पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र असले तरी या देशाशी भारताचे तसे चांगले संबंध नाहीत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून एकमेकांवर वेगवेगळे आरोप करीत असतात. याआधी या दोन देशांचे एकमेकांशी युद्धही झालेले आहे. १९६५ सालच्या युद्धात भारताने ६ सप्टेंबर रोजी पाकिस्तानातील लाहोर या शहरावर तीन बाजूंनी हल्ला केला होता. भारतीय लष्कराच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य गोंधळून गेले होते. याच पार्श्वभूमीवर ६ ते ८ सप्टेंबर या काळात नेमके काय घडले होते? भारताने लाहोरवर का हल्ला केला होता? हे जाणून घेऊ या …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने तीन दिशांनी केला होता हल्ला

भारतीय लष्कराने ६ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानच्या लाहोरवर हल्ला केला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर पुरते गोंधळून गेले होते. विशेष म्हणजे भारतीय लष्कराने लाहोरवर थेट तीन आघाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या दोन दिवसांनी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या सियालकोट या शहरावरही भारतीय लष्कराने हल्ला केला होता. पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीरवरील आक्रमणाला उत्तर म्हणून भारतीय लष्कराने ही कारवाई केली होती.

६ सप्टेंबर रोजी काय घडले होते?

१९६५ सालच्या युद्धात भारत लाहोर शहरावर तीन बाजूंनी हल्ला करील, असे पाकिस्तानी लष्कराला अपेक्षित नव्हते. भारतीय लष्कर फक्त जम्मू-काश्मीर या भागातच लष्करी कारवाया करील, असा अंदाज पाकिस्तानने बांधला होता. ६ सप्टेंबर रोजी पहाटेच भारतीय लष्कराने लाहोर सेक्टरमध्ये हल्ल्याला सुरुवात केली. वाघा-डोग्राई, खालरा-बार्की व खेमकरन-कसूर अशा तिन्ही बाजूंनी भारताने हल्ले सुरू केले होते. भारताने पूर्वीच्या ग्रँड ट्रंक (GT) रोडवरील प्रसिद्ध वाघा बॉर्डर या जॉइंट चेक पोस्टवर हल्ला सुरू केला होता. याच मार्गाने नंतर भारतीय लष्कराने लाहोरकडे कूच केले होते. डोग्राई, बार्की, बातापूर लाहोर या शहरांच्या सीमेवर असलेल्या प्रदेशापर्यंत भारतीय लष्कर पोहोचले होते.

सैनिक बाटापूर भागापर्यंत पोहोचले होते

भारतीय लष्कराच्या १५ इन्फट्रीने वाघा बॉर्डवरील ग्रँड ट्रंक (GT) रोडवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तानी सैनिक गोंधळून गेले होते. त्यांनी या भागातून माघार घेतली होती. त्यानंतर १५ इन्फट्रीचे सैनिक याच ग्रँड ट्रंक रोडने लाहोरच्या सीमेलगत असलेल्या बाटापूर भागापर्यंत पोहोचले होते.

भारताने लाहोरवर का केला हल्ला?

ऑगस्ट १९६५ पासून पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केली जात होती. ऑपरेशन जिब्राल्टरच्या नावाखाली पाकिस्तान ही कारवाई करीत होता. या मोहिमेंतर्गत १ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने वायू सेना आणि रणगाड्यांच्या मदतीने जम्मू येथील अखनूर या भागात चढाई केली. अखनूर प्रदेशावर ताबा मिळवून जम्मूवर चढाई करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा हेतू होता. पाकिस्तानी लष्कराच्या याच हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ला केला. त्यानंतर ५ व ६ सप्टेंबर रोजी पंजाबमधील अनेक भागांतून भारतीय लष्कराने भारत-पाकिस्तान सीमा ओलांडून पाकिस्तानच्या भूमीत पाय ठेवले. त्यानंतर भारतीय लष्कराने थेट लाहोरवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर पुरते गोंधळून गेले.

लाहोरवर हल्ला करणे गरजेचे का होते?

भारताच्या या लष्करी मोहिमेत सहभागी असलेले वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार- लाहोर या भागावर हल्ला करून पाकिस्तानचे लक्ष या प्रदेशावर राहील. तसेच पाकिस्तान या भागात आपले लष्कर तैनात करील. परिणामी जम्मूतील अखनूर प्रदेशाकडे पाकिस्तानचे दुर्लक्ष होईल. अखनूर येथील लष्कर पाकिस्तानने लाहोर भागाकडे वळवावे, असा उद्देश ठेवून लाहोरवर हल्ला करण्यात आला होता.

इच्छोगिल कॅनाल ताब्यात घेण्याचा प्रयत्न

या मोहिमेत भारताला पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील काही भागांवरही ताबा मिळवायचा होता. पंजाब प्रांताचा काही भाग ताब्यात आल्यास भविष्यात पाकिस्तानशी होणाऱ्या चर्चेत (देवण-घेवाण) भारताची बाजू भक्कम राहील, हा उद्देश यामागे होता. इच्छोगिल कॅनालमुळे लाहोर शहराला मोठे संरक्षण मिळत होते. हे कॅनाल एका प्रकारे भारतीय लष्कराला अडथळा ठरत होते. त्यामुळे हे कॅनाल ताब्यात घेण्याचाही भारतीय लष्कराचा हेतू होता.

लाहोरवरील हल्ल्याचा काय परिणाम झाला?

भारताचे लष्कर पंजाबमधून थेट लाहोरवर हल्ला करील, असे पाकिस्तानच्या लष्कराला वाटले नव्हते. भारत फक्त जम्मू आणि काश्मीर या भागातूनच पाकिस्तानवर कारवाई करील, असा पाकिस्तानचा होरा होता. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर पुरते गोंधळले. या हल्ल्यामुळे पाकिस्तानला आपले लष्कर लाहोरकडे वळवावे लागले. भारताचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तानची शक्ती येथे खर्च होऊ लागली. पाकिस्तानला अखनूर प्रदेश ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी वायुदलाची मदत घेतली जात होती. मात्र, या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या वायुदलानेही लाहोरचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले.

कॅप्टन अमरिंदर सिंग काय म्हणाले?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार- भारतीय लष्कराचा लाहोर शहरावर ताबा मिळवण्याचा उद्देश नव्हता. कारण- या शहरावर ताबा मिळवण्यासाठी भारताला सैन्याची गरज भासणार होती. भारताला लाहोरच्या शाहदरा भागातील रावी नदीवरील पूल नष्ट करायचा होता. तसेच लाहोरवर ताबा मिळवल्यानंतर आणखी पुढे मोहीम राबवायची असेल, तर लाहोर-वझिराबाद या मार्गावरही ताबा मिळवावा लागणार होता.