12,000-Year-Old Underwater Pyramid: पाण्याखाली सापडलेल्या एका रहस्यमय ‘पिरॅमिड’ने इतिहासाला एक नवे वळण दिले आहे. तैवानजवळ सापडलेला पाण्याखालचा एक ‘पिरॅमिड’ सध्या विशेष चर्चेत आहे. या पिरॅमिडच्या अस्तित्त्वामुळे आपल्या प्राचीन जगाविषयीच्या समजुती पूर्णपणे बदलू शकतात, असा विश्वास अभ्यासक व्यक्त करत आहेत. जपानच्या र्युक्यु बेटांजवळ समुद्रसपाटीपासून केवळ ८२ फूट खाली असलेली योनागुनी स्मारक नावाची ही रहस्यमय रचना संशोधकांमध्ये आश्चर्याचा विषय ठरत आहे. १९८६ साली या रचनेची पहिल्यांदा नोंद करण्यात आली. प्रथमदर्शनी ही संपूर्ण रचना दगडात घडवल्याचे दिसते, त्यामुळे ही मानवनिर्मित असावी असा तर्क मांडण्यात आला होता. ही रचना ९० फूट उंच असून १०,००० वर्षांहून जुनी आहे. त्यामुळेच या रचनेचा कर्ता कोण आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा अभ्यासकांमध्ये आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गूढ रचनेच्या अस्तित्त्वाचा मागोवा या लेखात घेण्याचा हा प्रयत्न.

मोठी ऐतिहासिक घटना

या रचनेचा किंवा पिरॅमिडचा कालखंड हा सुमारे १०,००० वर्षांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जमीन संपूर्ण पाण्याखाली जाण्यापूर्वी या भागात अस्तित्त्वात असलेल्या संस्कृतीमध्ये या पिरॅमिडची निर्मिती झाली असावी अशी एक शक्यता काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. हे जर खरं असले तर सध्या जगात उपलब्ध असलेल्या कोणत्याही इजिप्शियन पिरॅमिड्स आणि स्टोनहेन्जसारख्या इतर प्राचीन स्थापत्यांपेक्षा ही रचना अधिक प्राचीन असू शकते. मंदिरे व पिरॅमिड्ससारख्या मोठ्या रचना बांधण्याची क्षमता माणसात शेतीच्या विकासाबरोबरच म्हणजे १२,००० वर्षांपूर्वी विकसित झाली, असे अभ्यासक मानतात. परंतु, जर योनागुनीसारखी रचना त्या काळाच्या खूप आधीच उभारली गेली असेल तर ही मोठी ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे अटलांटिस या पुराणकथेतील लुप्त मानवजातीचा शोध घेतला जाऊ शकतो, असे संशोधकांना वाटते.

वादाचं कारण

खरं तर योनागुनी स्मारकाला अनेकदा जपानचं अटलांटिस असं म्हटलं जातं. योनागुनी ही रचना मानवनिर्मित आहे, हे अनेक शास्त्रज्ञांनी आजही मान्य केलेले नाही. joe Rogan Experience या पॉडकास्टवर वैज्ञानिकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे स्थळ पुन्हा चर्चेत आले होते. नामशेष झालेल्या प्राचीन संस्कृतींवर लिहिणारे लेखक ग्रॅहम हॅनकॉक आणि पुरातत्वतज्ज्ञ फ्लिंट डिबल यांच्यात योनागुनीच्या छायाचित्रांवरून वाद झाला. डिबल यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे ठिकाण मानवनिर्मित असण्याची कोणतीही शक्यता त्यांना दिसत नाही. “मी अनेक प्रकारच्या नैसर्गिक रचना पाहिल्या आहेत आणि मला यामध्ये मानवी स्थापत्याची कोणतीही खूण दिसत नाही,” असं डिबल यांनी सांगितलं. त्यावर हॅनकॉक म्हणाले, “ही रचना मानव निर्मित नाही हे ऐकून मला आश्चर्य वाटतं. कदाचित आपली नजर वेगळी आहे.” हॅनकॉक यांनी असा दावाही केला की, पाणबुड्यांनी
घेतलेल्या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे मानवनिर्मित कमानी, शिलालेख, टेरेसेस आणि एक कोरलेला ‘चेहरा’सदृश खडकही दिसतो.

