनेकदा लस निर्माण करणाऱ्या कंपन्याच लस निर्मिती करताना ठराविक प्रमाणातील लसी वाया जाणार आहेत हे गृहित धरुनच लसींची निर्मिती करतात. खरं तर या श्रेत्रातील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार प्रत्येक लसीकरणाच्या वेळी काही प्रमाणात लसी वाया जाणं हे फायद्याचं असतं असंही म्हटलं जातं.

सामान्यपणे मोठ्या प्रमाणात लसी वाया गेल्यास मागणी आणि पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतो आणि परिणामी लसींचा तुटवड्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मोठ्या प्रमाणात लसी वाया गेल्यास लसींची मागणी म्हणजेच ऑर्डर आणि त्यांचा पुरवठा करणारी मागणी साखळी अर्थात सप्लाय चैन यांच्यावर ताण येतो आणि काही काळासाठी नियोजित ठिकाणी पुरेश्याप्रमाणात लसी उपलब्ध होत नाहीत.

लसी वाया जाणं हे थेट किती लसीकरण केलं जात आहे याच्याशी निगडीत असतं. एखाद्या केंद्रावर दिल्या जाणाऱ्या लसींच्या प्रमाणातच वाया जाणाऱ्या लसींचं प्रमाण असतं. लस वाया गेली हे कसं मोजलं जातं यासंदर्भात सांगायचं झाल्यास शंभरामधून वापरण्यात आलेल्या लसींचं प्रमाण वजा करुन जो आकडा समोर येतो त्या वाया गेलेल्या लसी आहेत असं समजलं जातं. किती लसी वाया गेल्यावरुन त्या कशामुळे वाया गेल्या हे शोधण्यासाठी उपयोगाचं ठरतं. लसी वाया जाण्याची कारणं शोधताना ज्या घटकामुळे (कारणामुळे) लसी वाया गेल्या म्हणजेच वेस्टेज फॅक्टर विचार केला जातो. लसीकरण मोहीम योग्य पद्धतीने राबवण्यासाठी वेस्टेज फॅक्टरची मोजणी फार महत्वाची ठरते.

समजून घ्या >> आता महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…

वेस्टेज फॅक्टर कसा मोजतात? सध्याच्या करोना लसीकरण मोहिमेत याचं प्रमाण किती आहे?

तांत्रिक भाषेत वेस्टेज मल्टीपल फॅक्टर म्हणजेच डब्ल्यूएमएफ मोजण्याचं एक सुत्र आहे.

डबल्यूएमएफ = १००/(१००- वाया गेलेल्या लसी).

सध्या केंद्राने हाती घेतलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये डब्लूएमएफ १.११ इतका आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये १० टक्के लसी वाया जातील असं गृहित धरुन हा वेस्टेज फॅक्टर काढण्यात आलाय. त्यामुळेच १००/(१००-१०) = १.११

लसीकरणासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यासाठी आणि किती लसी लागतील याचा अंदाज बांधण्यासाठी किती लसी वाया जात आहेत हे मोजणं फार महत्वाचं असतं. एखाद्या ठराविक ठिकाणी (राज्य/ जिल्हा/ ब्लॉक/ शहर/ सेक्टर/ प्रभाग इत्यादी) महिन्याभरामध्ये किती लसी लागतील हे मोजण्यासाठीही एक सुत्र आहे.

लसींची गरज = (नियोजित ठिकाणची एकूण लोकसंख्या) X (नियोजित भागातील किती टक्के लोकसंख्येला लस द्यायची आहे/ किती महिने ही मोहीम राबवली जाणार आहे) x दोन डोस x डब्ल्यूएमएफ

म्हणजेच

लसींची गरज किती आहे हे मोजताना नियोजित ठिकाणच्या लोकसंख्येला लसीकरण करावयाच्या लोकसंख्येचे किती महिने लसीकरण चालणार आहे याच्याशी संबंधित प्रमाणाने गुणायचे. त्यानंतर प्रत्येला दोन डोस देण्यात येणार असल्याने गुणीले दोन आणि त्यालाही नंतर डब्लूएमएफने गुणलं जातं.

