पुण्यात एका दुर्मीळ आजाराचा शिरकाव झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या अतिशय दुर्मीळ आजाराने थैमान घातले आहे. एका महिलेला या आजाराची लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केल्यामुळे तिने या आजारावर मात केल्याचे वृत्त मध्यंतरी समोर आले होते. मात्र, आता पुण्यात या दुर्मीळ आजाराचे तब्बल २२ संशयित रुग्ण आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांनी गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, धायरी आणि आजूबाजूच्या परिसरातील असल्याचे डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले आहे. काय आहे हा दुर्मीळ आजार? त्याची लक्षणे काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि पूना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णांना दाखल केल्यानंतर सिंहगड रोड परिसरातून गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची किमान २२ संशयित प्रकरणे पुणे महापालिकेकडे नोंदवली गेली आहेत. पीएमसीच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, नागरी संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बाधित भागात एक पथक पाठवेल. “सध्या आम्ही पीएमसीच्या अंतर्गत भागातील सहा रुग्णांचे रक्त नमुने गोळा केले आहेत आणि पुढील तपासणीसाठी ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV)कडे पाठवले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या अतिशय दुर्मीळ आजाराने थैमान घातले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : २,१६१ कोटींच्या मद्य घोटाळ्यात ईडीला काय आढळले? छत्तीसगडमधील हे प्रकरण चर्चेत का?

‘इंडियन एक्स्प्रेस’ने संवाद साधलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या आठवडाभरात सिंहगड रोड आणि आजूबाजूच्या भागांतील रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना ताप, तसेच अंगात अशक्तपणा यांसारखी लक्षणे होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सल्लागार तज्ज्ञ डॉ. समीर जोग म्हणाले, “या रुग्णांना जीबीएस असल्याचे निदान झाले आहे.” डॉ. जोग म्हणाले की, सहा बालके आणि १० प्रौढ अशा १६ रुग्णांमध्ये गेल्या आठवड्यात त्यांच्या हातपायांमध्ये कमकुवतपणाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे रुग्ण धायरी, सिंहगड रोड, किरकटवाडी आदी भागांतील होते. त्यातील आठ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूना रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर अजित तांबोळकर म्हणाले की, त्यांच्या अतिदक्षता विभागात असे तीन रुग्ण आहेत. ते म्हणाले, “हे रुग्ण सिंहगड रोड आणि माणिकबाग येथील आहेत. डॉक्टरांना शंका आहे की, एक तर जीवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक गुंतागुंत निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोबुलिन (IVIG) हा या आजारासाठी सिद्ध प्रभावी उपचार आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा विकार आहे; ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर हल्ला करते. या स्थितीमुळे अशक्तपणा, सुन्नपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात होऊ शकतो. गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणालाही प्रभावित करू शकतो. मात्र त्याचे नेमके कारण समजलेले नाही.

या आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येक रुग्णाला वेगववेगळा वेळ लागू शकतो. बहुतेक व्यक्ती काही आठवड्यांत बरे होतात; तर काहींना महिनाभराचा कालावधी लागतो. या आजाराची लागण झालेले सुमारे ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, १५ टक्के रुग्णांमध्ये काही काळ अशक्तपणा असू शकतो व पाच टक्के रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या विकारावर लवकरात लवर उपचार घेणे गरजेचे असते.

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा विकार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे सहसा अचानक दिसू लागतात. ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवड्यात वेगाने वाढू लागतात. सामान्य लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणे आदी लक्षणांचा समावेश होतो. मुंग्या येणे अनेकदा पायांमध्ये सुरू होते आणि हात व चेहऱ्यापर्यंत पसरू शकते. लोकांना चालण्यातही त्रास होतो; ज्यामुळे हालचाल करण्यात अडचणी येऊ शकतात.

त्यामुळे न्यूरोपॅथिक वेदनादेखील होतात. या वेदना पाठ आणि हातपायांमध्ये दिसतात. स्वायत्त बिघडलेले कार्य जसे की, अनियमित हृदय गती, रक्तदाबातील चढ-उतार आणि गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात. सर्वांत गंभीर प्रकरणांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे संपूर्ण पक्षाघात होऊ शकतो, ज्याला मेकॅनिकल व्हेंटिलेशन आवश्यक असते.

गुइलेन बॅरे सिंड्रोम कशामुळे होतो?

या आजाराची लागण होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी (पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाल्ल्याने किंवा हाताळल्याने) या विषाणूचे संक्रमण. तसेच एपस्टाईन-बॅर व्हायरस, सायटोमेगॅलॉव्हायरस किंवा झिका व्हायरससारखे संक्रमण झाल्यासही याची लागण होते. या संक्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होते, जी नसांना लक्ष्य करते. काही प्रसंगी, इन्फ्लूएन्झा किंवा टिटॅनससारख्या काही लसी गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरू शकतात. परंतु, लसीकरणाच्या फायद्यांच्या तुलनेत याचा धोका अत्यंत कमी आहे.

हेही वाचा : ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलेल्या व्हाईट हाऊसचा इतिहास तुम्हाला माहितेय का?

“अशी वाढ पहिल्यांदाच”

२२ पैकी पाच प्रकरणे असलेल्या पूना रुग्णालयाचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कोठारी म्हणाले, “गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये इतकी वाढ मी कधीच पाहिली नाही. कोविड महामारीच्या काळातही अशी वाढ झाली नाही.” डॉ. कोठारी पुढे म्हणाले, “बार्ज हॉस्पिटल्समध्ये साधारणत: महिन्याला एक किंवा दोन गुइलेन बॅरे सिंड्रोमची प्रकरणे नोंदवली जातात. त्यामुळे एका आठवड्यात २२ प्रकरणे ही मोठी संख्या आहे. यामागील कारण शोधणे आवश्यक आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 suspected guillain barre syndrome cases in pune what is guillain barre syndrome rac