जपानमध्ये एक कात्री गायब झाल्याने संपूर्ण हवाई वाहतूक खोळंबली होती. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कात्रीची एक जोडी गायब झाल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये सुरक्षेची चिंता निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण विमानतळावरील अधिकारी आणि कर्मचार्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या घटनेमुळे होक्काइडोच्या उत्तरेकडील बेटावरील सपोरो येथील न्यू चिटोस विमानतळावर (सीटीएस) खळबळ उडाली. या विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आणि शेकडो उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला. नक्की असे काय घडले? एक कात्री गायब झाल्याने उड्डाणे का रद्द करण्यात आली? या संपूर्ण प्रकरणाविषयी जाणून घेऊ.
उड्डाणे रद्द होण्याचे कारण काय?
एव्हिएशन ॲनालिटिक्स कंपनी ‘ओएजी’च्या मते, न्यू चिटोस हे जपानमधील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक आहे. ‘सीएनबीसी-टीव्ही १८’नुसार, हे विमानतळ त्याच्या कठोर संचालन आणि सुरक्षा प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. विमानतळाने २०२२ मध्ये १५ दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावरील आस्थापनांना विशिष्ट लॉकरमध्ये कात्री ठेवणे बंधनकारक आहे. कात्री वापरल्यानंतर कर्मचारी सदस्यांनी ती लगेच परत करणे आवश्यक असते. शनिवारी विमानतळावरील स्टोअरकडून सांगण्यात आले की, त्यांना कात्रीची जोडी सापडली नाही. जपानी स्टेशन ‘एनएचके’नुसार, कात्री गायब झाल्यानंतर दोन तासांहून अधिक काळ सुरक्षा तपासणी थांबवण्यात आली होती.
हा गंभीर सुरक्षा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. जपानी एअरलाइन्स ‘एएनए’ने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये विमानतळ सुरक्षा प्रक्रियेमुळे उड्डाणांना विलंब होणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तात असे नमूद करण्यात आले की, ज्या प्रवाशांची तपासणी झाली होती, त्या प्रवाशांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यामुळे विमानतळावर लांबलचक रांगा लागल्या. या प्रकरणामुळे सुमारे २०० उड्डाणांना विलंब झाला आणि ३६ उड्डाणे रद्द करण्यात आली; ज्याचा परिणाम विमानतळाच्या कामकाजावर झाला. ‘ओबोन’ हा जपानमधील एक महत्त्वाचा सण आहे. त्यानिमित्त लोक आपल्या आई-वडिलांच्या वा नातेवाइकांच्या घरी आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी जातात आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत करतात. हा सण साजरा करून लोक घरी परतत होते. त्यामुळे लोकांची गर्दी जास्त असल्याने आणखीनच गैरसोय झाली.
प्रवाश्यांचा रोष
अनेक प्रवाशांनी आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली. शनिवारी विमानांना उशीर झाल्यामुळे सुमारे ३० प्रवाशांना विमानतळावर रात्र काढावी लागली. विमानतळाने त्यांना आराम करता यावा यासाठी टर्मिनलच्या चौथ्या मजल्यावर स्लीपिंग बॅग आणि मॅट दिल्याचा दावा ‘डिमसम डेली’ने केला. ‘जपानी रॉक ग्रुप ९ मिमी पॅराबेलम बुलेट’ हा ग्रुप ज्या विमानाने त्यांच्या संगीत कार्यक्रमासाठी जाणार होता. ते विमानही रद्द झाले. एका प्रवाशाने लिहिले, “माझी फ्लाइट केवळ एक कात्री गायब झाल्यामुळे रद्द झाली, याचे मला वाईट वाटले.” दुसर्या प्रवाशाने लिहिले, “मला ज्या फ्लाइटने जायचे होते, ती फ्लाइट रद्द झाली आणि आता मला माझ्या कुटुंबासह कमी वेळ घालवता येईल, याचे मला वाईट वाटत आहे.” तिसर्या प्रवाशाने म्हटले की, आम्ही कृतज्ञ आहोत की, ते सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एवढ्या सखोल उपाययोजना करतात.
कात्रीचा शोध कसा संपला?
ही कात्री संभाव्य दहशतवाद्याकडून विमानात शस्त्र म्हणून वापरली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, दोन दिवसांनंतर ही कात्री सापडली आणि उड्डाणे पुन्हा सुरू झाल्याचा दावा विमानतळाने केला. ‘निक्कन स्पोर्ट्स’ या राष्ट्रीय वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, ज्या ठिकाणाहून ती गायब झाली होती, त्याच ठिकाणी ही कात्री सापडली. “स्टोअर वापरकर्त्यांद्वारे योग्य वापर, स्टोरेज आणि व्यवस्थापन प्रणाली यांच्या अभावामुळे ही घटना घडल्याची आम्हाला जाणीव आहे,” असे न्यू चिटोस विमानतळाच्या ऑपरेटर्सनी एका निवेदनात म्हटले आहे. “आम्ही या घटनेची चौकशी करू. त्यामागील कारणाचा शोध घेऊ आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ. ही घटना अपहरण आणि दहशतवादी हल्ल्याशी संबंधित होती का, याचाही आम्ही मागोवा घेऊ. विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या महत्त्वाची पूर्ण जाणीव आहे ना याचीही आम्ही खात्री करून घेऊ,” असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.