मानवी मन हे श्रद्धा- अंधश्रद्धेच्या भावविश्वात गुरफटलेलं असते. बहुतांश वेळा काय बरोबर किंवा काय चूक याचा विचार न करता आपली श्रद्धा आपल्याला काय सांगते, यावर निर्णय घेतले जातात. मग काळ कुठलाही असो आधुनिक असो वा आदिम. म्हणूनच बुद्धीला न समजणाऱ्या गोष्टींसाठी किंवा एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकदा तंत्र, मंत्र, जादूटोण्याचा आधार घेतला जातो. ‘Atiqot’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडच्या संशोधनात जेरुसलेमच्या डोंगरातील मोट्झा पुरातत्त्वस्थळी सापडलेल्या एका आगळ्या थडग्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे थडगं प्री-पॉटरी (Pre-Pottery Neolithic B) नवाश्मयुगीन कालखंडातील आहे. हे थडगं एका मांत्रिक बाईचं असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

सहा बोटांची ‘ती’ आणि धार्मिक नेतृत्त्व!

या शोधाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या महिलेच्या डाव्या हाताला सहा बोटं होती. प्राचीन संस्कृतींमध्ये अशा वैशिष्ट्यांना आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक मानलं जात असे. या उत्खननाचं नेतृत्व करणारे इस्रायल अँटिक्विटीज अथॉरिटीचे संशोधक डॉ. हमूदी खलैली, डॉ. इआनिर मायलवस्की आणि डॉ. अॅना एइरिच-रोज यांच्या मते, हाडांच्या विश्लेषणानुसार त्या व्यक्तीच वय मृत्यूच्या वेळी १५ वर्षांहून अधिक होतं. तिच्या सापडलेल्या अंत्यसंस्काराच्या पुराव्यांमुळे नवाश्मयुगीन समाजातील तिच्या महत्त्वाची संकल्पना अधिक बळकट होते. यामध्ये हिरव्या दगडांच्या माळा आणि मदर-ऑफ-पर्लचे दागिने यांचा समावेश आहे. हे घटक शमन किंवा जादूगार स्त्रियांशी संबंधित असतात. या स्त्रिया धार्मिक विधी आणि सामुदायिक समारंभांचे नेतृत्त्व करीत असतं, असे अभ्यासक सांगतात.

नवाश्मयुगीन आध्यात्मिक श्रद्धा

२०१८ ते २०२० दरम्यान मोट्झा येथे झालेल्या उत्खननांमध्ये प्री-पॉटरी नवाश्मयुगीन बी (Pre-Pottery Neolithic B) कालखंडातील सर्वांत मोठ्या वसाहतींपैकी एक वसाहत आहे. या उत्खननांद्वारे जेरुसलेमकडे जाणाऱ्या पश्चिम दिशेच्या तिसऱ्या महामार्गाच्या (हायवे १६) बांधणीपूर्वी तेथील प्राचीन समुदायांचे जीवन आणि त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धा अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाली आहे. घरांच्या आत अनेक थडगी आढळून आली आहेत. ही थडगी जमिनीच्या खाली किंवा इमारतींच्या भिंतीजवळ खोदलेली होती. बहुतांश व्यक्ती दगडी बांगड्या, लॉकेट आणि अलाबास्टर व हिरवे दगड यांसारख्या दुर्मिळ सामग्रीपासून बनवलेल्या मण्यांसारख्या अलंकारांसह दफन केल्या जात.

बांगड्या आणि जन्म- मृत्यू

संशोधकांच्या मते, काही थडग्यांमध्ये सापडलेल्या दगडी बांगड्या जन्म आणि मृत्यू यांच्यातील संक्रमण विधींशी संबंधित होत्या. असे मानले जाते की, त्या बांगड्या मुले वयात येईपर्यंत घातल्या जात आणि विशिष्ट वय झाल्यावर त्यांचा समावेश एका धार्मिक विधीत केला जाई. हा विधी आधुनिक काळातील ‘राइट ऑफ पॅसेज’ विधींप्रमाणे असू शकतो. ज्यू परंपरेतील बार आणि बट मिट्झ्वा समारंभ हे त्याचे उदाहरण उत्तम ठरू शकते. ज्या लहान मुलांचा वयात येण्यापूर्वी मृत्यू झालेला आहे, त्यांना बांगड्यांसहच पुरण्यात आले आहे. उत्खननात अशा अनेक बालकांच्या थडग्यांमध्ये त्या बांगड्या त्यांच्या हातावर अखंड स्थितीत सापडल्या आहेत.

