Gadge Maharaj : प्रत्येक महापुरुष महान बनण्याआधी तुमच्या-आमच्यासारखे सामान्य माणूसच असतात; पण सामान्य माणसांत राहून असामान्य कर्तृत्व केल्यामुळे ते महापुरुष झाले. आपल्या देशाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राला अशा थोर महापुरुषांची परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक महापुरुषाने आपल्या रोजच्या जगण्यातील समस्या आणि अडचणींवर मात कशी करायची याचा संदेश दिला आहे; शिवाय महापुरुष काळाच्या पुढचा विचार करतात. त्यांनी त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या काळातील लोकांना तर पटतातच; शिवाय आपणाला आजदेखील त्यांचे विचार पटतात. त्यांनी केलेला उपदेश तंतोतंत पाळला, तर आपण स्वत:च्या प्रगतीबरोबर समाजाचीही प्रगती करू शकतो.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि गोरगरीब समाजाच्या उद्धारासाठी ज्या महान लोकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं असे अनेक थोर समाजसुधारक इथल्या मातीत जन्माला आले. आज अशाच एका महापुरुषाची पुण्यतिथी आहे; ज्यांचे नाव आहे संत गाडगेबा. गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर, असे आहे. गाडगेबाबा हे एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांना आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे खूप आवडायचे; शिवाय लोकांनी इतरत्र केलेला कचरा त्यांना अजिबात आवडत नसे. स्वच्छतेसाठी त्यांनी केलेली कामं सर्वांना परिचित आहेत. त्यासाठी त्यांनी लोकांमध्ये जनजागृतीदेखील केली आणि ते आपल्या कीर्तनांमधून लोकांना सतत स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

स्वच्छता आणि शिक्षणासह ते आपल्या कीर्तनामध्ये सतत एका गोष्टीचा उल्लेख करायचे आणि ते म्हणजे सावकारी कर्ज. आपल्या कीर्तनामध्ये ते म्हणायचे, “उपाशी राहा; पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नका रे बाबानो.” परंतु, गाडगेबाबांना सावकारी कर्जाविषयी एवढी चीड का होती आणि ते कर्जाबाबत एवढी कठोर भूमिका का घ्यायचे यामागेही एक कारण आहे. कर्जामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या कुटुंबीयांवर कर्जामुळे उदभवलेले संकट नेमके काय होते आणि सावकाराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी प्रसंगी त्यांनी हातात शस्त्र कसे घेतले, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा- भिडे वाड्यातील मुलींची पहिली शाळा ते प्राथमिक शिक्षण सक्तीचा लढा: महात्मा फुलेंनी केलेल्या कामाचा आढावा…

प्रबोधनकार अर्थात केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या ‘श्री संत गाडगेबाबा’ पुस्तकामध्ये त्यांनी गाडगेबाबांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे; ज्यामध्ये गाडगेबाबांच्या धाडसी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. ते खालीलप्रमाणे :

वडिलांच्या निधनानंतर गाडगेबाबा दापुरे या मामाच्या गावी राहायचे. मामाच्या घरी ते जनावरांची सेवा करायचे. मामाच्या घरात असणारा एक म्हातारा बैल कसायाला विकण्याचा विषय घरात निघाला, त्यावेळी बैल विकायला गाडगेबाबांनी विरोध केला, “बैल विकाल, तर उद्यापासून मी औताला जाणार नाही. मला घरात ठेवा; नाही तर हाकलून द्या. कुठेही चार घरं भीक मागून पोट भरेन; पण असा कसाईखाना मला परवडणार नाही. बैल विकू देणार नाही,” अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली. मात्र, मामाच्या उरावर सावकारी कर्ज होते. घरात पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना बैल सांभाळणे परवडणारे नव्हते.

मामा चंद्रभानजीचा मृत्यू

गाडगेबाबांच्या मामाचे नाव चंद्रभानजी. ते आपल्या मामाला म्हणाले, “मामा, आपण उपाशी राहू. सण साजरे करणं बंद करू. खूप कष्ट करू आणि या सावकारी जाचातून मोकळे होऊ. परंतु, इथून पुढे सावकाराच्या घराची पायरी चढणार नाही, अशी शपथ घ्या. खोटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला फसवलं आहे. चांगल्या माणसाकडून हिशोब तपासून घेऊ आणि फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सरकारकडे फिर्याद करा. बाकीचे मी पाहून घेतो.”

