– भगवान मंडलिक
कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामुळे पावसाचे नितळ पाणी जमिनीवर येईस्तोवर हिरवे, गुलाबी होऊ लागल्याने डोंबिवली अैाद्योगिक पट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. याच काळात या भागात सांडपाण्याचे प्रदूषण, कारखान्यांमध्ये होणारे स्फोट हे मुद्देही स्थानिक रहिवाशांसाठी अस्वस्थतेचे कारण बनले. नागरी वसाहतींना खेटूनच उभा राहिलेला अैाद्योगिक पट्टा आणि या पट्ट्यास लागूनच पुढे नव्या नागरी इमारतींना परवानगी अशा नियोजनशून्य कारभारामुळे डोंबिवलीचा एक मोठा नागरी पट्टाच अैाद्योगिक परिसराचा भाग होऊन बसला आहे. मंगळवारी या पट्ट्यातील काही कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झालेला असला, तरी येथील उद्योजक, कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आणि या उद्योगांवर अवलंबून असलेली लहान उद्योगांची साखळी यांचाही पुरेसा विचार झाला आहे का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. शिवाय येथील प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी मंडळींवर काही कारवाई होणार का याचे उत्तरही सरकारला द्यावे लागणार आहे.
औद्योगिकीकरणाला सुरुवात कधी?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेनंतर ठाण्यातील वागळे इस्टेट येथे पहिली, त्यानंतर १९६४ मध्ये ३४७.८८ हेक्टरवर डोंबिवली एमआयडीसीची उभारणी झाली. स्थानिक पातळीवर उद्योग व्यवसाय, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात हा या मागचा उद्देश होता. उद्योगांना लागणाऱ्या पाण्यासाठी शासनाने उल्हास खोऱ्यातील बारवी येथे धरण उभारण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीबरोबर औद्योगिक वसाहतींना दररोज बारवी धरणातून सुमारे ९०० ते ११०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो.
डोंबिवली एमआयडीसीत कंपन्या किती आणि त्यांचे क्षेत्रफळ किती?
एमआयडीसीत ६५० कंपन्या आहेत. यांत रसायने, कापड प्रक्रिया, इलेक्ट्राॅनिक्स, इंजिनीअरिंग कंपन्यांचा समावेश आहे. १४५ कंपन्या कापड प्रक्रिया, १३५ रासायनिक, ३०० इंजिनिअरिंग, १०० इलेक्ट्राॅनिक्स कंपन्या आहेत. औद्योगिक क्षेत्र टप्पा एक मध्ये ११४.५९ हेक्टर, आणि टप्पा दोन १००.५१ हेक्टर असे वसलेले असून, निवासी क्षेत्र १३३.१४ हेक्टरवर विस्तारलेले आहे.
कंपनी चालक हा स्थानिक आहे की मुंबई परिसरातील आहे?
६० वर्षांपूर्वी मुंबई परिसरात उच्चशिक्षण घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द असलेल्या डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातील बहुतांशी उच्चशिक्षितांनी डोंबिवली एमआयडीसीत भूखंड घेऊन स्वत:च्या कंपन्या उभ्या केल्या. घाटकोपर, मुलुंड, अंधेरी येथील उद्योजक डोंबिवलीत येऊन व्यवसाय करू लागले. या मूळ व्यावसायिकांच्या विदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या पुढील पिढ्यांनी आपल्या जुन्या उद्योग व्यवसायाचा तंत्रज्ञानाधारित विस्तार केला. मराठी लघु उद्योजकांची एक मोठी फळी येथे कार्यरत आहे.
एमआयडीसीत एकूण किती कामगार काम करतात?
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुमारे एक लाख ६५ हजार कामगार काम करतात. बहुतांशी कामगार परप्रांतीय आणि थोड्या संख्येनेच स्थानिक आहेत. कंपन्यांमध्ये पाळी पद्धतीने आणि काही वेळा अधिक वेळ काम करावे लागत असल्याने स्थानिक कामगार तग धरत नाहीत, असे साधारणपणे बोलले जाते. परप्रांतीय कामगारांची अधिक चिकाटीने काम करण्याची क्षमता असल्याने ते मागील ४० ते ५० वर्षांपासून कंपन्यांमध्ये काम करतात. काहींची मुले या कंपन्यांमध्ये कामाला लागली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड , कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कामगार वर्ग अधिक आहे.
