तिरुपतीमधील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटल्या जाणार्‍या लाडवांमध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळून आली; ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. जनावरांच्या चरबीचा वाद सुरू असतानाही श्री व्यंकटेश्वर मंदिरातील भक्त व्यंकटेश्वर राव म्हणतात, “आमचा विश्वास अढळ आहे.” राव तिरुपती येथील मंदिरात लाडू खरेदी करण्यास यात्रेकरूंच्या गर्दीत उभे होते. त्यांच्यासारख्या लाखो भाविकांचा अढळ विश्वास असल्याचे सांगत प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचा वाद सुरू असतानाही लाडूखरेदी सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरातील लाडूचा इतिहास, त्याची विक्री यासह या संपूर्ण वादाविषयी जाणून घेऊ, तसेच या प्रकरणावर भाविकांचे मत काय हेदेखील जाणून घेऊ.

तीन लाख लाडू, ५०० कोटींची विक्री

तिरुपतीमध्ये लाडवांचा प्रसाद देण्याची ३०० वर्षांहून अधिक काळापासूनची समृद्ध परंपरा आहे. १७१५ साली याची सुरुवात झाली, असे सांगितले जाते. पोटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराच्या स्वयंपाकघरात दररोज तयार केले जाणारे हे लाडू दित्तम नावाच्या कठोर तयारीच्या प्रक्रियेतून बनतात. हे लाडू त्यांच्या अद्वितीय चवीसाठीही ओळखले जातात. मूलतः बेसन (चण्याचे पीठ) आणि गुळाचा रस यांपासून तयार करण्यात येणार्‍या या लाडवांमध्ये बदाम, काजू व मनुका यांसारख्या सुक्या मेव्याचा समावेश करून, त्याची चव आणि पोषण वाढवले जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे या लाडवांना दीर्घ इतिहास आहे. याची पाककृती आतापर्यंत केवळ सहा वेळा बदलली गेली आहे. हे लाडू तयार करण्यासाठी दररोज तब्बल १५ हजार किलोग्रॅम गाईचे तूप वापरले जाते, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

तिरुपतीमध्ये लाडूंचा प्रसाद देण्याची ३०० वर्षांहून अधिक काळापासूनची समृद्ध परंपरा आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?

२०१४ मध्ये तिरुपती लाडूला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय टॅग देण्यात आला आणि त्याच्या नावाचा वापर करून, इतरांना लाडूची विक्री करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले. लाडवांच्या स्वरूपात मिळणार्‍या या भेटवस्तूची खरेदी करण्यासाठी यात्रेकरू मंदिरात गर्दी करतात, अनेकदा ते मित्र आणि नातेवाइकांसाठीही हा प्रसाद घरी नेतात. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुमला येथे दररोज अंदाजे तीन लाख लाडू तयार करून, वितरित केले जातात; ज्यामुळे ५०० कोटी रुपयांची लाडवांची वार्षिक विक्री होते.

लाडवांचा वाद काय आहे?

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)च्या अहवालात तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आले. त्यामुळे लाखो भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या नमुन्यांमध्ये डुकराची चरबी, गाईची चरबी (बीफ) व माशांचे तेल यांसारखे नमुने आढळून आले. यासंबंधित प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्यानंतर, तूप पुरवठादार कंपनी ‘एआर डेअरी फूड्स’ला तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (टीटीडी)ने काळ्या यादीत टाकले आणि आता कर्नाटक दूध महासंघालाकडे तूप पुरवठ्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

तेलगू देसम पार्टी (टीडीपी)च्या नेतृत्वाखालील सरकारने प्रयोगशाळेचे अहवाल सार्वजनिक केले, तेव्हा हा वाद वाढला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआरसीपीच्या नेतृत्वाखालील मागील सरकारच्या काळात मंदिरात भेसळयुक्त तूप पुरविण्यात आल्याचा आरोप केल्याने राजकीय वाद उफाळून आला. वायएसआरसीपी नेते वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने राज्य निवडणुकीत आपली सत्ता गमावली होती आणि त्यांनी सत्ताधारी टीडीपीवर धार्मिक बाबींचे राजकारण केल्याचा आरोप केला होता. या वादामुळे पवित्र लाडवांची मागणी कमी होईल असा अंदाज होता; मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तसे काही झाले नाही.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)च्या अहवालात तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

