अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यावसायिक कर लादल्यानंतर जगभरात महागाईचे सावट आहे. नवीन टेरिफचा परिणाम सर्वांच्या आवडत्या आयफोनवरदेखील दिसून येण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नव्या व्यावसायिक कराचा ‘अॅपल’ कंपनीला सर्वांत जास्त फटका बसला आहे. ट्रम्प यांनी करांची घोषणा केल्यानंतर ‘अॅपल’चे शेअर्स गुरुवारी (३ एप्रिल) नऊ टक्क्यांपेक्षा जास्त खाली गेले.

बुधवारी ट्रम्प यांनी व्यावसायिक करांची घोषणा केल्यानंतर अमेरिकन टेक कंपन्यांना बाजारमूल्यात ३०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अमेरिकेने १८० हून अधिक देशांवर नवीन व्यावसायिक दर लादले आहेत. त्यात ‘अॅपल’चे प्रमुख उत्पादन केंद्र असलेल्या देशांचाही समावेश आहे. ट्रम्प यांच्या टेरिफचा अॅपलवर नक्की काय परिणाम होणार? अॅपल उत्पादनांचे दर महागणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

ट्रम्प यांच्या टेरिफचा अॅपलवर परिणाम होणार?

चीन, भारत व व्हिएतनामसह आशियातील काही देशांमध्ये ‘अॅपल’चे उत्पादन आणि पुरवठादार केंद्र आहे. या देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या टेरिफचा चीनला सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेकडून चीनवर ५४ टक्के व्यावसायिक कर लादण्यात आला आहे. मुख्य म्हणजे चीनमध्ये अॅपलचे सर्वाधिक उत्पादन होते. चीनमध्ये दरवर्षी जगभरात विकल्या जाणाऱ्या सुमारे २०० दशलक्ष म्हणजेच २० कोटी आयफोनपैकी सुमारे ९० टक्के आयफोन तयार केले जातात.

चीन, भारत व व्हिएतनामसह आशियातील काही देशांमध्ये ‘अॅपल’चे उत्पादन आणि पुरवठादार केंद्र आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘एव्हरकोर आयएसआय’च्या अंदाजानुसार, अ‍ॅपलचे ८० टक्के उत्पादन चीनमध्ये केले जाते. अ‍ॅपलच्या मॅक उत्पादनांपैकी ५५ टक्के आणि आयपॅडपैकी ८० टक्के आयात आशियाई देशांत केली जाते, असे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. गेल्या काही वर्षांत ‘अ‍ॅपल’ने चीनसह इतर देशांमध्ये, जसे की भारत आणि व्हिएतनाम यांसारख्या देशांमध्येही आपल्या पुरवठा साखळीचा विस्तार केला आहे. मात्र, भारत आणि व्हिएतनामवरदेखील मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आला आहे. भारतावर २६ टक्के टेरिफ, तर व्हिएतनामवर ४६ टक्के टेरिफ लादण्यात आला आहे.

याचा परिणाम भारतात अ‍ॅपलचे उत्पादन सुरू करण्याच्या योजनेवरदेखील होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले होते की, अॅपलचे त्यांच्या आयफोनपैकी २५ टक्के आयफोन भारतात तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. बर्नस्टाईन विश्लेषकांचा अंदाज आहे की, २०२५ च्या अखेरपर्यंत अॅपल त्यांच्या आयफोनपैकी १५ ते २० टक्के आयफोन भारतात तयार करू शकते, असे वृत्त ‘सीएनबीसी’ने दिले आहे. गेल्या काही वर्षांत व्हिएतनाममध्येही अ‍ॅपलचे उत्पादन वाढवण्यात आले आहे. आयपॅड उत्पादनापैकी सुमारे २० टक्के आणि अॅपल वॉचसारख्या अॅपलच्या वेअरेबल उत्पादनांची ९० टक्के असेंब्ली व्हिएतनाममध्ये होते, असे ‘एव्हरकोर आयएसआय’चे सांगणे आहे.