कोणत्या कंपन्या सर्वाधिक प्रदूषण करतात?
डोंबिवली एमआयडीसीतील पाच रासायनिक कंपन्यांना पाच वर्षांपूर्वी कल्याण येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने अतिधोकादायक कंपन्या जाहीर केले. जल, हवेतील प्रदूषण करणाऱ्या सुमारे ४०० हून अधिक कंपन्यांवर मागील १५ वर्षांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला. काही कंपन्यांना ‘प्रदूषण नियंत्रणाचे अनुपालन करा मगच उत्पादन करा’, अशा प्रकारची तंबी देऊन दोन महिन्यांहून अधिक काळ उत्पादन बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते. रात्री बारा वाजल्यानंतर, मुसळधार पाऊस सुरू झाला की काही कंपन्या हवेत दुर्गधीयुक्त वायू सोडतात. महापुराची परिस्थिती असली की पुरात प्रक्रिया न केलेले उत्पादित सांडपाणी सोडून दिले जाते. या प्रदूषणातूनच २१ जानेवारी २०१४ मध्ये हिरवा पाऊस, ३ फेब्रुवारी २०२० मध्ये गुलाबी रस्ते रहिवाशांना पाहण्यास मिळाले. या प्रकारांमुळे डोंबिवलीतील रहिवासी अनेक वर्षे हैराण आहे.
औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत किती दुर्घटना घडल्या आहेत?
बाॅयलर स्फोट, रसायन मिश्रण करताना स्फोट असे प्रकार कंपन्यांमध्ये झाले आहेत. मागील २० वर्षापासून कंपन्यांनी आपला पसारा वाढविला. उत्पादन क्षमता वाढविली. आहे त्या जागेत नवीन उत्पादन घेण्याचे प्रकार सुरू झाले. त्यानंतर कंपन्यांमध्ये अपघातांची मालिका सुरू झाली. हे प्रमाण मागील १० वर्षांपासून वाढले. या कालावधीत स्फोट, आगीच्या एकूण ३० घटना घडल्या आहेत. वीस वर्षांत एकूण ३० जणांचा मृत्यू झाला. १६ जण जखमी झाले आहेत. २६ मे २०१६ रोजी प्रोबेस कंपनीच्या स्फोटात १२ जण मृत आणि सुमारे २५० हून अधिक जखमी झाले. पाच किमीपर्यंतचा डोंबिवली परिसर हादरला. डोंबिवली एमआयडीसीतील ही सर्वांत मोठी दुर्घटना होती.
१५६ कंपन्या स्थलांतरित केल्यास कोणते परिणाम होतील?
६० वर्षापासून स्थानिक, मुंबई परिसरातील उद्योजक डोंबिवली एमआयडीसीत काम करतात. या कंपन्यांनी कुशल कामगार वर्ग घडविला आहे. डोंबिवली, मुंबई, ठाणे परिसरात राहून अनेक कंपन्या आपला व्यवसाय चालवितात. वयोमानामुळे अनेक चालक कंपनीत नियमित येत नाहीत. कामगार कुटुंबे डोंबिवली, बदलापूर, कल्याण परिसरात राहतात. कंपन्या स्थलांतरित झाल्या तर कामगार वर्ग नवीन जागेत मुलांचे सध्या सुरू असलेले शैक्षणिक अभ्यासक्रम, तसेच मूळ जागेच्या ओढीमुळे येणार नाहीत. अनेक उद्योजकांची मुले विदेशात आहेत. त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आहेत. उद्योजकांनी निवृत्त तज्ज्ञ मंडळीच्या माध्यमातून कंपनी गाडा सुरू ठेवला आहे. अशा उद्योजकांवर सरकारने पाताळगंगा येथे जाण्याची सक्ती केली तर १०० उद्योग बंद पडतील. सुमारे ४० हजार कामगार बेरोजगार होईल. १५६ कंपन्यांवर अवंबलून असलेल्या कंपन्यांना आवरते घ्यावे लागेल. नवीन जागेत जाणारे उद्योजक यंत्रासामग्री नेऊ शकतील. नवीन पाया उभारणीसाठी ५० ते ६० कोटी पहिल्या टप्प्यात लागतील. शासन त्यासाठी खेळते भांडवल यासाठी देणार आहे का, असा प्रश्न उद्योजक उपस्थित करतात.