त्यावर मामा म्हणतो, “झालंय कधी असं? फिर्याद? कुळानं सावकारावर लावायची? खोट्या हिशोबाबद्दल? शेतकऱ्याचं म्हणणं कितीही खरं असलं तरी न्यायमंदिरात कागदाचे पुरावे खरे ठरतात आणि कागदोपत्री सर्व पुरावे सावकारानं त्याच्या बाजूनं करून घेतले आहेत. सावकारी आकडेमोडीसमोर चांगले शिकलेले लोक कोर्टात गाढव ठरतात.” कर्जफेडीसाठी शेती पिकवून आर्थिक बाजू सुधारण्याच्या प्रयत्नात गाडगेबाबा असतानाच, त्यांचे मामा चंद्रभानजी झुरणीला लागले आणि आजारी पडले. त्याच वेळी त्यांचा ताप अचानक वाढल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- इस्लामपेक्षाही मृत्यूला जवळ करणारे गुरू तेग बहादूर कोण होते?

मामाच्या मृत्यूनंतर त्यांचे आजोबा हंबीररावदेखील खचले. मामाच्या पश्चात घरात विधवा सून आणि एक लहान नातू. त्यामुळे घराचा सगळा भार गाडगेबाबांवर पडला. आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही. खोट्या लोकांविरुद्ध काहीही झाले तरी लढायचे हा गाडगेबाबांच्या स्वभावातला एक महान गुणधर्म होता. त्यामुळे त्यांनी घरातील कुटुंबीयांना घेऊन शेतातील कामे सुरू केली. कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायला सगळे घर एकजुटीने जाऊ लागले. पंचक्रोशीत सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी त्यांची शेती पिकू लागली.

कष्टाने शेती पिकवली; परंतु सावकाराने कर्जाच्या मोबदल्यात कापूस-धान्य डोळ्यादेखत उचलून नेले. त्यामुळे वर्षभर काबाडकष्ट करून अखेर पदरी काहीच उरले नाही हे पाहून हंबीरराव खचले. यावेळी गाडगेबाबांनी आपल्या आजोबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “हे पहा आबाजी, आधी आपण सावकाराच्या कर्जातून मोकळे होऊ या; मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण, जोपर्यंत हे कर्ज उरावर आहे तोपर्यंत अमृत खाल्ले तरीही अंगी लागणार नाही.”

“गाठ डेबुजीशी आहे; चंद्रभानजी मामाशी नाही.”

गाडगेबाबा निरक्षर असले तरी त्यांना व्यवहाराची जाण होती. पीक किती काढले?, सावकाराने किती नेले?, त्या पिकाचा चालू भाव किती? या सर्वांचा हिशोब करून त्यांनी सावकाराची भेट घेतली. त्यांनी सावकाराला हिशोब करा आणि पावती द्या, असा आग्रह केला; परंतु सावकाराने हिशोब करायला टाळाटाळ केली, पावतीचा थांगपत्ता लागू दिला नाही. सावकाराच्या या वागण्याला कंटाळून गाडगेबाबांनी अखेर मामाचं सर्व कर्ज व्याजासकट फिटून तुमच्याकडूनच काही रक्कम आम्हाल येणं लागत असल्याचं सावकाराला ठणकावून सांगितलं. ते रागारागात म्हणाले, “हिशोब दाखवून फेडीची पावती देत नसशील, तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आलास, तर तंगड्या तोडेन. याद राख! गाठ या डेबुजीशी आहे; भोळसट चंद्रभानजी मामाशी नाही.”

या वादानंतर अखेर सावकाराने हिशोबाच्या आकड्यांची उलटापालट करून शेतीच्या किमतीएवढा कर्जाचा आकडा गाडगेबाबांसमोर ठेवला. त्यानंतर “हा आकडा खोटा आहे आणि तो मला मान्य नाही”, असे गाडगेबाबा म्हणाले. त्यावर उद्याच तुझ्या संपूर्ण जमिनीचा ताबा घेण्यासाठी मी येणार असल्याचा दम सावकाराने त्यांना दिला. सावकार जमीन ताब्यात घेणार असल्याची बातमी कळताच घरात रडारड सुरू झाली. गाडगेबाबांनी त्यांना धीर देण्याचा खूप प्रयत्न केला; शिवाय काहीही झालं तरी आपली जमीन सावकाराला घेऊ देणार नाही, असे वचनही त्यांनी घरच्यांना दिले.

