मृत्यू हा सजीवांसाठी नेहमीच आश्चर्याची गोष्ट ठरली आहे. मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? मृत्यूनंतर त्या सजीवाचे नेमके काय होते? मागे राहिलेला निर्जीव देह नष्ट करावा की, तो देह परत उठून हिंडू फिरू लागणार आहे? असे अनेक प्रश्न उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात मानवाला पडले. म्हणूनच कदाचित तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रात मृत्यू या विषयावर गहन चर्चा झालेली दिसते. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात असलेल्या मानवाला मृत्यूविषयक वाटणाऱ्या आश्चर्याच्या भूमिकेतूनच ‘मृत्यूनंतरचे जग’ या संकल्पनेचा जन्म झाला असावा,असे अभ्यासक मानतात. म्हणूनच मानवी समाजात मृतदेहावर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारांची उत्पत्ती झाली असावी, असा तर्क मांडला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचा, ३५०० वर्षांचा इतिहास नेमके काय सांगतो ?

आज आपल्याला मानवी उत्क्रांती सहज आणि सोपी वाटत असली तरी ती तितकी सहज नव्हती. उत्क्रांती हा शब्द कानावर पडला की, आपल्या डोक्यात अनेक विचार डोकावतात. खरंच आपली उत्क्रांती ही माकडापासून झाली का? आपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते का? परंतु, येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की आजच्या मानवाच्या उत्क्रांती अनेक स्थित्यंतरांतून गेली आहे. अनेक मानवी प्रजाती जन्माला आल्या व नष्ट झाल्या. ज्या प्रजाती जगण्याच्या संघर्षात तग धरू शकल्या, त्याच पुढे आधुनिक मानवाचा वंश जिवंत ठेवू शकल्या. याच प्रक्रियेत निअॅण्डर्थल आणि  होमो सेपियन्स (आधुनिक मानव) या प्रजाती मानवाच्या पूर्वज ठरल्या. याच मानवी पूर्वजांच्या राहणीमानाचा वारसा आजच्या मानवाने चालविला. याच मानवी प्रजातींनी मृत्यूनंतर दफन करण्याची पद्धत अवलंबली होती आणि त्यांचाच वारसा आपण  चालवत असल्याचे मानले जात होते. याच पार्श्वभूमीवर नव्या संशोधनात एका नव्या मानवी प्रजातीने आपल्या मृत संबंधिताला विधिवत पुरल्याचे पुरावे उघडकीस आले आहेत. ही प्रजाती नामशेष झाली असून  होमो सेपियन्स आणि निअ‍ॅण्डर्थलच्या यांच्या आधी त्यांनी हजारो वर्षांपूर्वी दफनसारख्या पद्धती प्रचलित केल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गुहेत या प्रजातींनी मृतांना पुरल्याचे दाखले उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या दफनाची परंपरा केवळ निअॅण्डर्थल व होमो सेपियन्स यांच्यातच अस्तित्वात असल्याचे संशोधकांना वाटत होते. 

आणखी वाचा: विश्लेषण: NCRT textbook revision: इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय?

‘होमो नालेडी’ 

अभ्यासकांनी शोधलेल्या या नव्या मानव प्रजातीचे नाव ‘होमो नालेडी’ आहे. स्थानिक सोथो भाषेत नालेडी म्हणजे ‘स्टार’. ‘नॅशनल जिओग्राफिक’ने नमूद केल्याप्रमाणे प्री-प्रिंट सर्व्हर bioRxiv या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या दोन शोधनिबंधांमध्ये या नव्या प्रजातीच्या दफनाचा दावा करण्यात आला आहे. तसेच संशोधक ली बर्जर यांनी न्यूयॉर्कमधील स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीमध्ये एका परिषदेत हे संशोधन सादर केले. निअॅण्डरथल्सबद्दल आपल्याला बरेच काही माहीत असते, परंतु ‘होमो नालेडी’ हा अलीकडील शोध आहे. या शोधामध्ये ली बर्जर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ली बर्जर हे दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरस्रँड विद्यापीठातील पुरावंशशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी २०१४ साली दक्षिण आफ्रिकेतील ‘रायझिंग स्टार’ गुहा समूहामध्ये या प्रजातीच्या १५ मानवांचे १५०० पेक्षा अधिक जीवाश्म नमुने शोधून काढले, असा संदर्भ ‘सायंटिफिक अमेरिकन’ या नियतकालिकात सापडतो. ही नवी प्रजाती मध्य प्लाइस्टोसीन काळात ३,३५,००० -२,३६,००० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असल्याचे मानले जाते.

या नव्या प्रजातीचे नेमके वैशिष्ट्य काय?

या उघडकीस आलेल्या जीवाश्मांमध्ये जुन्या व नव्या प्रजातींच्या वैशिष्टयांचे मिश्रण आहे. संशोधकांनी नमूद केल्याप्रमाणे या प्रजातीतला मानव आजच्या माणसाप्रमाणे ताठ कण्याचा होता आणि त्याचे हात संपूर्ण आधुनिक मानवाप्रमाणे होते. परंतु, त्यांचे खांदे मात्र चढाई करण्यासाठी होते. दात जुन्या प्राइमेट्ससारखे (नरवानर गण) होते. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या मानवांच्या मेंदूचा आकार ४५० ते ६०० घन सेंटीमीटर या दरम्यान होता. हा आकार आधुनिक मानवाच्या मेंदूच्या आकाराच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश आहे. त्यामुळे ही प्रजाती नव्या व जुन्या मानवाच्या प्रजातींचा दुवा साधण्याचे काम करत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. 

मृतांचा दफनविधी हेच वेगळेपण

प्राणी हे त्यांच्याच वंशातील मृत प्राण्यांशी कसा संवाद साधता, या विषयावर आंद्रे गोन्साल्विस हे अभ्यासक काम करतात. नॅशनल जिओग्राफिकला दिलेल्या मुलाखतीत ते सांगतात, माणूस प्राइमेट म्हणून खरोखरच विचित्र आहे. कारण आपण आपल्या मृतांना दफन करतो. परंतु इतर प्राइमेटस् तसे करत नाहीत, अद्याप तरी तसे काही आढळून आलेले नाही. दफन प्रक्रिया व मृत देहावर करण्यात येणारे अंत्यसंस्कार यांच्या पद्धतीत फरक असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. चिंपांझी आणि हत्ती हे मृत शरीरावर लक्ष ठेवतात किंवा त्या शरीराशी शारीरिक संबंध ठेवतात. या प्रक्रियेत त्यांना ते मृत शरीर जिवंत होण्याची अपेक्षा असते. अभ्यासकांनुसार ही पद्धत दफनप्रक्रियेशी संबंधित आहे. जटिल विचार करण्याची क्षमता असलेल्या प्राण्यांमध्ये अंत्यसंस्काराची पद्धत ही ‘प्राण्यांची सामाजिक कृती’ असते, असे संशोधकांचे मत आहे. किंबहुना, त्या वर्तनामुळेच ते उर्वरित जगापासून वेगळे ठरतात. मृत्यू म्हणजे काय याचे महत्त्व त्यांना समजते. आत्तापर्यंत, अंत्यसंस्काराच्या वर्तणुकीचा सर्वात जुना पुरावा निअ‍ॅण्डरथल्स आणि (आधुनिक मानवांमध्ये)  होमो सेपियन्स यांच्या प्रजातीतील होता, जे ‘होमो नालेडी’च्या नंतर तब्बल एक लाख वर्षांनी अस्तित्त्वात आले. 

आणखी वाचा: विश्लेषण: मानवी उत्क्रांतीचा नवीन सिद्धांत – कोण होते मानवाचे पूर्वज?

दफनाचा प्रत्यक्ष पुरावा

ली बर्जर आणि त्यांच्या संशोधन पथकाने रायझिंग स्टार गुहा समूहात दोन ठिकाणी ‘होमो नालेडी’ने दफनविधी केल्याचा पुरावा नोंदवला आहे. ‘सायंटिफिक अमेरिकन’ या विख्यात नियतकालिकातील शोधप्रबंधामध्ये म्हटले आहे की, ‘होमो नालेडी’ प्रजातीचे मृतदेह जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात ठेवलेले दिसतात. जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह ठेवून नंतर माती टाकून ते खड्डे बंद करण्यात आले. यातील एक मृतदेह हा मातेच्या गर्भातील अर्भकाप्रमाणे पोटाशी पाय घेतलेल्या अवस्थेत खड्ड्यात पुरलेला सापडला.  संशोधकांनी एका ठिकाणी दगडी हत्यारसदृश्य वस्तू मिळाल्याची ही नोंद केली आहे. परंतु ते दगडी हत्यार आहे का? याची पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. असे असले तरी, काही अभ्यासकांनी या संशोधनावर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते गुहेच्या पृष्ठभागावर असलेल्या हाडांचे तुकडे पाण्यामुळे धुतले जाऊन, वर्षानुवर्षे जमा झालेल्या गाळाने झाकले गेले. त्यामुळे ते दफन केल्याचे भासत आहे. या शिवाय ज्या ठिकाणी ही दफने आढळली त्या गुहा समूहात संशोधकांना भिंतीवर केलेले कोरीव काम सापडले आहे. यात प्रामुख्याने भौमितिक आकार कोरलेले आहेत. परंतु ‘होमो नालेडी’च्या दफनांचा व  या भित्तीचित्रांचा नेमका संबंध का याचा शोध सुरू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100000 years ago homo naledi buried their dead in rising star cave south africa svs