सुमारे त्याच काळातील तुर्कीतील गोपेकली टेपे या पुरातत्त्व स्थळाबरोबर योनागुनीची तुलना केली जाऊ शकते. ही जागा सुमारे इ.स.पू. ९५०० ते इ.स.पू. ८००० दरम्यान अस्तित्त्वात होती. म्हणजेच स्टोनहेन्ज आणि इजिप्शियन पिरॅमिड्सच्या आधीच्या हजारो वर्षांपूर्वी ही जागा अस्तित्त्वात होती. दरम्यान, इंडोनेशियातील गुनुंग पडांग ही आणखी एक प्राचीन रचना गोपेकली टेपे आणि योनागुनीच्या आधीची असल्याचे मानले जाते. १८९० साली डच संशोधकांनी पुन्हा शोधून काढलेल्या या जागेबाबत आता असा दावा करण्यात येतो की, ही जगातील सर्वात जुनी पिरॅमिड रचना आहे. लाव्हा खडकांच्या टेकडीखाली दडलेली ही ९८ फूट खोल मेगालिथिक रचना १६,००० वर्षांपूर्वीची आहे, असा संशोधकांचा दावा आहे.

पारंपरिक संकल्पनेला छेद

ही रचना शिकारी समुदाय हा प्रिमिटिव्ह होता या पारंपरिक संकल्पनेला छेद देते. डॉ. मासाकी किमुरा यांच्या मते, योनागुनीसंदर्भातील चर्चेवर अजूनही पडदा पडलेला नाही. त्यांनीच या रचनेच्या वाळूशिला प्रकाराच्या वयाचे परीक्षण करून १०,००० वर्षांहून जुनी असल्याचे सिद्ध केले. त्या काळात ही रचना कोरड्या जमिनीवर होती. शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीस बर्फ वितळल्यानंतर समुद्रपातळी वाढल्याने हे क्षेत्र पाण्याखाली गेले. सुमारे २०,००० वर्षांपूर्वीच्या हिमयुगात समुद्राची पातळी आजच्या तुलनेत सुमारे ४०० फूट खाली होती. मात्र, १९९९ साली डॉ. रॉबर्ट स्कॉच (बोस्टन विद्यापीठ) यांनी योनागुनी आणि अटलांटिस यांच्यातील संबंध फेटाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दावा केला की, योनागुनी आणि जवळच्या परिसरातील अनेक रचना या नैसर्गिक खडकरचना आहेत. त्यांनी सांगितले की, योनागुनी ही रचना भूकंपप्रवण क्षेत्रात तैवानपासून ६२ मैल पूर्वेला स्थित आहे. त्यामुळे दगडांमधील फटी, सपाट तोंडे आणि टप्प्यांसारख्या रचना नैसर्गिक आहेत. “योनागुनीच्या छायाचित्रांकडे पाहताना अनेकांना त्याच्या नियमित टप्प्यांमुळे ही रचना कृत्रिम वाटते,” असं डॉ. स्कॉच यांनी आपल्या लेखात नमूद केलं आहे.

योनागुनीसारख्या रचना मानवी इतिहासाबद्दलच्या पारंपरिक संकल्पनांना धक्का देणाऱ्या ठरत आहेत. जर ही रचना खरोखरच मानवाने तयार केली असेल, तर ती केवळ स्थापत्यकलेची कमाल नाही, तर ती अशा प्राचीन संस्कृतीचा पुरावा आहे जी आजवर ज्ञात इतिहासाच्या चौकटीत बसत नाही. यामुळेच योनागुनी हे ठिकाण केवळ संशोधनाचं केंद्र न राहता, एक संभाव्य गूढ आणि विस्मरणात गेलेल्या मानवजातीच्या अस्तित्त्वाचं दार उघडणारं प्रवेशद्वार ठरू शकतं. या रचनेच्या भोवती फिरणाऱ्या शास्त्रीय वादविवादांमुळे इतिहासाची पुनर्व्याख्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे योनागुनी हा फक्त एक पाण्याखालचा पिरॅमिड नसून तो भूतकाळाकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलू शकतो आणि कदाचित एक हरवलेलं खंडकथन पुन्हा उजेडात आणू शकतो.