-मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असणाऱ्या आरे कॉलनीच्या जंगलात बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अशात मागील काही वर्षांत या जंगलात मानवी वस्ती वाढली आहे. वन्यजीवांच्या अधिवासावर मानवाने अतिक्रमण केले असून त्यामुळे आता मानव-पशू असा संघर्ष येथे वाढू लागला आहे. या भागात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२४ ऑक्टोबर) दीड वर्षाच्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हल्ला करणाऱ्या त्या बिबट्याला बुधवारी (२६ ऑक्टोबर) जेरबंद करण्यात आले आहे. मात्र यानिमित्ताने मानव-पशू संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आरे जंगल, येथील वन्यजीवांचा अधिवास आणि बिबट्याचे वाढलेले हल्ले याचा आढावा.

आरेच्या जंगलाचे वैशिष्ट्य काय?

जागतिक दर्जाचे शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत आरेचे जंगल आहे. या जंगलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आरे हे शहरी भागातील एकमेव असे जंगल आहे. या जंगलाला मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. हे जंगल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग आहे. याचे एकूण क्षेत्रफळ १२५० हेक्टर असून  अंदाजे १६ किलोमीटरचा हा परिसर आहे. या जंगलात मोठ्या संख्येने वन्यजीव, वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. वनविभागाच्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी झालेल्या गणनेनुसार आरेत आजच्या घडीला आठ ते दहा बिबटे आहेत. त्याचबरोबर पक्ष्यांच्या ७६ प्रजाती, प्राण्यांच्या १६ प्रजाती, ८० प्रकारची फुलपाखरे, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळतात. तसेच या जंगलात पाच लाखांहून अधिक झाडे आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेमके काय घडले?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची पत्नी दिवाळीच्या निमित्ताने घराजवळील मंदिरात दिवे लावण्यासाठी गेली. पाठोपाठ दीड वर्षाची इतिकाही गेली. मात्र इतिका आपल्या मागे आली आहे हे कळण्यापूर्वीच तिच्या ओरडण्याचा आवाज आला. इतिकाच्या आईने मागे वळून पाहीपर्यंत बिबट्या तिला घेऊन जंगलाच्या दिशेने गेला. लोट कुटुंबिय आणि शेजाऱ्यांनी जंगलात इतिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल दीड तासाने जंगलात बिबट्या दिसला, त्याच्या पुढ्यात चिमुरडी होती. काही तरुणांनी हिम्मत दाखवून पुढे जात दगड मारून बिबट्याला हकलवून लावले. त्यानंतर कुटूंबियांनी इतिकाला तात्काळ सेवन हिल्स रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर गोरेगावमधील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन दिवाळीत अशी दुर्घटना घडल्याने आरे परिसरात शोककळा पसरली.

बिबट्या जेरबंद कसा झाला?

इतिकाच्या मृत्यूनंतर संतप्त रहिवाशांनी या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून मंगळवारी वनविभागाने युनिट क्रमांक १५ ते आदर्श नगर परिसरात २२ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दोन पिंजरे लावले. बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. दुर्घटना घडलेल्या ठिकाणापासून अगदी २०० मीटर अंतरावरून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. दरम्यान यापूर्वीही सी-३२ या आरेतील नरभक्षक बिबट्या मादीला जेरबंद करण्यात आले होते.

बिबट्यांच्या हल्ल्यावर उपाय काय?

आरेत अनेकदा बिबट्याकडून हल्ले होताना दिसतात. या पूर्वी सी-३२ या मादी बिबट्याने आरेत धुमाकूळ घातला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर आता इतिकाचा जीव घेणाऱ्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आरे जंगल हे बिबट्या आणि इतर सर्व वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यांच्या अधिवासात मानवाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे साहजिकच शिकारीच्या हेतूने किंवा स्वसुरक्षेसाठी त्यांच्याकडून हल्ले होतात. वनविभागाच्या म्हणण्यानुसार बिबट्याच्या अधिवासात मानवाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे साहजिकच असे हल्ले होताना दिसत आहेत. जंगल क्षेत्रात राहताना काही नियम पाळाणे आवश्यक आहे. पहाटे किंवा रात्री घराबाहेर पडू नये. परिसर स्वच्छ ठेवावा. लहान मुलांची काळजी घ्यावी. आरेत अस्वच्छता वाढत आहे, त्यामुळे कुत्रे आणि डुकरांची संख्या वाढत आहे. या डुकरांची आणि कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबटे अशा ठिकाणी येत आहेत. त्यामुळे परिसरात स्वच्छता राखावी. रहिवाशांनी या सर्व नियमांचे पालन करणे आणि आतिक्रमण रोखणे आवश्यक आहे.

आरेचे क्षेत्र का घटले आहे? 

आरेच्या जंगलात २७ आदिवासी पाडे असून तेथील रहिवासी हे आरेतील आणि मुंबईतील मूलनिवासी आहेत. आतापर्यंत या आदिवासींनी आरे जंगल जपले आहे. आजही ते जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मागील काही वर्षात आरेतील जागा काही शासकीय प्रकल्पांना देण्यात आल्या. दूध डेअरीला जागा देण्यात आली. त्याचवेळी अतिक्रमणे झाली आणि तेथे झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. आता मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या कारशेडसाठीही येथील जागा देण्यात आली असून येत्या काळात १५ हून अधिक प्रकल्प आरेत प्रस्तावित आहेत. एकूणच यामुळे जंगल नष्ट होण्यास सुरुवात झाली असून वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धक्का पोहोचत आहे, असे पर्यावरणवाद्यांना वाटते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 month old died in leopard attack in mumbai aarey colony why attacks have increased in this area print exp scsg
Show comments