लसी वाया कशा जातात?

लस वाया जाण्याचे मुख्यपणे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे डोस उघडल्यानंतर वाया जाणं आणि डोस बंद असतानाच वाया जाणं.

लसीचा डोस न उघडताच वाया जाण्यामागे सहा मुख्य कारणं असतात. ती खालील प्रमाणे…

१) लसीची एक्सपायरी डेट उलटून जाणं

२) लस जास्त तापमानात ठेवणं

३) लस अती जास्त प्रमाणात थंड केल्याने तिच्यातील द्रव्य गोठणं

४) लसीची कुपी फुटणं

५) लस हरवणं किंवा लस चोरीला जाणं

६) न वापरलेल्या लसी परत करताना लस खराब होणं

लस उघडल्यानंतर ती खराब होण्यामागे मुख्यपणे पाच करणं असू शकतात. ती खालील प्रमाणे

१) लसीकरणाचे सत्र संपताना उघडून ठेवलेल्या कुप्या वाया जाणं

२) कुपीमधून द्रव्य इंजेक्शनमध्ये न येणं

३) उघडलेली लस शीतपेटीतील पाण्यात पडणं

४) लस दुषित होणं

५) हाताळताना झालेल्या निष्काळजीपणातून लस वाया जाणं

लसीकरणाच्या कोणत्या टप्प्यात लस वाया जाण्याची शक्यता असते?

लस वाया जाण्याची शक्यता मुख्यपणे तीन टप्प्यांमध्ये असते.

> पहिली शक्यता म्हणजे लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना

> दुसरी शक्यता म्हणजे थंड तापमानात लस ठेवण्यास अपयश आल्यास

> तिसरी शक्यता म्हणजे लसीकरण केंद्रावर

या टप्प्यांमध्ये लस वाया जाण्यामागे लसीचा प्रवास आणि तिची हाताळणी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्याच आधारे लस टीकणार की वाया जाणार हे ठरतं.

कोल्ड चेन पॉइण्ट म्हणजेच नियोजित तापमानामध्ये लसीचा पुरवठा करण्यासंदर्भातील नियमांनुसार; ज्यांना लस द्यायची आहे त्यांच्या संख्येशी दिलेल्या लसींची संख्या जुळणं आवश्यक आहे. सामान्यपणे जितके लोकं लसीकरणाला येण्याची शक्यता त्या संख्येच्या आसपास (शक्यतो शुन्याच्या पटीत म्हणजेच १०, २०, ३० पासून १०० च्या पटीमध्ये) लसी पुरवल्या जातात. या लसी देताना जो राऊण्ड ऑफ म्हणजेच दशक पटीत आकडा येण्यासाठी अतिरिक्त लसी दिल्या जातात त्याचा हिशोब डब्लूएमएफमध्ये लावला जात नाही. तसेच आधी निर्मिती करण्यात आलेल्या लसींचा साठा आधी लसीकरण केंद्रावर पाठवला जातो.

जिल्हा स्तरावर जिथे लसी साठवल्या जातात त्यासंदर्भातही काही मार्गर्शक तत्वे आहेत. या नियमांनुसार प्रत्येक लसीकरणाच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त १०० जणांचे लसीकरण केलं जातं. मात्र कधीतरी दुर्गम भागात किंवा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी विशेष व्यवस्था करुन लसीची नासाडी होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यायची असते. जर एखाद्या ठिकाणी खूपच कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणच्या लोकांना जवळच्या लसीकरण केंद्रावर येण्यासंदर्भातील सूचना करणं सुद्धा जिल्हा प्रशासनाचं काम असतं.

काही राज्यांमध्ये लसींची मोठ्याप्रमाणात नासाडी का होते?