आयफोनच्या किमती दोन लाखांवर पोहोचतील का?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलच्या प्रमुख उत्पादन केंद्र असणाऱ्या देशांवर उच्च प्रमाणात व्यावसायिक कर लादल्याने, आयफोन उत्पादक कंपनीला त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे. उच्च आयात शुल्कामुळे अ‍ॅपलच्या आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंच्या प्रत्येक मॉडेलवर त्याचा परिणाम होणार आहे, असे ‘फायनान्शियल टाइम्स’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे. अ‍ॅपलकडे सध्या दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे एक तर कंपनी स्वतः अतिरिक्त खर्च उचलेल आणि दुसरा पर्याय म्हणजे अतिरिक्त खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाईल.

जागतिक तंत्रज्ञान विश्लेषक बेन बॅरिंगर यांनी सांगितले, “अ‍ॅपलचे ९० टक्के उत्पादन चीनमध्ये केले जाते आणि १० टक्के उत्पादन भारत व व्हिएतनामसारख्या आशियाई देशांमध्ये केले जाते. या सर्व देशांवर अतिरिक्त कर लादण्यात आला आहे. त्यामुळे अॅपलच्या आयफोन आणि घड्याळाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम थेट कंपनीच्या नफ्यावर होईल. तसेच अॅपलचे उत्पादन अमेरिकेत करणेदेखील तितकेसे सोपे किंवा स्वस्त नाही. त्यामुळे सध्या कंपनीची डोकेदुखी वाढू शकेल अशी स्थिती आहे,” असे ‘द गार्डियन’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

‘काउंटरपॉइंट रिसर्च’चे सह-संस्थापक नील शाह यांनी म्हटले की, आयात शुल्काच्या परिणामस्वरूपी अॅपलला त्यांच्या उत्पादनांच्या किमती सरासरी किमान ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागतील. ‘रोझेनब्लॅट सिक्युरिटीज’च्या विश्लेषकांचा अंदाज आहे की, आयफोनचे दर ४३ टक्क्यांनी वाढू शकतात. आयफोन १६ ची किंमत अमेरिकेत ७९९ डॉलर्स म्हणजेच सुमारे ६८,००० रुपये आहे. किमती वाढवल्यास ग्राहकांना १,१४२ डॉलर्स म्हणजेच ९७,२०० रुपये द्यावे लागतील, असा अंदाज आहे. टॉप मॉडेल असणाऱ्या आयफोन १६ प्रो मॅक्सची किंमत सध्या १५९९ डॉलर्स म्हणजेच १,३६,१०० रुपये आहे आणि ती २३०० डॉलर्स म्हणजेच १,९५,७६६ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परंतु, अॅपलकडून सध्या अशा आशयाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही.

टेरिफच्या परिणामापासून वाचणे अ‍ॅपलसाठी शक्य आहे?

आपल्या पहिल्या कार्यकाळातही डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर उच्च प्रमाणात कर लादले होते, मात्र, तेव्हा अ‍ॅपल त्यांच्या अनेक उत्पादनांवर सूट मिळवू शकली. फेब्रुवारी महिन्यात अॅपलने अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असून, अॅपल टेक्सासमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) सर्व्हर तयार करण्यासाठी एक नवीन सुविधा उघडण्याच्या तयारीत आहे. सध्या तरी व्हाईट हाऊसकडून अॅपलला कोणतीही सूट देण्यात आलेली नाही; परंतु सूट मिळेल, अशी अॅपलला अपेक्षा आहे, असे वृत्त ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिले आहे. वृत्तात असेदेखील नमूद करण्यात आले आहे की, चीनमधून आयफोन आणि इतर उपकरणांवरील आयात करांमुळे अॅपलला दरवर्षी ८.५ अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त खर्च येतो आणि वाढीव खर्च कंपनीने भरल्यास कंपनीचा महसूल कमी होऊ शकतो. तसेच, उत्पादनांच्या किमती वाढवल्यानेदेखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जागतिक गुंतवणूक बँक सिटीने असे म्हटले आहे की, यंदा जर का अॅपलला सूट मिळाली नाही आणि अॅपलला चीनमधील ५४ टक्के कर शुल्काचा फटका बसला, तर कंपनीच्या एकूण सकल नफ्यावर सुमारे नऊ टक्के नकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.