करोना संसर्गाच्या काळात ‘डोलो-६५०’ या गोळ्यांची सर्वाधिक चर्चा होती. अगदी हलका ताप आला किंवा करोना संसर्गाची कोणतीही सौम्य लक्षणं आढळली तर, त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांकडून डोलो-६५० गोळी घेण्याचा सल्ला देण्यात येत होता. करोना संसर्गाच्या काळात ‘डोलो-६५०’ गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भरघोस नफा कमवला. ही गोळी सर्व आजारांवर रामबाण उपाय ठरत होती. भारतातील जवळपास प्रत्येक घरांपर्यंत ही गोळी पोहोचली होती. सोशल मीडियावरदेखील या गोळीची जोरदार चर्चा सुरू होती. नेटकऱ्यांनी यावर अनेक मीम्सही तयार केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आता ‘डोलो-६५०’ गोळ्यांची निर्मिती करणारी कंपनी ‘मायक्रो लॅब्स’ ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. संबंधित कंपनीने ‘डोलो-६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे. करोना विषाणूसंदर्भातील कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांनी रुग्णांना ‘डोलो-६५०’ ही गोळी घेण्याचा सल्ला द्यावा, यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना भेटवस्तूंच्या स्वरुपात ही रक्कम दिली, असा दावा फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया (FMRAI) ने केला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : दारूच नव्हे, दारूबंदीचाही भारतात मोठा इतिहास, अगदी प्राचीन काळापासून होतायत निर्णय; वाचा नेमका काय आहे इतिहास!

नेमकं प्रकरण काय आहे?
सर्वोच्च न्यायालयात FMRAI विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असा खटला सुरू आहे. त्यानुसार, मायक्रो लॅब कंपनीने ताप किंवा इतर सौम्य लक्षणं आढळणाऱ्या सर्व रुग्णांना ‘डोलो-६५०’ ही गोळी औषध म्हणून लिहून द्यावी, यासाठी डॉक्टरांना १ हजार कोटी रुपयांची रक्कम मोफत दिली आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

FMRAI कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

ज्येष्ठ वकील संजय पारिख आणि वकील अपर्णा भट यांनी याचिकाकर्त्या FMRAI तर्फे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाला सांगितलं की, ५०० एमजी पर्यंतच्या कोणत्याही गोळ्यांची बाजारातील किंमत काय असावी? याचं नियंत्रण शासकीय यंत्रणेकडून केलं जातं. पण ५०० एमजीपेक्षा अधिक क्षमतेच्या गोळ्यांची किंवा औषधांची किंमत ठरवण्याचा अधिकार संबंधित उत्पादक फार्मा कंपनींना आहे.

हेही वाचा- डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी १००० कोटींचे गिफ्ट्स दिल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “मलाही कोविड झाला तेव्हा…”

याचाच फायदा मायक्रो लॅब्स कंपनीने उठवला आहे. डॉक्टरांनी रुग्णांना ६५० एमजी क्षमतेची डोलो गोळी लिहून द्यावी, यासाठी कंपनीने डॉक्टरांना १ हजार कोटी रुपेय मोफत वितरीत केले आहेत. तसेच बहुतेक रुग्णांना गरज नसतानाही ‘डोलो-६५०’ गोळी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता, असंही वकिलांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं आहे.

‘सेल्स प्रमोशन’च्या नावाखाली १००० कोटींच्या भेटवस्तू

डॉक्टरांना मोफत देण्यात आलेल्या १ हजार कोटींचा उल्लेख कंपनीनं ‘सेल्स प्रमोशन’ असा केला आहे. याद्वारे कंपनीने डॉक्टरांना भेटवस्तू, मनोरंजन, परदेशी सहली असे अनेक अनैतिक फायदे दिल्याचं वकिलांनी न्यायालयात म्हटलं आहे. शिवाय अशा प्रकारच्या ‘सेल्स प्रमोशन’मुळे औषध लिहून देण्याचा डॉक्टरांच्या वृत्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच आवश्यकता नसताना हे औषध लिहून देण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, असा युक्तीवादही वकिलांनी केला आहे.

‘डोलो-६५’ गोळ्या आरोग्यास कितपत हानीकारक?

खरंतर, पॅरासिटामॉल किंवा ‘डोलो-६५०’ हे औषध सामान्यतः सुरक्षित औषध मानलं जातं. पण हे औषध आवश्यकतेपेक्षा अधिक घेतल्याने यकृताशी संबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात. यकृत विकार, मूत्रपिंडाचे आजार आणि मोठ्या प्रमाणात मद्यपान करणाऱ्या लोकांना हे औषध देणं हानीकारक ठरू शकतं.