अनेक लसीकरण केंद्रांवर लस वाया जाण्याचा थेट संबंध तेथील नियोजित लोकसंख्या आणि प्रत्येक सेशनमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येवर अवलंबून असते.

लसीकरणादरम्यान नियोजनाचा आभावामुळेही लसी वाया जाण्याचं प्रमाण अधिक असू शकतं असं केंद्राच्या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ एका बॉक्समध्ये १० लोकांसाठीच्या लसी असतील मात्र सहाच जण लस घेण्यासाठी आले तर चार लसी वाया जातात. केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या निर्देशामध्ये नीट नियोजन करुन एका वेळेस किमान दहा लोकं तरी लसीकरणासाठी जातील असा प्रयत्न करावं अन्यथा नव्या लसी उघडू नये असं सांगितलं आहे. “लस घेण्यासाठी आलेल्यांना अर्धा तास वाट पहावी लागेल असे निर्देश देण्याचे आदेश आम्ही राज्यांना दिलेत. त्यावेळात ठरलेल्या संख्येत लोकं आले तर लसी दिल्या जातात. मात्र लोकं आले नाही तर लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली जाते. दुसऱ्या दिवशी या व्यक्तींना प्राधान्यक्रमाने लस दिली जाते. लसीकरण केंद्रातील नियोजन योग्य असेल तर हे सारं चांगल्या पद्धतीने करता येतं,” असं आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण न दिल्यानेही वाया जाणाऱ्या लसींची संख्या वाढते असं अधिकारी सांगतात. अनेकदा योग्य प्रशिक्षण नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून १० ऐवजी नऊ जणांना लस दिली जाईल अशी कामगिरी होते. योग्य प्रशिक्षण असेल तर कर्मचाऱ्यांना कुपीमधून लस देताना जास्त परिणामकारपणे काम करता येतं असं आमचं निरिक्षण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. योग्य प्रशिक्षण असेल तर १० लसींच्या डोसात कर्मचारी ११ जणांना लस कशी देऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला पुरव्यासकट सांगू शकतो, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लसी वाया जाण्यापासून रोखण्यासाठी हे फार महत्वाचं असल्याचं अधिकारी सांगतात.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाठवलेल्या फॅक्टशीटनुसार लसी उघडल्यानंतर त्या चार तासांमध्ये नियोजित पद्धतीने नागरिकांना देण्यात याव्यात. यामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही सलींबद्दल केंद्राचा राज्यांना समान सल्ला दिलाय.

मोदींनी काय चिंता व्यक्त केली?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये तेलंगण, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये लसी वाया जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. “लसी का वाया जात आहेत याचा राज्यांनी अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची नोंद करणारी यंत्रणा उभी केली पाहिजे. आपण लसी वाया घालवून ती लस ज्याला मिळण्याची शक्यता होती त्याचा लसीकरणाच्या हक्कावर गदा आणत आहोत. राज्यांनी योग्य नियोजन करुन अधिक प्रभावीपणे लसीकरण कार्यक्रम राबवला पाहिजे. स्थानिक पातळीवर होणारी लसींची नासाडी थांबवली पाहिजे. शून्य नासाडीचे ध्येय राज्यांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे,” असं मोदींनी म्हटलं आहे.

लसींच्या एक्सपायरी डेटसंदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला मोदींनी लसीकरण केंद्रांना दिलाय. “आपल्याला लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज आहे. खासगी आणि सरकारी स्तरावरील केंद्र वाढवली पाहिजेत. केंद्र सरकारने नियोजन केल्यास लसींची कमी नासाडी होईल. लसी एक्सपायर होण्याच्या समस्येलाही तोंड द्यावं लागत आहे. आधी आलेल्या लसी प्राधान्य क्रमाने दिल्या गेल्या पाहिजेत. काही राज्यांमध्ये नंतर आलेल्या लसी आधी दिल्या जात आहेत. त्यामुळे लसींची नासाडीचे प्रमाण अधिक आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे.