दक्षिण कोरियातील १०८ बौद्ध यात्रेकरूंचा एक गट ९ फेब्रुवारीपासून १ हजार १६७ किलोमीटरची पदयात्रा करण्यास निघाला आहे. ही पदयात्रा ४३ दिवस चालणार असून भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भगवान बुद्धांच्या धार्मिक स्थळांना हा गट भेट देणार आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजकीय संबंधांना ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील मैत्री आणि सहकार्य वाढविणे हा यात्रेमागील हेतू असल्याचे भारतातील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीर्थयात्रेच्या वेळापत्रकानुसार, यात्रेकरु नेपाळमधील लुंबिनी येथील बुद्धाच्या जन्मस्थानाला भेट देण्यासाठी जाण्यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक बौद्ध स्थळांना भेट देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना

भारतातील बुद्धिस्ट सर्किट दक्षिण कोरियाच्या पर्यटक आणि यात्रेकरूंना भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास आणि बुद्धाच्या पाऊलखुणा शोधण्यास मदत करेल. २०१६ साली बुद्धिस्ट सर्किटची कल्पना मांडण्यात आली. यामध्ये बुद्धांच्या जन्मापासून ते त्यांच्या परिनिर्वाणापर्यंत संबंध आलेल्या महत्त्वाच्या स्थळांना जोडण्यात आले आहे. बिहारमधील बोधगया, वैशाली, राजगीर आणि कुशीनगर तर उत्तर प्रदेशमधील सारनाथ आणि श्रावस्ती ही ठिकाणे येतात. तसेच नेपाळमधील कपिलवास्तू आणि लुंबिनी या स्थळांचाही यामध्ये समावेश आहे.

बुद्धिस्ट सर्किटला केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. कारण बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला. आठ प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी सात तीर्थक्षेत्र भारतामध्ये आहेत. परंतु आपल्या देशात जगातील एक टक्काही बौद्ध यात्रेकरु येत नाहीत. भारताने देखील ही बाब मान्य केली आहे. सरकारचे मंत्री म्हणतात की, इंडोनेशिया आणि थायलंड सारख्या आग्नेय-आशियाई राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित पर्यटकांचा मोठा ओढा असतो. पण भारत त्या तुलनेत मागे आहे. कदाचित पायाभूत सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे हे होत असावे, असे केंद्र सरकारचे मंत्री सांगतात.

“आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन पर्यटकांना भारतात येण्यासाठी आकर्षित करम्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामुळे महसूल आणि रोजगार निर्मितीमध्येही मोठी भर पडेल”, असे केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी २०१६ मध्ये सांगतिले होते. यासाठी तेव्हा बुद्धिस्ट सर्किटमधील विविध स्थळांचा विकास करण्यासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

चीनला रोखण्यासाठी भारताची नेपाळमध्ये कूच

मागच्यावर्षी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या मुहुर्तावर लुंबिनी येथे जाऊन बौद्ध सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली होती. चीनने लुंबिनीमध्ये स्वारस्य दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा संपन्न झाला होता. जवळपास एक दशकापूर्वी चीनने लुंबिनी येथे जागतिक शांतता केंद्र उभारण्यासाठी तीन अब्ज डॉलर एवढा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार चीनच्या रेल्वेचे जाळे थेट लुंबिनीपर्यंत आणण्याचीही चर्चा करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचा दौरा करुन बौद्ध सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली. या प्रकल्पावर अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार असून तीन वर्षात हे केंद्र उभारले जाईल. नेपाळमधील बौद्ध स्थळांशी मजबूत संबंध विकसित करण्याचा भारताचा हा पहिला मोठा प्रयत्न आहे. २०१४ मध्ये नेपाळच्या संविधान सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी नेपाळमध्ये बुद्धाचा जन्म झाल्याचे मान्य केले आणि नेपाळच्या भावनांना हात घालत भारत ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले. बुद्धिस्ट सर्किट हे भारतातील पहिले ट्रान्स – नॅशनल पर्यटन सर्किट म्हणून समोर येत आहे. लुंबिनीपासून सुरुवात होऊन उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे हे सर्किट पूर्ण होईल. कुशीनगर येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन करण्यात आले.

नेपाळमधील हिंदू तीर्थक्षेत्रे

केवळ बौद्ध धर्मच नाही, तर नेपाळच्या मदतीशिवाय भारताचा हिंदू धर्माविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रयत्नही पूर्ण होऊ शकत नाही. २०१६ मध्ये भारताने घोषित केलेल्या रामायण सर्किटमध्ये नेपाळमधील जनकपूरचा समावेश आहे. हे सीतेचे जन्मस्थान मानले जाते. मागच्यावर्षी भारत गौरव पर्यटन रेल्वेने आपला पहिला प्रवास पूर्ण केला होता. पहिल्यांदाच ही ट्रेन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नेपाळमध्ये गेली होती. जनकपूरमधील राम जानकी मंदिर हा रामायण सर्किटचा भाग असल्यामुळे हे शक्य झाले.

नेपाळशिवाय भारताच्या धार्मिक आस्था अपूर्ण राहू शकतात, नेपाळशिवाय भारताच इतिहास अपूर्ण राहू शकतात. तसेच नेपाळशिवाय भारताची धाम यात्रा अपूर्ण राहू शकतो. एवढेच नाही तर नेपाळशिवाय राम देखील अपूर्ण आहे, त्यामुळे नेपाळसोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक विश्वासाचा सेतू बांधण्याचा भारताचा प्रयत्न आहे. २०१८ साली जनकपूर-अयोध्या बस सेवेचे लोकार्पण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या माध्यमातून नेपाळच्या नेतृत्वाला आम्ही सूक्ष्म संदेश देऊ इच्छितो की, त्यांची जवळीक बीजिंगसोबत वाढत असली तरी भारत आणि नेपाळमधील लोकांची धार्मिक आस्था समान आहेत.

भारत-नेपाळ मधील नागरिकांच्या धार्मिक आस्था समान

मागच्याच आठवड्यात भगवान विष्णूचे प्रतिक मानले जाणारे शालिग्राम शिळा जनकपूर येथून अयोध्येला आणण्यात आल्या. अयोध्येमध्ये राम मंदिरात राम आणि जानकीच्या मूर्ती तयार करण्यासाठी या शिळांचा वापर केला जाणार आहे. भारताने नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे नूतनीकरण आणि यात्रेकरुंसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी देखील निधी दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि नेपाळच्या संबंधाचे वर्णन करताना म्हटले होते, “सीता मातेने बांधलेले हे बंध आजही मजबूत आहेत. हेच बंध रामेश्वरम ते पशुपतीनाथ, लुंबिनी ते बोधगया पर्यंत लोकांना आकर्षित करतात आणि याच बंधनाने मी देखील आकर्षित होत असतो.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 108 south korean pilgrims walking from india to nepal places related to gautam buddha kvg