अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह विविध देशांवर टेरिफ लादत असल्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जगभरात याचे दूरगामी परिणाम दिसू लागले आहेत. याचा परिणाम आता अमेरिकेत साठवलेल्या सोन्याच्या साठ्यावरदेखील होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. जर्मनीने अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेले आपले १२०० टन सोने परत मागण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हा निर्णय अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण, व्यापार संबंध आणि देशांतर्गत राजकारणातील घडामोडींवर केंद्रित आहे. खरंच जर्मनी सोने परत मागवणार का? याचा अमेरिका आणि एकूण जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम होणार? जाणून घेऊयात.
जर्मनी १२०० टन सोने परत मागणार?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २० टक्के कर आकारण्यासह व्यापक शुल्क लादले आहे. याचा परिणाम जर्मनीतील निर्यातीवर होताना दिसत आहे, त्यामुळे व्यापारातील आव्हाने वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून जर्मनीला लक्ष्य केले आहे, त्यांच्या औद्योगिक धोरणावर टीका केली आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी जर्मनीचा उल्लेख ‘फ्रीलोडर’ म्हणून केल्याने तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेतली राजकीय घडामोडदेखील सध्याच्या स्थितीला कारणीभूत आहे.
ट्रम्प प्रशासनातील मित्रपक्षांवर युरोपियन राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. या हस्तक्षेपाला जर्मनीतील गुप्तचर संस्थांनी संवैधानिक धोका म्हटले आहे. जर्मनीतील लोकप्रतिनिधी वँडरविट्झ यांनी एका दशकापूर्वीच अमेरिकेतील सोन्याचा मुद्दा उपस्थित केला होता. २०१२ मध्ये त्यांनी सोने जर्मनीला हलवण्याचा विचार करण्यासाठी व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिकेत साठवलेल्या सोन्याची तपासणी करण्याची विनंती केली होती; त्यावेळी त्यांच्या विनंत्या नाकारण्यात आल्या होत्या, परंतु आता हा मुद्दा नव्याने उपस्थित केला जात आहे आणि जर्मनीतील राजकारणात या मुद्दयाने जोर धरला आहे.
युरोपियन संसदेचे सदस्य मार्कस फेर्बर यांनीदेखील देखरेखीची मागणी केली आहे. “बुंडेस बँकेच्या प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या सोन्याचे बार मोजले पाहिजेत आणि त्यांची कागदोपत्री नोंद केली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. युरोपमधील एका टॅक्सपेयर संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे मायकेल जेगर यांनी म्हटले आहे की, सर्व जर्मन सोन्याचे साठे फ्रँकफर्टमध्ये किंवा युरोपमध्ये शक्य तितक्या लवकर आणणे उत्तम निर्णय असेल.”
जर्मनीचे अमेरिकेत किती सोने आहे?
जर्मनीकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. जर्मनी अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीकडे अंदाजे ३,३५० मेट्रिक टन साठ्यापैकी सुमारे १,२३६ टन म्हणजेच ३७ टक्के साठा सध्या न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेत आहे. याची किंमत तब्बल १२३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. फेडरल रिझर्व्ह बँक ही ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक स्तरावर सर्वात सुरक्षित म्हणून ओळखली जाते. हे सोन्याचे साठे जर्मनीची मध्यवर्ती बँक असणाऱ्या ड्यूश बुंडेस बँकद्वारे व्यवस्थापित केले जातात. हे साठे अनेक दशकांपासून विविध जागतिक वित्तीय केंद्रांमध्ये साठवले जात आहेत.
