26/11 Mumbai terrorist attack मुंबई म्हणजे कधीही न थांबणारे शहर. कुणीही आलं तरी आपलंस करते ती म्हणजे मुंबई. परंतु मुंबईच्या इतिहासात अशा काही घटना आहेत, ज्यांनी मुंबईला रक्तबंबाळ केले. या घटनांचे घाव इतके खोल आहेत की, त्याचे व्रण आजही तितकेच स्पष्ट आहेत. मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती नेहमीच दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’ वर असते. २००८ साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला ही त्यातील एक महत्त्वाची घटना. या हल्ल्याने सारे जगच सुन्न झाले होते. या दहशतवाही हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईच्या रक्षणासाठी ज्या काही वीरांनी बलिदान दिले त्यात एक नाव आवर्जून येते ते म्हणजे तुकाराम ओंबळे! त्यांच्या कर्तृत्त्वाची गाथा सर्वश्रुत असली तरी आज या घटनेला १५ वर्षं झाली, त्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाच्या स्मृतीला पुन्हा एकदा दिलेला हा उजाळा!
हल्ल्यापूर्वीची सायंकाळ
इंग्लंड क्रिकेट संघाने ९ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २००८ या दरम्यान भारताचा दौरा केला आणि दोन कसोटी सामने तसेच पाच एकदिवसीय सामने खेळले होते. या पाच दिवसीय सामन्यातील शेवटचा सामना २६ नोव्हेंबर रोजी खेळाला गेला, यात भारतीय संघाचा विजय झाला. ती बुधवारची संध्याकाळ होती, इंग्लंड विरुद्ध भारत असा सामना ऐन रंगात आला होता. क्रिकेट असो की कुठला सण मुंबई पोलिसांची ड्युटी म्हटली की काहीही तडजोड नाही. त्याच ठरलेल्या नियमाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरिक्षक तुकाराम ओंबळे हे ऐन रंगात आलेली क्रिकेटची मॅच सोडून डी. बी. मार्ग पोलीस स्थानकात कामावर रुजू झाले. भारतातल्या हजारो क्रिकेटप्रेमींप्रमाणे त्यांचेही एक मन या सामन्यात गुंतलेले होते. अधूनमधून घरी फोन करून ते स्कोअर विचारत होते. त्यांनी किमान दोन ते तीन वेळा फोन केला होता. रात्रीचे ९ वाजले होते. पुन्हा एकदा फोन खणखणला. वैशाली म्हणजे त्यांच्या तिसऱ्या मुलीने फोन उचलला. आधी प्रमाणे क्रिकेटसाठीच हा फोन असणार म्हणून ती थोडी वैतागलीच… आता जिंकली ना इंडिया? परत परत काय फोन करताय? …परंतु हा फोन त्यासाठी नव्हता. ओंबळे म्हणाले… दक्षिण मुंबईत दहशतवादी हल्ला झालाय. तू, तुझी आई आणि बहिणी घरातच थांबा. वैशालीने विचारले तुमच्याकडे परिस्थिती कशी आहे? अजूनपर्यंत तरी फार काही घडलेलं नाही, समोरून उत्तर आले. वडिलांना पूर्णतः ओळखून असणाऱ्या वैशालीने त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली तुम्ही नेहमीच पुढे असता, काळजी घ्या! त्यांचे हे संभाषण शेवटचे ठरले!
अधिक वाचा: भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे हूती आहेत तरी कोण?
न संपणारा विरह!
काळ सरत होता. वाट पाहणं संपत नव्हतं… मुंबईत भीतीचे वातावरण होते. अनेकांचे बळी गेले होते. अनेक जण ओलीस होते. मुंबईवर आलेल्या या संकटाला मुंबई पोलीस निधड्या छातीने सामोरे जात होते. साऱ्या जगाला ओंबळे यांच्या त्यागाची गाथा समजली तरी खुद्द त्यांच्या कुटुंबाला हे सगळ्यात उशिरा सांगण्यात आले. ओंबळे कुटुंबात माय- लेकी या ओंबळे यांच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. आणि त्यांच्या घरापासून ५ किमी अंतरावरच एका जिवंत दहशतवाद्याला पकडताना, आपले कर्तव्य बजावत असताना तुकाराम ओंबळे यांना हौतात्म्य आले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. नंतर पुढील वर्षी भारत सरकारने २६ जानेवारी २००९ रोजी ओंबळे यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी पुरस्कार ‘अशोकचक्र’ देऊन मरणोत्तर सन्मानित केले.
नेमके काय घडले त्या दिवशी?
भारतीय लष्कराच्या सिग्नल कोअरमधून नाईक म्हणून निवृत्त झाल्यानंतर तुकाराम ओंबळे हे मुंबई पोलिसात हवालदार म्हणून रुजू झाले. ते मुंबई पोलिसात एएसआय होते. २६ नोव्हेंबर रोजी ते आणि त्यांची टीम एका चेक पॉईंटवर पहारा देत असताना अपहरण केलेल्या वाहनातून दोन दहशतवादी तेथे पोहचले. दोन्ही बाजूने चकमक सुरु झाली. सुरुवातीच्या गोळीबारानंतर एक दहशतवादी गाडीच्या आतच ठार झाला. दुसरा दहशतवादी ‘अजमल कसाब’ याने वाहनातून बाहेर पडून आत्मसमर्पणाचे नाटक केले. नि:शस्त्र ओंबळे त्याच्याजवळ येताच कसाब उठला आणि त्याने गोळीबार केला. असे असले तरी ओंबळे यांनी तेथून पळ न काढता, ते त्याच्यासमोर उभे राहिले कसाबच्या रायफलच्या बॅरलला धरून ठेवले, त्यामुळे इतर कोणीही जखमी झाले नाही. तब्बल २० पेक्षा अधिक गोळ्या ओंबळे यांनी आपल्या छातीवर झेलल्या. यातच त्यांना वीरमरण आले.
अधिक वाचा :तुळशी विवाहामागच्या प्रथा- परंपरा काय आहेत?
मातृभूमीच्या रक्षणाची आस
तुकाराम ओंबळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील केडांबे गावचे. त्यांनी मुंबई पोलिसात रुजू होण्याकरिता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मध्ये चालून आलेली नोकरीची संधी घेतली नाही. लहानपणापासून त्यांना भारतीय सैनिकांच्या गणवेशाचे आकर्षण होते. त्यांच्या मावशीचे पती भारतीय लष्करात चालक होते. कालांतराने तुकाराम ओंबळे मुंबई पोलिसात रुजू झाले. ते त्यांच्या गावातील खाकी वर्दी परिधान करणारे पहिले होते, आजही त्यांचे संयुक्त कुटुंब हे अभिमानाने सांगते. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. आजही त्यांच्या गावात त्यांच्या शौर्य गाथेचे स्मरण केले जाते.ओंबळे होते म्हणून अजमल कसाब पकडला गेला आणि पाकपरस्कृत दहशतवादाचा खरा चेहरा जगासमोर आला. ओंबळे यांच्या स्मृतीस मानवंदना!