गाडगेबाबा म्हणाले, “माझी बाजू सत्याची आणि न्यायाची आहे. सावकार कितीही धूर्त, चाणाक्ष असला तरीही मी त्याला पुरून उरेन. अन्यायाचा प्रतिकार काय नुसत्या कोर्टबाजीनेच करता येतो? शेताची माती कसण्यात कसदार बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यांनी कोर्ट-कचेऱ्यांच्या पायऱ्या चढाव्यात आणि गोरगरिबांनी ठोशांनी न्यायाचा ठाव घ्यावा,” असे म्हणत प्रसंगी सावकाराशी दोन हात करण्याची तयारी गाडगेबाबांनी केली.

गाडगेबाबांनी केलेला निर्धार पाहून आजोबा हंबीरराव घाबरले. ते म्हणाले, “पोरा, काय चालवलंयस हे तू, शेतीचा ताबा घ्यायला सावकार उद्या आला, तर येऊ दे. काय वाटेल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. तुला माझी शपथ आहे. या गावात आपली बाजू घेणारं कुणीही नाही. आपण कुठेही जाऊ. कपडे धुऊन पोट भरू; पण या सावकाराच्या नादाला लागू नको.”

शेतीचा ताबा घेण्यासाठी आला सावकार

अखेर तो दिवस आला. वट्टीच्या शेतीचा ताबा सावकार घेणार, या बातमीने आसपासचे सारे शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाले. गाडगेबाबा पहाटेच शेतात गेले होते. त्यांच्यापाठोपाठ आजोबा हंबीरराव शेतात आले. यावेळी सावकार घोड्यावर स्वार होऊन शेतात आला. त्याच्याबरोबर त्याचे नोकर होते. सावकार म्हणाला, “आपली बैले शेतात घाला आणि जो शेतात नांगरतो आहे त्याला बाहेर काढा.” यावेळी सावकाराच्या एका माणसालाही गाडगेबाबांनी दाद दिली नाही. ते पाहून सावकार संतापला आणि त्याने आणखी दोन माणसे गाडगेबाबांना शेतातून बाहेर काढण्यासाठी पाठवली.

त्या दोघांनी गाडगेबाबांना पकडले आणि त्यांचा नांगर खाली पाडला. नांगर पडताच रागावलेल्या गाडगेबाबांनी एका क्षणात दोघांना कोपरखळी घातल्या आणि खाली पाडले. यावेळी नांगराला जोडलेला लोखंडी रॉड हातात घेतला आणि “आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेईन,” असे म्हणत ते सावकाराच्या अंगावर धावून गेले. यावेळी सावकार घाबरला आणि भीतीने घोड्याचा लगाम खेचून पळून गेला. गाडगेबाबांचा रुद्रावतार पाहून बघणारेदेखील घाबरून गेले. त्यानंतर जणू काही घडलेच नाही, या वृत्तीने त्यांनी शेतीची नांगरणी पुढे चालू केली. गावभर नव्हे, पंचक्रोशीत हंबीररावच्या नातवाने केलेल्या पराक्रमाची चर्चा सुरू झाली. सावकारशाहीचा शेकडो वर्षांचा इतिहास त्यांनी मोडीत काढला. हा नवा पायंडा गाडगेबाबांनी तिथल्या शेतकरी जनतेला प्रथमच घालून दिला होता.

उपाशी राहा; पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नका

या सर्व घटनेनंतर अखेर हंबीररावांची कशीतरी समजूत काढून सावकाराने गहाण जमिनीपैकी १५ एकर जमीन परत केली आणि आता काहीही देणे राहिले नसल्याचे सांगत वाद मिटवून घेतला. हा अनुभव पाठीशी असल्यामुळे आणि कर्जापायी आपला मामा डोळ्यांदेखत मेल्याचे पाहिल्यामुळे गाडगेबाबा सावकारी कर्ज घेण्याला विरोध करीत. उपाशी राहा; पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नका रे बाबांनो! गाडगेबाबांच्या उपदेशामागे हा असा जुना इतिहास आहे.