जर्मनीतील आणखी ४३० टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आहे, तर जर्मनीच्या साठ्यापैकी निम्म्याहून अधिक सोने आता फ्रँकफर्टमध्ये देशांतर्गत साठवले जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जर्मनीने सोन्याचा मोठा साठा परदेशात ठेवण्याचा निर्णय घेतला. युद्धानंतर जर्मनीने आर्थिकदृष्ट्या स्वतःला पुन्हा स्थापित केले आणि ब्रेटन वुड्स प्रणाली अंतर्गत आपल्या व्यापारातील उत्पन्नाचे सोन्यात रूपांतर केले. शीतयुद्धातील तणाव वाढत असल्याने आणि पश्चिम युरोपमध्ये सोव्हिएत संघ प्रवेश करणार असल्याच्या शक्यतेने सुरक्षिततेसाठी आपली संपत्ती सुरक्षित मित्र राष्ट्रांकडे म्हणजेच न्यूयॉर्क, लंडन आणि पॅरिसमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोने परत आणण्याचे प्रयत्न आधीही झाले आहेत का?
२०१३ साली सार्वजनिक मोहिमा आणि राजकीय आंदोलनांच्या दबावामुळे बुंडेस बँकेने स्वदेशी सोने परत आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळी जर्मनीतील सोन्याच्या साठ्याचा मोठा भाग पॅरिसमधील बँक दे फ्रान्समध्ये साठवला गेला होता. त्यावेळी बुंडेस बँकेने पॅरिसहून ३७४ टन सोने फ्रँकफर्टला आणि आणखी ३०० टन सोने न्यूयॉर्कहून जर्मनीला परत हलवले. २०२० पर्यंत एकूण साठ्यापैकी किमान अर्धा साठा देशात परत आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केले आणि किमान अर्धा साठा देशात परत आणला.
असे असूनही जर्मनीने न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने साठवण्याचा निर्णय कायम ठेवला. तिथे सोने साठवणे म्हणजे प्रमुख वित्तीय बाजारपेठांशी जवळीक कायम ठेवणे, हे त्यामागील उद्दिष्ट होते. आता पुन्हा एकदा या सोन्याची तपासणी सुरू असूनही, बुंडेस बँकेचा अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेबरोबरच्या त्यांच्या व्यवस्थेवर विश्वास आहे. बुंडेस बँकेचे अध्यक्ष जोआकिम नागेल यांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, “आमच्या सोन्याच्या साठवणुकीसाठी न्यूयॉर्कमधील फेडरल रिझर्व्ह बँक आमची विश्वासार्ह भागीदार आहे. त्यांच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. अमेरिकन सेंट्रल बँकेतील आमच्या सहकाऱ्यांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
बुंडेस बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नियमितपणे सोन्याच्या साठवणुकीच्या ठिकाणांचे मूल्यांकन करतो आणि न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँक सोन्यासाठी एक महत्त्वाचे साठवणुकीचे ठिकाण आहे आणि कायम असेल. परंतु, सध्या वाढत्या धोरणात्मक अनिश्चिततेमुळे हा सोन्याचा साठा अमेरिकेत असणे चिंतेचे एक प्रमुख कारण आहे.
जर्मनीचे सोने महत्त्वाचे का?
राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेत सोने महत्त्वाची भूमिका बजावते. महागाईच्या परिस्थितीत, संकटाच्या काळात आणि चलनातील अस्थिरतेपासून बचाव करण्याकरिता सोने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. युद्धानंतर आर्थिक वाढ झालेल्या जर्मनीसाठी हे साठे केवळ आर्थिक मालमत्ता नसून विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. जर्मनी आपले सोने परत मागवण्याचा विचार करू शकतात किंवा किमान कठोर पडताळणी नियमदेखील लागू करू शकतात. मुख्य म्हणजे अनेक देशांनी यापूर्वी ही पावले उचलली आहेत.
२०१४ मध्ये नेदरलँड्सने फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कमधून १२२.५ टन सोने अॅमस्टरडॅमला परत आणले होते. याचे कारण म्हणजे, संकटाच्या काळात सोने जवळ असावे हा त्यांचा हेतू होता. डच लोकांनी अजूनही अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये सोन्याची साठवणूक केली आहे. त्याचप्रमाणे फ्रान्स, चीन, तुर्की आणि रशियासारखे देश त्यांचे बहुतांश सोने देशांतर्गत साठवतात. अनेक राष्ट्रे त्यांच्या सोन्याच्या साठ्याचे नेमके स्थान जाहीर करत नाहीत.