गुजरातच्या मोरबी शहरात रविवारी संध्याकाळी मच्छू नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १३३ जणांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. झुलता पूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनी एकाचवेळी मोठी गर्दी केली होती. या दुर्घटनेनंतर लष्कर, वायू दल, नौदलासह एनडीआरएफकडून मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडूनही नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. या घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे.
घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मच्छू नदीवरील हा पूल जवळपास सात महिन्यांआधी दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑक्टोबरला गुजराती नववर्ष दिनी हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. मोरबी नगरपालिकेच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्राशिवाय हा पूल खुला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाची दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे कंत्राट ‘ओरेवा’ समुहाला १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते.
ऐतिहासिक झुलता पूल
मोरबी शहरातील मच्छू नदीवरील हा पूल २३० मीटर लांब होता. गुजरातमधील हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. या पुलाला दररोज शेकडो लोक भेट देत होते. उत्तराखंडमध्ये गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या ‘राम आणि लक्ष्मण झुला’च्या धर्तीवर या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. मोरबी शहराचे माजी शासक वाघजी ठाकोर यांनी १४३ वर्षांआधी हा पूल बांधला होता. ठाकोर यांच्यावर वसाहतवाद्यांचा प्रभाव होता. दरबारगड ते नजरबाग पॅलेसपर्यंत कलात्मक आणि तांत्रिकदृष्टया अत्याधुनिक पूल बांधण्याचा मानस त्यांनी पूर्ण केला.
२० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या झुलत्या पुलाचे पहिल्यांदा उद्घाटन करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामातील साहित्य इंग्लंडमधून आयात करण्यात आले होते. तेव्हा हा पूल बांधण्यासाठी साडेतीन लाखांचा खर्च आला होता. २००१ मध्ये झालेल्या भूकंपात या पुलाचंही नुकसान झालं होतं.
दुरुस्तीसाठी सात महिने पूल बंद होता
दुरुस्तीसाठी हा पूल यावर्षी मार्चपासून सात महिने बंद होता. रविवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पाच दिवसांआधी २६ ऑक्टोबरला हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीचं आणि व्यवस्थापनाचं कंत्राट ‘ओरेवा’ कंपनीला १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलं होतं. हे कंत्राट दोन कोटींचे होते.
सुट्ट्यांमुळे पुलावर गर्दी
दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच रविवार असल्याने या पुलावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती. काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत होते, अशी माहिती अहमदाबादेतील रहिवासी विजय गोस्वामी यांनी दिली आहे. “तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. या परिसरातून निघण्यापूर्वी मी पूल कर्मचाऱ्यांना सतर्क केले होते. हा पूल हलवण्यापासून लोकांना थांबवा, असेही कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मात्र, त्यांचा रस केवळ तिकीट विक्रीमध्ये होता. गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थाच उपलब्ध नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले”, अशी धक्कादायक माहिती गोस्वामी यांनी दिली आहे.