इतिहास उलगडण्यासाठी ज्याप्रमाणे ऐतिहासिक दस्तावेज महत्त्वाचा असतो, त्याप्रमाणेच नाणकशास्त्रही महत्त्वाचे असते. गतकालीन घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी नाणकशास्त्राचा उपयोग होतो. पुरातन नाण्यांवर अनेक ऐतिहासिक घडामोडी कोरलेल्या असतात. इंग्लंडमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात नॉर्मन काळातील चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला असून एक हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनांचा उलगडा करण्यासाठी हा मौल्यवान खजिना महत्त्वाचा आहे. इंग्लंडमधील या पुरातन खजिन्याविषयी…
खजिना कुठे सापडला?
नैर्ऋत्य इंग्लंडमधील एका शेतकऱ्याच्या शेतात ॲडम स्टेपल्स आणि सहा मित्रांना सुमारे १,००० वर्षांपासून जमिनीत पडलेल्या २,५०० पेक्षा जास्त चांदीच्या नाण्यांचा संग्रह सापडला. ब्रिस्टॉल शहराच्या दक्षिणेस सुमारे ११ मैलांवर च्यु व्हॅली परिसरात ही नाणी सापडली असून ५६ लाख डॉलरची रक्कम धातूशोधक आणि जमीनमालकाला निम्मी-निम्मी मिळणार आहे. स्टेपल्स हा पुरातन खजिन्याचा शोधक असून त्याने मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून या नाण्यांचा शोध घेतला. सुमारे ५६ लाख डॉलरचे मूल्य असलेली ही रौप्य नाणी अधिक मौल्यवान असून नॉर्मन टोळ्यांच्या इंग्लंड दिग्विजयानंतरच्या अस्थिर परिणामांवर प्रकाश टाकण्यास ती मदत करतील, असा दावा इतिहास अभ्यासकांनी केला आहे. हा नाण्यांचा खजिना स्थानिक हेरिटेज ट्रस्टने विकत घेतला असून त्यांचा अभ्यास केला जात आहे.
हेही वाचा : विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?
इंग्लंडच्या इतिहासावर प्रकाशझोत?
साउथ वेस्ट हेरिटेज ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, ही नाणी सुमारे १०६६ ते १०६८ या काळातील आहेत. हा कालखंड इंग्रजी इतिहासातील सर्वात अशांत कालखंडांपैकी एक आहे, कारण नॉर्मन विजयादरम्यान इंग्लंडवर यशस्वीरीत्या आक्रमण करण्यात आले होते. चार नॉर्मन राजांनी नंतर देशावर राज्य केले होते. या नाण्यांपैकी काही नाण्यांवर राजा एडवर्ड द कन्फेसरचे चित्र आहे. जानेवारी १०६६ मध्ये त्याचा निपुत्रिक मृत्यू झाला होता. मृत्युपूर्वी त्याने तीन जणांना सिंहासनाचे आश्वासन दिल्यानंतर अस्थिरतेचा काळ सुरू झाला. नाण्यांचा साठा त्या वेळी झालेल्या राजकीय गोंधळाचे चित्रण करतो. १०६६ मध्ये विल्यम, ड्यूक ऑफ नॉर्मंडी याने हेस्टिंग्जच्या लढाईत किंग हॅरोल्ड गॉडविन्सनचा पराभव केला. त्यानंतर इंग्लंडच्या सॅक्सन सम्राटांची जागा नॉर्मन फ्रेंच शासकांनी घेतली. हा सर्व इतिहास या नाण्यांवर मांडण्यात आलेला आहे.
ही नाणी जमिनीत पुरली का असावीत?
नाण्यांचा साठा १०६७-६८ मध्ये च्यू व्हॅलीमध्ये एका जमिनीवर पुरलेला होता. ही जमीन पूर्वी वेल्सचे बिशप गिसो यांच्या मालकीची होती. आग्नेय इंग्लंडमध्ये विल्यमच्या विरोधात झालेल्या बंडाच्या काळात कदाचित सुरक्षिततेसाठी नाण्यांचा हा साठा पुरला असावा, असा अंदाज पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला आहे. १०६८ मध्ये एक्सेटरच्या लोकांनी विल्यमविरुद्ध बंड केले. या वेळी हॅरॉल्डचे पुत्र आयर्लंडमधील निर्वासनातून परत आले आणि त्यांच्या सैन्याने एव्हॉन नदीच्या आसपास हल्ले केले आणि नंतर सॉमरसेट आणि च्यू व्हॅलीमध्ये हल्ले केले. नॉर्मन राजवटीविरुद्ध स्थानिक बंडखोरी झाल्यामुळे ही नाणी सुरक्षित ठेवण्यासाठी पुरण्यात आली होती, असे पुरातत्त्व अभ्यासकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : विश्लेषण : इंग्लंड फुटबॉल संघाचे जर्मन प्रशिक्षक! थेट नाझी युगाची चर्चा का? नियुक्तीस विरोध का?
इतिहास अभ्यासकाचे म्हणणे काय?
दहा शतकांपूर्वीच्या इंग्लंडच्या ऐतिहासिक घटनांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम नाण्यांचा हा साठा करतो आहे. ‘‘इंग्रजी इतिहासातील एका महत्त्वपूर्ण वळणाचे चित्रण या नाणी करतात. सॅक्सन ते नॉर्मन राजवटीपर्यंतचे बदल या नाण्यांवरून दिसून येतात,’’ दक्षिण पश्चिम हेरिटेज ट्रस्टच्या पुरातत्त्व विभागाचे क्युरेटर अमल ख्रिशेह यांनी सांगितले. जवळजवळ एक हजार वर्षांपूर्वी वापरात असलेली नाणी शोधणे अत्यंत दुर्मीळ आहे. दुसऱ्या हॅरॉल्डच्या कारकीर्दीची माहिती देणारी नाणी यापूर्वीही सापडली होती. मात्र ही नाणी आधीच्या नाण्यांपेक्षा दुप्पट असून या नाण्यांवरून अधिक ऐतिहासिक माहिती मिळते, असे इतिहास तज्ज्ञांनी सांगितले. पोर्टेबल अँटिक्विटीज स्कीम या संस्थेचे प्रमुख मायकल लुईस यांनी सांगितले की, हा अलीकडील काही वर्षांतील सर्वात लक्षवेधक शोधांपैकी एक आहे. या नाण्यांचा अभ्यास चालू असून त्याची कथा अद्याप पूर्णपणे उलगडलेली नाही. नाण्यांचा संग्रह इंग्रजी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध कालखंड समजून घेण्यात मदत करेल. पोर्टेबल अँटिक्विटीज स्कीम ही संस्था सरकारी-अनुदानित संस्था असून जनतेद्वारे केलेल्या पुरातत्त्व शोधांची नोंद करायचे काम ते करतात.
पुरातन नाण्यांविषयी ब्रिटिश कायदा काय?
हौशी पुरातत्त्व शोध हाताळण्यासाठी इंग्लंड सरकारने खजिना कायदा तयार केला आहे. ज्याला ऐतिहासिक सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू सापडतील, त्यांनी त्याबाबत स्थानिक प्रशासनाला कळवावे. जर प्रशासनाने पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मदतीने हा खजिना घोषित केला, तर तो सरकारचा असेल आणि संग्रहालये ते मिळवण्यासाठी निधीसाठी बोली लावू शकतात. तज्ज्ञ समिती प्रत्येक शोधाचे मूल्य ठरवते. जमिनीचा मालक आणि शोधक यांच्यात पैशाचे वाटप केले जाते. आता सापडलेल्या नाण्यांच्या संग्रहातून ५६ लाख डॉलरपैकी जमीनमालकाला निम्मे, तर नाणी शोधणाऱ्या स्टेपल्स व त्याच्या सहकाऱ्यांना निम्मे देण्यात आली. ही नाणी आता नैर्ऋत्य इंग्लंडमधील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आली असून २६ नोव्हेंबरपासून लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
sandeep.nalawade@expressindia.com