मानवजातीचा उगम कसा आणि कुठून झाला याबाबत जितके कुतूहल आहे, तितकेच त्यामध्ये वादविवाद आहेत. गेली अनेक वर्षे शास्त्रज्ञ मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत आहेत. माणसाची उत्क्रांती आफ्रिकेतून झाली की आशिया-युरोपमधून असा वाद आता सर्वसामान्य झाला आहे. फेब्रुवारी १९२५ मध्ये नेचर या नियतकालिकाने रेमंड डार्ट या मानववंशशास्त्रज्ञाचा एक शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यात पहिल्या होमोनिन जीवाश्माचे वर्णन केले आहे. माणसाचे पूर्वज आफ्रिकेतूनच विकसित झाले, असा वैज्ञानिक संशोधनाअंती दावा या लेखात करण्यात आला होता. या शोधनिबंधाला १०० वर्षे पूर्ण झाली असून मानवी उत्क्रांतीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेमंड डार्ट याचा शोधनिबंध काय सांगतो?

रेमंड डार्ट हे दक्षिण आफ्रिकेतील भौतिक मानवशास्त्रज्ञ होते. पहिल्या महायुद्धात वैद्यक म्हणून काही काळ सेवा बजावल्यानंतर मँचेस्टर विद्यापीठात ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ जी. ई. स्मिथ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन केले. जोहान्सबर्गमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विटवॉटर्सरँड विद्यापीठात १९२२ मध्ये शरीरशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दक्षिण आफ्रिकेतील त्वांग येथील खाणीत मिळालेल्या बबून माकडांच्या जीवाश्मांचा अभ्यास करताना त्यांना एक जीवाश्म आढळला. हाच जीवाश्म पुढे ‘त्वांग चाइल्ड’ या नावाने प्रसिद्ध झाला. डार्ट यांनी १९२५ मध्ये हा जीवाश्म मानव व कपी यांच्या उत्क्रांतीतील दुवा आहे, असे सांगून त्याचे ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस असे नामकरण केले. त्याची माहिती देणारा शोधनिबंध ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला; परंतु त्या वेळी पिल्टडाउन मॅन (पुढील काळात बनावट ठरलेला) हा मानवाचा पूर्वज असल्याचे सर्वमान्य प्रचलित मत होते. तसेच ‘पेकिंग मॅन’ नावाने प्रसिद्ध झालेल्या होमो इरेक्टस जीवाश्मामुळे मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ युरोप अथवा आशियात झाला असावा, या तत्कालीन सिद्धांतांला ‘त्वांग चाइल्ड’ने छेद दिला.

डार्टच्या संशोधनाला विरोध का झाला?

मानवाची उत्क्रांती आफ्रिकेतून झाली हे संशोधन युरोप-आशियातील मानववंशशास्त्रांना रुचले नाही. पिल्टडाउन मॅन हाच मानवाचा पूर्वज असल्याचे त्या वेळी सर्वमान्य प्रचलित मत होते. पिल्टडाउन मॅन हा कपी आणि मानव यांच्यातील हरवलेला दुवा मानला जात होता. मात्र पिल्टडाउन मॅनचा शोध लागल्यानंतर ३७ वर्षांनी म्हणजे १९४९ मध्ये हे बनावट संशोधन असल्याचे दिसून आले. केवळ आफ्रिकेतील मानवी उत्क्रांतीच्या शोधाबाबत अविश्वास व्यक्त करण्यासाठी हेच संशोधन खरे आहे, असा दावा करण्यात आला. याला वर्णद्वेषाचीही किनार होती. कारण मानव आफ्रिकेतून उद्भवला आहे, ही कल्पनाच युरोप-आशियातील तत्कालीन शास्त्रज्ञ करू शकत नव्हते. त्यामुळे मानव आफ्रिकेतून उद्भवला हे मानण्यास त्यांनी नकार दिला, असे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन विद्यापीठातील मानवी उत्क्रांती संशोधन संस्थेच्या सहसंचालक रेबेका रॉजर्स एकरमन यांनी सांगितले. सर आर्थर किथ (१८६६-१९५५) या विख्यात स्काॅटिश मानववंशशास्त्रज्ञाने तर डार्टचे ‘त्वांग चाइल्ड’ हे केवळ माकडाचे पिल्लू असून त्याचा मानवी उत्क्रांतीशी काहीही संबंध नाही, अशी संभावना केली.