वादाचा विक्रीवर परिणाम नाही

मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या वादाचा विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. चार दिवसांत तिरुमला मंदिरात १४ लाखांहून अधिक लाडवांची विक्री झाली. १९ सप्टेंबरला ३.५९ लाख लाडवांची विक्री झाली. त्यानंतर २० सप्टेंबरला ३.१७ लाख, २१ सप्टेंबरला ३.६७ लाख व २२ सप्टेंबरला ३.६० लाख लाडूंची विक्री झाली. मंदिरातील दररोजच्या लाडवांची विक्री सरासरी ३.५० लाख आहे. त्यामुळे असे दिसून येते की, वादानंतरही भक्तांच्या श्रद्धेवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. “आता लाडवांची चव आणखी चांगली झाली आहे. शुद्ध तुपाचा सुगंध मला बालपणी देण्यात येणार्‍या प्रसादाची आठवण करून देतो आहे,” असे विजयवाडा येथील यात्रेकरू लक्ष्मी नारायण यांनी ‘डेक्कन क्रॉनिकल’ला सांगितले. बंगळुरूचे भक्त रमेश कुमार पुढे म्हणाले, “पोत आणि चवीमध्ये लक्षणीय फरक आहे.” अनेक भक्तांनी एनडीटीव्हीला असेही सांगितले की, तिरुपती लाडवांवरील वाद आता जुना झाला आहे.

तिरुमला मंदिरासह भारतभरातील ‘टीटीडी’ संचालित इतर मंदिरांमध्ये लाडूच्या विक्रीत कोणतीही घट झालेली नाही. ‘टीटीडी’कडून विशाखापट्टणममधील रुशीकोंडा हिल, गुंटूर जिल्ह्यातील वेंकटपलेम, विजयवाडा, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कुरुक्षेत्र आणि जम्मू-काश्मीरसारख्या ठिकाणी मंदिरांमध्ये लाडू वितरित केले जातात. एका ‘टीटीडी’च्या अधिकाऱ्याने ‘द हिंदू’ला सांगितले की, सर्व टीटीडी मंदिरांना लाडू पुरवले जातात, तेथे भाविक नेहमीप्रमाणे रांगा लावत असतात. “टीटीडीने वेंकटचलमला तीन हजार लाडू, चार हजार विशाखापट्टणमला, दोन हजार विजयवाडाला, १० हजार चेन्नईला, तीन हजार बेंगळुरूला व आठ हजार हैदराबादला पाठवले आहेत,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : Israel-Hezbollah War: इस्रायलचा हिजबूलवर हवाई हल्ला, ४९२ जणांचा मृत्यू; युद्ध आणखी चिघळणार?

अनेक जण हा पवित्र लाडू मिळवण्याची वाट बघतात. “टीटीडीने जाहीर केले आहे की, त्यांच्या मंदिरात दररोज लाडू विकले जातील. पण, काही ठिकाणी आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच प्रसाद मिळतो. लाडू उपलब्ध असताना आम्ही शनिवारची आतुरतेने वाट पाहतो,” असे व्ही. शेषगिरी यांनी विजयवाडा येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातून लाडू खरेदी केल्यानंतर वृत्तपत्राला सांगितले. दरम्यान, ‘टीटीडी’चे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी भक्तांना आश्वासन दिले आहे की, लाडवांची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणाचे उपाय केले जात आहेत. “आमच्या भक्तांचा विश्वास सर्वोत्कृष्ट आहे. श्रीच्या लाडूचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे त्यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले.