17,000-Year-Old Blue-Eyed Child: दक्षिण इटलीमध्ये झालेल्या एका आगळ्यावेगळ्या पुरातत्त्वीय शोधात शास्त्रज्ञांनी तब्बल १७ हजार वर्षांपूर्वीच्या निळे डोळे असलेल्या एका लहान मुलाचे अवशेष शोधून काढले आहेत. हा अद्भुत शोध प्रागैतिहासिक काळातील बालकांच्या जीवनशैली आणि आरोग्यावर प्रकाश टाकतो तसेच आपल्या प्राचीन पूर्वजांनी सामना केलेल्या आव्हानांची एक अनोखी झलक प्रदान करतो. हा सांगाडा पुरातत्त्वज्ञ मॉरो कॅलाटिनी यांनी ग्रोट्टा देल्ले म्युरा या गुहेत शोधला, ही गुहा इटलीतील मोनोपोली, पुलिया येथे स्थित आहे. ही जागा, इटलीच्या बुटाच्या टोकाचा भाग म्हणून ओळखली जाते, शेवटच्या हिमयुगाच्या काळात प्रारंभिक मानवांसाठी ही जागा आश्रयस्थान होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निळ्या डोळांचा बालक

या चांगल्या प्रकारे जतन केलेल्या समाधीवर दोन मोठ्या खडकांच्या पट्ट्यांचे आच्छादन होते, परंतु तेथे कोणतीही पुरण्यासाठी लागणारी वस्त्रे सापडली नाहीत आणि या गुहेत केवळ हेच एकच दफन सापडले. २० सप्टेंबर, २०२४ रोजी नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून त्या बालकाच्या जीवनशैली आणि दिसण्यासंबंधी काही अद्भुत तपशील उघडकीस आले आहेत. डीएनए चाचणीतून सूचित होते की, बाळाचे डोळे निळे होते, तर त्वचेचा रंग सावळा होताआणि करड्या रंगाचे कुरळे केस होते. या वैशिष्ट्यांच्या एकत्रित अभ्यासामुळे त्या प्रदेशातील प्राचीन लोकसमूहांच्या आनुवंशिक विविधतेबद्दल मौल्यवान माहिती मिळते. हा शोध अमेझॉनमधील प्राचीन भित्तिचित्रांची आठवण करून देतो, ज्यातून नामशेष प्रजातींबद्दल माहिती मिळते. यावरून असे स्पष्ट होते की, पुरातत्त्वीय शोध भूतकाळाबद्दलच्या समजुतींना आपल्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करू शकतात. मुलाच्या वंशाचा आणि आरोग्याच्या आव्हानांचा मागोवा

अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

उकलली बालकाच्या आरोग्याविषयीची माहिती

जनुकीय विश्लेषणात असे आढळले की, हे बालक युगातील शिकारी- भटके यांच्या गटातील होते आणि ते व्हिलाब्रुना क्लस्टरच्या वंशजांमधील होते. हिमयुग संपण्यापूर्वी अशा गटांचे इटलीच्या द्वीपकल्पावर अस्तित्व असल्याचे या शोधावरून पुरेसे स्पष्ट होते. हा निष्कर्ष पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ दोहोंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बालकाच्या डीएनएमधून त्याच्या संभाव्य आरोग्य समस्याही समोर आल्या. TNNT2 आणि MYBPC3 या दोन जनुकांमध्ये म्युटेशन आढळले, जे प्रामुख्याने हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी या हृदयाच्या अनुवंशिक आजाराशी संबंधित असते. या स्थितीमुळेच अंदाजे १६ महिन्यांचा असताना त्या बालकाचा मृत्यू झाला असावा. तसेच, बालकाच्या दातांच्या एनॅमलवर केलेल्या आयसोटोप विश्लेषणातून त्याच्या आईच्या गरोदरपणातील हालचालींविषयीही माहिती मिळाली. या विश्लेषणानुसार, गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात ती स्थानिक परिसरातच राहिली होती. कदाचित आई आणि बालकाच्या आरोग्यासंबंधी चिंतांमुळे तिच्या हालचालींवर मर्यादा अली असावी, असे संशोधकांना वाटते.

एका छोट्या, अलिप्त समुदायातील जीवन

त्या बालकाचा जनुकीय संरचनेचा अभ्यास त्याच्या समुदायाच्या सामाजिक संरचनेची झलक देतो. या पुराव्यांनुसार, त्याचे आई-वडील हे चुलतभाऊ-बहीण असण्याची शक्यता आहे. यातूनच त्या समूहामध्ये नातेवाईकांमध्ये येणाऱ्या संबंधांचे प्रमाणाचे अधिक असल्याचे दिसून येते. पॅलिओलिथिक काळातील लोकांमध्ये नात्यातील लग्ने सामान्य नव्हती, तरी दक्षिण इटलीतील या लहान आणि एकाकी समुदायामध्ये ही प्रथा अधिक प्रचलित होती. हा निष्कर्ष इतर पुरातत्त्वीय शोधांशी सुसंगत आहे, जो प्रागैतिहासिक समाजाच्या गुंतागुंतीच्या सामाजिक गतिशीलतेचे दर्शन घडवतो. उदाहरणार्थ, अलीकडील उत्खननात तब्बल दोन लाख २० हजार वर्षे जुन्या मॅमथ स्मशानभूमीतून मिळालेल्या पुराव्यांनी प्राचीन मानवांच्या वर्तन आणि सामाजिक संरचनेविषयी नवीन माहिती उघडकीस आणली आहे. हा अद्भुत शोध हिमयुगातील जीवनाबद्दल अमूल्य माहिती प्रदान करतो. बालकाच्या दातांवर केलेल्या सखोल विश्लेषणात नऊ ठळक रेषा दिसून आल्या, ज्या शारीरिक त्रासांच्या सूचक आहेत. या रेषांमुळे असे सूचित होते की, बालकाला गर्भावस्थेत असताना आणि त्याच्या अल्पायुष्यातही महत्त्वपूर्ण ताणतणावाचा सामना करावा लागला होता.

अधिक वाचा: Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?

प्रागैतिहासिक समुदायांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा उलगडा

एकाकी समूहांमधील मर्यादित जनुकीय विविधता, नात्यातील लग्नामुळे उद्भवणारे आरोग्यविषयक धोके, गर्भधारणेदरम्यान आणि बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील ताणतणाव, कठोर पर्यावरणीय परिस्थितींचा मानवसमूहांवर होणारा परिणाम इत्यादी गोष्टींचा उलगडा झाला आहे. या प्राचीन बालकाच्या जीवनकथेला जोडून पाहताना, संशोधकांना आपल्या पूर्वजांच्या जिद्द आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेविषयी मौल्यवान माहिती मिळाली आहे. ग्रोट्टा देल्ले म्युरामधील निळ्या डोळ्यांचा लहान मुलगा प्रागैतिहासिक काळातील जीवनाच्या नाजूकतेची आणि आपल्या प्रजातीच्या टिकून राहण्याच्या आणि कालाच्या ओघात भरभराट होण्याच्या अदम्य मानवी वृत्तीची हृदयस्पर्शी आठवण करून देतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17k year old blue eyed child genetic discovery svs