‘त्वांग चाइल्ड’ला पुढे मान्यता कशी मिळाली?

‘त्वांग चाइल्ड’ ज्याला ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकन्स असे म्हणतात, ज्याला अनेक वर्षांच्या वैज्ञानिक नकारानंतर सर्वसामान्य मान्यता मिळाली. माणूस आणि त्याचे पूर्वज आफ्रिकेतून विकसित झाले याला बळकटी देण्याचे काम या संशोधनाने पुढे केले. १९३६ मध्ये जोहान्सबर्ग येथील विटवॉटर्सरँड विद्यापीठातील रॉबर्ट ब्रूम या संशोधकाने डार्ट यांच्यासह मानवी उत्क्रांती संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. ब्रूम यांना दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफॉन्टेन लेण्यांमध्ये पहिला प्रौढ ऑस्ट्रॅलोपिथिकेस सापडला. दोन मानवी सांगाडे सापडल्यानंतर त्यावर संशोधन करण्यात आले. १९४७ मध्ये ब्रूम आणि जॉन रॉबिन्सन या दोन शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकन्सची पूर्ण कवटी शोधून काढली. ऑस्ट्रॅलोपिथेकस हा खरा खरा नवा पुरावा होता. यानंतर मात्र मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ आफ्रिकेत झाला आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवाचे पूर्वज असल्याचे डार्ट यांचे मत सिद्ध झाले. नंतरच्या काळात सर आर्थर किथ या स्कॉटिश मानववंशशास्त्रज्ञाने आपली चूक मान्य केली.

संशोधनात पुढे काय आढळले?

युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनमधील पॅलेओएन्थ्रोपोलॉजिस्ट जॉन हॉक्स म्हणतात की, ऑस्ट्रॅलोपिथेकस आणि विशेषत: त्वांग कवटी यांनी

तीन गोष्टी अशा प्रकारे एकत्र केल्या, ज्याचा अंदाज कोणत्याही शास्त्रज्ञाने वर्तवला नव्हता. पुढील काळात माकापन्सगात येथे ऑस्ट्रॅलोपिथिकेसचे अनेक जीवाश्म आढळले. या जीवाश्मांचा काळा रंग पाहून ते जळालेले असावेत, असा अंदाज डार्ट यांनी व्यक्त केला. मात्र हे जीवाश्म ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकन्सचेच असल्याचे पुढे सिद्ध झाले. शास्त्रज्ञांना सापडलेल्या त्वांग कवटीमध्ये मेंदू लहान होता. दंतवयाच्या गोरिलापेक्षा लहान आणि चिंपांझीच्या मेंदूच्या आकारापेक्षा थोडा मोठा हा मेंदू होता. त्याचे दात मानवासारखेच होते. त्याचा आकार सामान्यत: मानवासारखा होता. या जीवाश्मांवर केलेल्या अधिकच्या संशोधनातून ही प्रजाती ताठ चालत असल्याचे दिसून आले. डार्ट यांनी जीवाश्मांचा अभ्यास करून ही प्रजाती अतिशय हिंसक वृत्तीची असावी, असे प्रतिपादन केले. डार्ट यांच्या संशोधनामुळे मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधनाला कलाटणी मिळाली, हे स्पष्ट दिसते. गेल्या १०० वर्षांत आफ्रिका सोडून कुठेही पुरातन मानवी जीवाश्म सापडलेले नाहीत. त्यामुळे आफ्रिका हीच मानवजातीची जन्मभूमी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ रॉबिन पिकरिंग यांनी सांगितले.

sandeep.nalawade@expressindia.com