नवाश्मयुगीन कालखंड: मानव इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

नवाश्मयुग हा मानवी इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता. याच काळात मानवी समुदायांनी भटकंतीचा त्याग केला. मोठ्या वसाहती स्थापन केल्या आणि नवीन तंत्रज्ञान विकसित केले. वनस्पतीची लागवड आणि वन्य प्राण्यांना पाळीव करणे हा या युगातील सर्वांत महत्त्वाचा बदल होता. या नवकल्पनांनी केवळ त्यांची अर्थव्यवस्थाच नव्हे तर त्यांचे श्रद्धा तंत्र आणि धार्मिक विधी यांमध्येही मोठे परिवर्तन घडवले. संशोधकांच्या मते, हे धार्मिक विधी यासाठी खास उभारलेल्या सार्वजनिक इमारतींमध्ये पार पडत असत आणि त्यांचा पाण्याशी अतूट संबंध होता. उत्खनन केलेल्या प्रत्येक इमारतीत प्लास्टरच्या मदतीने तयार केलेली जलसंधारणाची यंत्रणा सापडली आहे किंवा त्या नैसर्गिक जलस्रोतांच्या जवळ त्या वास्तू स्थित होत्या. नवाश्मयुगीन समूहांच्या धार्मिक विधींमध्ये तसेच सामाजिक वावरामध्ये पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते, हेच यातून सिद्ध होते.

इस्रायली पुरातत्त्व प्राधिकरणाचे संचालक एली एस्कुसिडो यांनी सांगितलेले या शोधाचे महत्त्व

“मोट्झा येथे सापडलेले प्राचीन शामन महिलेचे थडगं सुमारे १० हजार वर्षांपूर्वीच्या समाजाच्या आध्यात्मिक जगाचा शोध घेण्यासाठी एक नव दारं उघडते. या अवशेषांमधून प्राचीन मानवतेच्या सांस्कृतिक श्रद्धा किती जटिल आणि समृद्ध होत्या, हे समजू शकते. दागिने आणि धार्मिक विधींमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंसारख्या वैयक्तिक वस्तूंद्वारे आपण त्या काळातील समाजव्यवस्था, सामाजिक स्तर आणि सामुदायिक भूमिका यांचा अभ्यास करू शकतो.”

इतिहास आणि श्रद्धेच्या संवादाचा आरसा

मोट्झा येथे सापडलेल्या १० हजार वर्षे प्राचीन मांत्रिक महिलेच्या थडग्याने नवाश्मयुगीन समाजाच्या आध्यात्मिक जगाचा एक अनोखा आरसा आपल्या समोर मांडला आहे. या उत्खननातून केवळ एका विशिष्ट व्यक्तीच्या श्रद्धा-पद्धतींचा मागोवा घेण्याची संधी मिळत नाही, तर संपूर्ण समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक वावराचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा होतो. ही नवाश्मयुगीन स्त्री केवळ एका जमातीची मांत्रिक नव्हती; ती त्या काळातील आध्यात्मिक विश्वास आणि सामुदायिक विधींचे प्रतीक होती. तिच्या सहा बोटांमुळे तिचे स्थान विशेष होते, तर तिच्या दफनाच्या पद्धतींनी नवाश्मयुगीन संस्कृतीतील मृत्यू आणि पारलौकिक जीवनाविषयीच्या समजुतींवर प्रकाश टाकला आहे. दगडी बांगड्या, हिरव्या दगडांच्या माळा आणि जलसंधारणाच्या संरचना यांसारख्या विविध पुराव्यांमधून त्या काळातील मानवी जीवनाच्या गूढतेचा शोध घेता येतो.

मृत्यू व पुनर्जन्माच्या सीमेवर…

या शोधामुळे मानवी संस्कृतीच्या जडणघडणीतील श्रद्धा, विधी आणि सामाजिक व्यवस्थांच्या महत्त्वाची जाणीव होते. नवाश्मयुगीन लोकांनी मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्यातील सीमारेषा किती गूढ रीतीने समजून घेतली होती. याचा अभ्यास करताना आधुनिक श्रद्धा आणि धार्मिक परंपरांशी त्याचे एक विलक्षण साधर्म्य आढळते.

Story img Loader