१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेल्या तत्कालीन भारतीयांच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू तरळत होते. एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता तर दुसरीकडे देशाची फाळणी झाल्याचं दु:ख! भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा वर्तमान जरी वेगवेगळा असला, तरी त्यांचा इतिहास मात्र एकच आहे. त्यामुळेच सीमेच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी असंख्य बाबी आजही एकसारख्याच महत्त्वाच्या आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अटोक जिल्ह्यात असणारं एक रेल्वेस्थानकही त्यातलंच एक. एक साधं रेल्वेस्थानक फक्त सीमेच्या दोन्ही बाजूलाच नव्हे, तर जगभरात राहणाऱ्या शीख समुदायासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं का ठरलं? बरोबर १०० वर्षांपूर्वी तिथे नेमकं काय घडलं होतं? यंदा नेमक्या कोणत्या घटनेचा शताब्दीपूर्ती कार्यक्रम या रेल्वेस्थानकावर केला जाणार आहे?
अटोक जिल्ह्यातील हसन अब्दल रेल्वे स्थानक गेल्या १०० वर्षांपासून शीख धर्मीयांसाठी एक भावनिक ठिकाण ठरलं आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी याच रेल्वेस्थानकावर १०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा शताब्दीपूर्ती कार्यक्रम पार पडणार आहे. अमृतसरमधील शिरोमणी गुरुग्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) आणि पाकिस्तान शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (पीएसजीपीसी) या दोन्ही देशांमधील संस्था हसन अब्दल शहरातील या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत. भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या एका गटातील काही भारतीयांचा व्हिसा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम आणि त्यामागे असणारा १०० वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा चर्तेत आला आहे.
नेमकं काय घडलं होतं १०० वर्षांपूर्वी?
१०० वर्षांपूर्वी अर्थात ३० ऑक्टोबर १९२२ रोजी घडलेल्या त्या घटनेला ‘साका पंजा साहिब’ अर्थात ‘हुतात्म्यांचं हत्याकांड’ म्हटलं जातं. तत्कालीन ब्रिटिश प्रशासन काही शीख कैद्यांना अमृतसरहून अटोकच्या दिशेनं घेऊन जात होते. ही रेल्वे हसन अब्दल स्थानकावर थांबवण्यात यावी, अशी विनंती जवळच्याच पंजा साहिब इथल्या काही शीख लोकांनी ब्रिटिश प्रशासनाला केली. अशा प्रकारे कैद्यांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेमध्ये जेवण देण्याचा दिनक्रम इथल्या शीख लोकांचा ठरला होता. मात्र, त्या दिवशी ब्रिटिश प्रशासनानं ही रेल्वे थांबवण्यास नकार दिला.
विश्लेषण: महासाथीनंतरच्या तिसऱ्या हिवाळ्यात नवीन करोना लाट?
याचा विरोध करण्यासाठी स्थानिक शीखांनी आंदोलन करायला सुरुवात केली. काही आंदोलनकर्ते रेल्वे ट्रॅकवर झोपले. ट्रेन जवळ आली तरीही आंदोलनकर्ते हटण्यास तयार नव्हते. अखेर ट्रेननं ऐनवेळी ब्रेक लावला. ट्रेन थांबली. पण थांबण्याआधी काही आंदोलनकर्ते ट्रेनच्या खाली आले होते. यापैकी भाई करमसिंग आणि बाई प्रतापसिंग हे दोघे गंभीर दुखापतीमुळे मरण पावले. तेव्हापासून साका पंजा साहिबचे हुतात्मे म्हणून या दोघांना ओळखलं जाऊ लागलं.
ट्रेनमधले कैदी कोण होते?
खरंतर हसन अब्दल रेल्वे स्थानकावर झालेल्या आंदोलनाचं आणि त्यानंतर झालेल्या हत्याकांडाचं मूळदेखील एका आंदोलनातच होतं. या ट्रेनमधून शीखांच्या दुसऱ्या एका आंदोलनातील आंदोलकांना नेलं जात होतं. ऑगस्ट १९२२मध्ये पाच शीख व्यक्तींनी गुरुद्वारा गुरु का बाग परिसरातून लंगर बनवण्यासाठी इंधन म्हणून वापरायला काही लाकडं तोडली होती. ८ ऑगस्ट, १९२२ रोजी त्यांनी लाकडं तोडल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना दुसऱ्याच्या जमिनीवरची लाकडं चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्या अटकेच्या विरोधात शीख समुदायाने मोठा मोर्चा काढला. याचाल ‘गुरू का बाग मोर्चा’ असं म्हटलं जातं. या आंदोलनात एसजीपीसीनं निषेध म्हणून रोज काही आंदोलकांना अटक करून घेण्यासाठी पाठवायला सुरुवात केली. याच अटक केलेल्या कैद्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनखाली ३० ऑक्टोबर १९२२ रोजी दोन शीख आंदोलकांचा चिरडून मृत्यू झाला.
विश्लेषण : म्यानमार राजवटीकडून ‘फुटिरां’ची कत्तल?
या घटनेच्या शताब्दीपूर्तीनिमित्त पाकिस्तानमधील हसन अब्दल रेल्वे स्थानक परिसरात आयोजित दोन दिवसांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकताच वाद निर्माण झाला होता. पाकिस्ताननं किमान ४० भारतीय नागरिकांना व्हिसा नाकारल्याचा दावा एसजीपीसीकडून करण्यात आला. मात्र, वरीष्ठ प्रशासकीय पातळीवर त्यासंदर्भात सल्लामसलत करून अखेर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुमारे ३ हजार शीख पाकिस्तानमध्ये दाखल होणार आहेत. त्यापैकी ३५५ भारतीय असून इतर व्यक्तींमध्ये ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील शीखांचा समावेश आहे.