अमोल परांजपे
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढतच आहेत. २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा उतरण्याची तयारी करत असलेल्या ट्रम्प यांच्यावर याच आठवडय़ात गुन्हेगारी आरोप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. २०१६च्या प्रचारावेळी एका ‘पॉर्न स्टार’ला पैसे चारल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर केला गेला आहे. या प्रकरणाचे ‘भूत’ २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी त्यांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे.
कोण पॉर्न स्टार? पैसे कशासाठी?
२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना ट्रम्प यांनी ‘पॉर्न स्टार’ स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तब्बल १ लाख ३० हजार डॉलर दिल्याचे बोलले जात आहे. स्टॉर्मीने ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधांची वाच्यता करू नये, म्हणून तोंड बंद ठेवण्यासाठी तिला ही रक्कम दिल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, ट्रम्प यांनी या आरोपांचा इन्कार केला असून स्टॉर्मीच (तिचे खरे नाव स्टिफनी क्लिफोर्ड असे आहे.) ‘ब्लॅक मेल’ करत असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे. याप्रकरणी मॅनहॅटनचे महाधिवक्ता अल्विन ब्रॅग यांनी आरोपनिश्चिती केल्यानंतर ट्रम्प हे गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरतील.
ट्रम्प यांचे म्हणणे काय?
अद्याप न्यू यॉर्कमधील सरकारी वकिलांमार्फत ट्रम्प यांच्याशी कोणताही संपर्क साधला गेला नसला, तरी आपल्याला मंगळवारी अटक होणार असल्याची आवई ट्रम्प यांनी उठविली आहे. ‘मॅनहॅटनच्या भ्रष्ट सरकारी वकिलांच्या कार्यालयातून माहिती फुटली आहे. गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता दिसत नसल्याने रिपब्लिकन पक्षातील उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षाला मंगळवारी अटक होणार,’ असा दावा समाजमाध्यमांवर करताना ट्रम्प यांनी, समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही केले आहे. वास्तविक ट्रम्प यांच्यासमोर कायदेशीर पर्यायही उपलब्ध आहेत.
हे कायदेशीर मार्ग कोणते?
बांधकाम उद्योजक किंवा अभिनेते असताना ट्रम्प यांच्यावर असे काही गुन्हेगारी आरोप झाले आहेत. अशा वेळी खटल्याचे कामकाज या ना त्या मार्गाने जितके लांबवता येईल, तितके लांबविण्याचे धोरण ट्रम्प यांनी अवलंबिले होते. ट्रम्प यांनी स्वत: डेमोक्रॅट असलेले महाधिवक्ता ब्रॅग यांच्यावर आरोप करून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. तज्ज्ञांना आणखी एक शक्यता वाटते ती तकलादू आरोप ठेवले जाण्याची.. स्टॉर्मीला रक्कम देण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा लहानसा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवला जाऊ शकतो.
एवढय़ाने निवडणुकीवर परिणाम?
रिपब्लिकन पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी ताज्या सर्वेक्षणानुसार फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांच्यापेक्षाही ट्रम्प आघाडीवर आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीला (प्रायमरीज) अद्याप बराच अवधी असला, तरी ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अद्याप नाकारता येत नाही. पण न्यू यॉर्कमधील कोणताही गुन्हेगारी खटला न्यायालयात पोहोचण्यास साधारणत: एका वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. हे गृहीत धरल्यास २०२४च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकेल. निवडणूक नोव्हेंबरमध्ये असल्याने प्रचाराच्या काळातच हा लाजिरवाणा खटलाही सुरू राहील!
ट्रम्प यांच्या अटकेची शक्यता किती?
साधारणत: प्रसिद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन अटक केली जात नाही. सरकारी वकील आणि आरोपींचे वकील एक निश्चित दिवस तसेच वेळ ठरवतात आणि त्या वेळी केवळ अटक दाखविली जाते. ट्रम्प यांच्याबाबतही हेच घडण्याची शक्यता आहे. ट्रम्प न्यू यॉर्कच्या पोलीस ठाण्यात शरण जातील. तेथे त्यांच्या बोटांचे ठसे, छायाचित्रे घेतल्यावर न्यायालयात हजर करून वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटकाही होईल. समाजमाध्यमांवर ट्रम्प अटकेची भाषा करून आपल्या समर्थकांना भडकवीत असले, तरी असे होण्याची शक्यता दिसत नाही.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, दोषीही ठरले.. तर?
हा खटला आणि अध्यक्षीय निवडणूक एकाच वेळी होणार, म्हणून अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञ आता शक्यतांवर चर्चा करू लागले आहेत. ट्रम्प निवडणूक जिंकले पण त्याच वेळी त्यांच्यावरील गुन्हाही सिद्ध झाला, तर अमेरिकेत ‘न भूतो’ असा कायदेशीर पेच निर्माण होईल. राष्ट्राध्यक्ष या नात्याने ट्रम्प स्वत:ला माफी (पार्डन) देऊ शकणार नाहीत. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षाही भोगावी लागू शकेल. हा प्रसंग कसा हाताळायचा याचा अनुभव कुणालाच नाही. त्यामुळे कायद्याचा कीस पाडला जाईल, हे निश्चित. अर्थात, ट्रम्प यांना या निवडणुकीपासूनच लांब ठेवणे रिपब्लिकन पक्षातील मतदारांच्या हाती आहे.