Discovery at Karnak Temple Complex: इजिप्तच्या कर्नाक मंदिर संकुलात झालेल्या एका उत्खननात पुरातत्त्व अभ्यासकांनी २,६०० वर्षे जुने मातीचे भांडे शोधून काढले आहे. या भांड्यामध्ये एका कुटुंबाचे सोन्याचे दागिने आणि देवतांच्या मूर्ती आढळल्या आहेत. हे उत्खनन प्राचीन इजिप्तच्या २६ व्या राजवंशातील धार्मिक आणि कलात्मक प्रथा समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या शोधामुळे इसवी सनपूर्व पहिल्या सहस्रकातील कर्नाक मंदिर संकुलाच्या इतिहास आणि विकासाबाबत नवा दृष्टिकोन मिळत आहे. या संकुलात २६ व्या राजवंशाच्या सुरुवातीच्या कालखंडातील मातीच्या इमारतींचा शोध यापूर्वीच्या उत्खननांमध्ये लागला आहे. या इमारती मंदिराशी संबंधित कार्यशाळा, कोठारे किंवा अन्य पूजास्थळे म्हणून वापरल्या जात असाव्यात, असा संशोधकांचा कयास आहे.
लक्सर संग्रहालय
सध्या सुरू असलेले संशोधन आणि त्यातून समोर आलेल्या प्राचीन वस्तू इजिप्तच्या इतिहासातील परंपरा आणि प्रथांबाबत अधिक माहिती उजेडात आणतील, अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत. अलीकडे सापडलेल्या या वस्तूंचे पूर्णपणे दस्तऐवजीकरण आणि जतन केल्यानंतर त्यांचे लक्सर संग्रहालयात प्रदर्शन भरवले जाणार आहे. त्यामुळे इजिप्तच्या प्राचीन संस्कृती आणि धार्मिक इतिहासाबद्दल अधिक माहिती समजण्यास मदत होणार आहे. लक्सर संग्रहालय हे इजिप्तमधील सर्वात प्रतिष्ठित आणि समृद्ध पुरातत्त्वीय संग्रहालयांपैकी एक आहे. हे संग्रहालय नाईल नदीच्या काठावर लक्सर शहरात असून प्राचीन इजिप्शियन संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडवते. १९७५ साली या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. हे संग्रहालय विशेषतः थीब्स (Thebes) आणि कर्नाक मंदिर संकुलाशी संबंधित पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
कर्नाक मंदिर संकुल
सध्या सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वाधिक काळ टिकून राहिलेल्या धार्मिक संकुलात कर्नाक मंदिर संकुलात सापडले आहेत. कर्नाक मंदिर संकुलात झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे इजिप्तच्या सर्वात समृद्ध पुरातत्त्वीय रहस्यांचा शोध लागला आहे. लक्सरच्या जवळच असलेले हे भव्य मंदिर संकुल सुमारे ४,००० वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते आणि त्यानंतर किमान एक हजार वर्षे अनेक बदलांना सामोरे गेले. अनेक शतकांपासून हे मंदिर संकुल प्रमुख पुरातत्त्वीय संशोधनाचे केंद्र राहिले होते आणि या कालावधीत शेकडो महत्त्वाचे शोध आता येथे लागले आहेत.
सोन्याचे दागिने आणि मूर्ती
नव्याने सापडलेल्या वस्तूंमध्ये सोन्याच्या मण्यांच्या माळा, ताईत आणि सूक्ष्म नक्षीकाम असलेल्या लहान मूर्तींचा समावेश आहे. या वस्तू एका छोट्या तुटलेल्या मातीच्या भांड्यात ठेवलेल्या होत्या. या भांड्याला ज्या पद्धतीने जतन करण्यात आले, त्या पद्धतीमुळे दागिने आणि देवतांच्या मूर्ती अखंड स्वरूपात सापडल्या. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरावस्तू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दागिन्यांच्या साठ्यात सोन्याच्या आणि धातूच्या अंगठ्यांसह तीन देवतांच्या मूर्ती आहेत. इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख मोहम्मद अब्देल-बादी यांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या स्थळी सापडलेल्या मूर्ती प्राचीन इजिप्तमधील प्रमुख देवता परिवारातील आहेत. यामध्ये थेब्जचा शासक देव अमून, त्याची पत्नी आणि मातृदेवी मट, तसेच त्यांचा पुत्र आणि चंद्रदेव खोंसू यांचा समावेश आहे. प्रारंभिक कालखंडात या छोटेखानी मूर्ती ताईत म्हणून परिधान करण्यासाठी वापरण्यात आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या गळ्यात घालूनच पूजाविधी करण्यात आले असावेत किंवा ताईतासारखा संरक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात आला असावा.
देवतांच्या मूर्ती आणि ताईतांचे महत्त्व
या मूर्ती ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अमून, मट आणि खोंसू हे मिसरच्या पौराणिक कथांमधील एक महत्त्वपूर्ण दैवी कुटुंब होते. यात अमून हा देवतांचा शासक मानला जात असे. या लहान मूर्ती सदरहू कुटुंबासाठी मौल्यवान वस्तू होत्या आणि दैनंदिन जीवनात ताईत म्हणून वापरण्यात येत असत. अशा सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या वस्तू टिकून राहिल्या, त्यामुळेच २६ व्या राजवंशाच्या काळातील धार्मिक प्रथांबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत झाली आहे.
इतर काही शोधांमध्ये धातूची ब्रोच आणि प्राण्यांच्या रूपातील देवतांना दर्शवणाऱ्या काही इतर वस्तू आढळल्या आहेत. याशिवाय काही सोन्याच्या पत्र्याने मढवलेले तसेच साधे मणी सापडले आहेत आणि त्यापैकी बहुतेक २६ व्या राजवंशाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आहेत. सापडलेल्या ताईतांपैकी बहुतेक ‘वजेत’ या डोळ्याच्या आकाराच्या प्रतिकाच्या स्वरूपात होते. अशा स्वरूपाचे ताईत संरक्षणशक्ती प्रदान करणारे आहेत, असे प्राचीन इजिप्तवासीय मानत असतं. यावरून मिस्रवासीयांचा संरक्षक देवतांवरील अपार विश्वास आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात दागिन्यांचे महत्त्व स्पष्ट होते.
या मौल्यवान वस्तू मातीच्या भांड्यात ठेवण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अभ्यासकांचा अंदाज आहे की, या वस्तू विशिष्ट विधींसाठी अर्पण म्हणून किंवा मंदिराच्या खजिन्यात देणगी म्हणून ठेवण्यात आल्या असाव्यात. प्राचीन इजिप्तमध्ये देवतांना पूजेच्या रूपात मौल्यवान, धार्मिक वस्तू अर्पण करणे ही एक नियमित प्रथा होती आणि हा शोध अशा भक्तीभावाचे उदाहरण असू शकतो असे मत अभ्यासक व्यक्त करतात.